विरोधकांना हादरा देणारा निर्णय! आज मुंबईत शेकडो महिला किशोरआप्पा पाटील यांच्या नेतृत्वात शिंदे गटात दाखल होणार

0

Loading

पाचोरा / मुंबई, प्रतिनिधी – पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे तडफदार व हॅट्रिक आमदार किशोरआप्पा पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघात एकाही विरोधकाला उभं राहू न देण्याचा निश्चयच केला असून, त्या दिशेने पावलं टाकण्यास सुरुवातही केली आहे. पुरुष नेते व कार्यकर्त्यांच्या सातत्याने होणाऱ्या पक्षप्रवेशांनंतर आता महिला कार्यकर्त्यांनीही त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत एकत्रितपणे मोठा निर्णय घेतला आहे. आज मुंबईत पार पडणाऱ्या एका विशेष समारंभात शेकडो महिला किशोरआप्पा पाटील यांच्या नेतृत्वात शिवसेना (शिंदे गटात) प्रवेश करणार असून, हा प्रवेश सोहळा विरोधकांसाठी मोठा धक्का ठरणार आहे.राजकीय क्षेत्रात नेहमी सक्रिय असलेल्या किशोरआप्पा पाटील यांनी मतदारसंघात आपली राजकीय पकड इतकी मजबूत केली आहे की, आज विरोधी पक्षांचे अनेक नेते आणि कार्यकर्ते थेट त्यांच्या गटात प्रवेश करत आहेत. विशेष बाब म्हणजे आज मुंबईत होणारा हा महिला पक्षप्रवेश सोहळा ही केवळ औपचारिकता नसून, त्यामागे एक मोठी रणनीती कार्यान्वित होत आहे. या प्रवेश सोहळ्यात सहभागी होणाऱ्या महिलांमध्ये पाचोरा, भडगाव तालुक्यांतील अनेक अनुभवी आणि स्थानिक नेतृत्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला आहेत. त्यामध्ये सामाजिक कार्यकर्त्या, स्वयंसहायता बचत गटांच्या प्रमुख, महिला मंडळांच्या अध्यक्षा, ग्रामपंचायत सदस्य, विविध महिला संघटनांतील पदाधिकारी यांचा समावेश आहे.
या पक्षप्रवेशासाठी मुंबई गाठलेल्या महिलांनी आपली भूमिका स्पष्ट करत सांगितलं की, “वर्षानुवर्षे आम्ही विरोधी पक्षांच्या पाठीशी उभ्या राहिलो, मात्र केवळ आश्वासनं, फोटोसेशन्स आणि निवडणुकीपुरतं मत मागणं यापलीकडे आम्हाला काही मिळालं नाही. पण किशोरआप्पा पाटील यांच्या नेतृत्वात आम्हाला समर्पित काम, सक्रिय सहभाग आणि समस्यांवर उपाय दिसतोय. म्हणूनच आज आम्ही हा निर्णायक टप्पा पार करत आहोत.”
या महिला कार्यकर्त्यांच्या प्रवेशाचे स्वागत करताना आमदार सुपूत्र सुमीत किशोरआप्पा पाटील यांनी आधीच स्पष्ट केलं आहे की, “राजकारणात महिलांना फक्त मोर्चा काढण्यासाठी किंवा नावे देण्यासाठीच वापरलं जातं हे चित्र आप्पासाहेबांमुळे बदलणार आहे. महिलांना निर्णय प्रक्रियेत, राजकीय भूमिका घेण्यासाठी आणि मतदारसंघाच्या विकासात खऱ्या अर्थाने सहभागी करणार आहे.” आप्पासाहेबांनी यापूर्वीही महिला विषयक अनेक ठोस निर्णय घेतले आहेत. उदाहरणार्थ – महिला उद्योग मोहीम, बचत गटांना विशेष कर्ज सुविधा, अंगणवाडी सक्षमीकरण, जिल्हा परिषद शाळांमधून मुलींच्या सुरक्षेसाठी उपाययोजना – या सर्वांमुळे किशोरआप्पा पाटील यांच्यावर ग्रामीण महिला वर्गाचा विशेष विश्वास निर्माण झाला आहे.
आज मुंबईत होणाऱ्या या पक्षप्रवेश सोहळ्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना उपनेते, मुंबईचे प्रमुख समन्वयक, तसेच मंत्रीगण उपस्थित राहणार आहेत. विशेष बाब म्हणजे, हा कार्यक्रम किशोरआप्पा पाटील यांच्या विशेष पुढाकारातून आयोजित करण्यात आला असून, त्याला राज्यभरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. या कार्यक्रमात प्रवेश घेणाऱ्या महिला पुढील नावीन्यपूर्ण भूमिकेसाठी तयार असून, त्यांना स्थानिक पातळीवर संघटन, प्रचार व निवडणूक व्यवस्थापन या आघाड्यांवर जबाबदारी दिली जाणार आहे. या प्रस्तावित पक्षप्रवेशाच्या चर्चांमुळेच विरोधी पक्षांमध्ये आतापासूनच अस्वस्थता पसरली आहे. काही नेत्यांनी आतापर्यंतच्या महिला सहकाऱ्यांना समजवण्याचे प्रयत्न सुरू केले असले तरी महिला वर्गाने स्पष्ट भूमिका घेतल्यामुळे त्यांच्या हातातून नेतृत्व निसटत असल्याचं चित्र तयार झालं आहे. राजकारणात महिला कार्यकर्त्या हे प्रचार यंत्रणेचा एक महत्त्वाचा भाग असतात. त्यांचा गट गमावणं म्हणजे मैदानात तोंड देणं अधिक कठीण होणं – याची कल्पना आता विरोधी नेत्यांना यायला लागली आहे. किशोरआप्पा पाटील यांची सध्याची रणनीती ही केवळ आगामी निवडणूक जिंकण्यापुरती नाही, तर त्यांनी विरोधकांचा राजकीय पाया हादरवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पुरुष कार्यकर्त्यांनंतर महिला नेतृत्वाकडे जाण्याचा त्यांचा प्रयत्न ही भविष्यातील राजकीय संधी अधिक मजबूत करण्याची पावलं आहेत.
या प्रवेशानंतर स्थानिक स्वराज्य संस्था, महिला मंडळ, गावपातळीवरचा संवाद, प्रचार व्यवस्था, सार्वजनिक कार्यक्रम यामध्ये महिलांचा प्रभावी सहभाग दिसणार आहे
आजचा होणारा शेकडो महिलांचा शिंदे गटात प्रवेश सोहळा हा फक्त एक कार्यक्रम नाही, तर हे एका नव्या राजकीय पर्वाची सुरुवात आहे. किशोरआप्पा पाटील यांच्या नेतृत्वाने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की, ते केवळ निवडणुकीसाठी नव्हे, तर समाजातील प्रत्येक घटकाला बरोबर घेऊन चालण्यासाठी झटणारे नेते आहेत. राजकीय क्षेत्रात महिला सशक्तीकरणाच्या दिशेने पडणारे हे पाऊल विरोधकांसाठी मोठा धक्का ठरणार असून, येणाऱ्या काळात अधिक महिलांचा सहभाग आणि आणखी गटांचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here