शिवाज्ञा गोविंदा पथकाच्या सरावास उत्साहात शुभारंभ!

0

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : देशभरात उत्साहाने साजऱ्या होणाऱ्या जन्माष्टमीच्या सणात महाराष्ट्रातील दहीहंडी उत्सवाला खास महत्त्व आहे. विशेषतः मुंबईतील गोविंदा पथकांनी या उत्सवाला नवा झगमगता चेहरा दिला आहे. अशाच मुंबईतील अग्रगण्य आणि मानाच्या पथकांपैकी एक म्हणजे वांद्रे-खार-सांताक्रुझ विभागातील “शिवाज्ञा गोविंदा पथक”. हे पथक गेली ७ वर्षे सातत्याने विविध मानाच्या दहीहंडीमध्ये सहभागी होत असून, थर लावून दहीहंडी फोडण्यात आघाडीवर राहिले आहे.

“परंपरेशी नाळ जपणारे, संस्कृतीशी नातं टिकवणारे, आणि एकजुटीने थर लावणारे – शिवाज्ञा गोविंदा पथक!” या पथकाची स्थापना सन २०१७ मध्ये सन्मानीय रुपेश मालुसरे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. पथकातील बाळगोपाळांनी कठोर मेहनत, सातत्य आणि शिस्तीतून हे पथक नावारूपाला आणले आहे. अनेक चढ-उतारांना तोंड देत त्यांनी आपली वाटचाल यशस्वीपणे चालू ठेवली. यंदा ८व्या वर्षात पदार्पण करत, दहीहंडी सरावाला श्रीफळ वाढवून औपचारिक सुरुवात श्री. मालुसरे यांच्या शुभहस्ते करण्यात आली.

वांद्रे पूर्व विधानसभा क्षेत्रात शिवाज्ञा पथकाने स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण केले असून, या पथकावर अनेक लहान-मोठ्या गोविंदा पथकांचा विश्वास आहे. त्यामुळे खार, वांद्रे व सांताक्रुझ परिसरातील अन्य पथकांनीही या संघात सहभाग घेतला आहे. रोजगार, शिक्षण आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळताना आज अनेक पारंपरिक पथके मागे पडताना दिसतात. मात्र, शिवाज्ञा गोविंदा पथकाने ही परंपरा टिकवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत उत्सवप्रियतेचा उत्साही धागा जपला आहे.

या वर्षीच्या तयारीसाठी सर्व सदस्य जोमाने सरावास सज्ज झाले आहेत. एकजुटीचा, टीमवर्कचा आणि सांस्कृतिक वारशाचा उत्तम मिलाफ या पथकात पाहायला मिळतो. हे पथक केवळ दहीहंडीपुरतं मर्यादित नसून, सामाजिक ऐक्य, संस्कृती आणि युवकांचे संघटन यासाठीही ते एक प्रेरणास्थान बनले आहे.

Loading

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here