सायबर फसवणुकीपासून सावध राहा : आधार कार्डचा स्वैर वापर अत्यंत धोकादायक – डॉ. धनंजय देशपांडे

पाचोरा : “सायबर क्राईम ही भारतासमोर उभी ठाकलेली एक गंभीर आणि वेगाने वाढणारी समस्या असून, नागरिकांच्या बँक खात्यांपासून ते त्यांच्या ओळखीच्या तपशीलांपर्यंत सर्व काही धोक्यात आहे. विशेषतः आधार कार्डाचा स्वैर आणि अज्ञानतावश होत असलेला वापर सायबर फसवणुकीला आमंत्रण देणारा ठरत आहे. त्यामुळे जागरूकता ही काळाची गरज आहे. सायबर फसवणुकीच्या कोणत्याही

प्रकाराला बळी पडल्यास, 1930 या हेल्पलाईन क्रमांकावर अर्ध्या तासाच्या आत संपर्क साधणे हा सर्वात प्रभावी आणि तात्काळ उपचार ठरतो,” असे मार्गदर्शन नामवंत सायबर सुरक्षा तज्ज्ञ डॉ. धनंजय देशपांडे यांनी पाचोऱ्यात केले. रविवार, दिनांक 29 जून रोजी सकाळी 10 वाजता जैन पाठशाळा सभागृह पाचोरा येथे ‘सायबर क्राईम : सावधगिरी आणि प्रतिबंध’ या विषयावर एक जनजागृतीपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या उपक्रमाचे आयोजन रोटरी क्लब पाचोरा-भडगाव, जैन पाठशाळा पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने आणि पाचोरा पोलीस ठाण्याच्या सहकार्याने करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. पवनसिंग पाटील होते. व्यासपीठावर रोटरी क्लबचे सेक्रेटरी डॉ. शिवाजी शिंदे, जैन पाठशाळेचे अध्यक्ष प्रफुल्ल शेठ संघवी, पोलीस निरीक्षक अशोक पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय निकम आणि डॉ. मुकेश तेली हे मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि मान्यवरांच्या स्वागताने झाली. रोटरी क्लबचे सेक्रेटरी डॉ. शिवाजी शिंदे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत या उपक्रमामागील उद्दिष्ट विशद केले. त्यानंतर पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी उपस्थित नागरिकांना सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन करताना सांगितले की, “सायबर गुन्हेगारांनी आता अत्याधुनिक साधनांचा वापर करून विविध क्लृप्त्या वापरण्याचा धोका वाढवला आहे. नागरिकांनी कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये, आधार किंवा बँक तपशील कोणालाही सहजपणे देऊ नये.” कार्यक्रमाचा प्रमुख आकर्षण ठरलेले डॉ. धनंजय देशपांडे यांचे दोन तासांचे सखोल आणि प्रातिनिधिक व्याख्यान हे उपस्थित श्रोत्यांसाठी जागृतीचे एक सशक्त माध्यम ठरले. त्यांनी आपल्या सखोल अभ्यासातून आणि अनुभवातून सायबर गुन्हेगारीचे अनेक पैलू उलगडून दाखवले
डॉ. देशपांडे यांनी श्रोत्यांना सायबर फसवणुकीचे अनेक प्रकार दाखवून दिले. उदाहरणार्थ – अंत्यसंस्कार सेवा पुरवणाऱ्या बनावट ऑनलाइन लिंकद्वारे फसवणूक, डिजिटल अरेस्टच्या नावाखाली पैसे उकळणे, भावनिक व आर्थिक पद्धतीने पालकांची फसवणूक, “चुकून पैसे जमा झाले” म्हणून परत पाठवण्याची विनंती, हनी ट्रॅपच्या माध्यमातून पुरुषांची आर्थिक फसवणूक, एटीएम वापरताना सुरक्षेच्या उपाययोजना न पाळणे, पार्सल वा फॉरेन करन्सीच्या नावाखाली घातलेले सापळे, घर बंद असल्याने पार्सल परत गेल्याचा बनावट मेसेज आणि त्यातील स्कॅन कोडद्वारे चोरी, सरकारी नोकरीच्या खोट्या जाहिराती आणि वेबसाईट्स. या सर्व प्रकारांमध्ये नागरिकांचे बँक खाते, वैयक्तिक माहिती, मोबाईल अ‍ॅक्सेस आणि आर्थिक व्यवहार पूर्णपणे धोक्यात येऊ शकतात. आधार कार्डाचा वापर सहजतेने आणि तपासणी न करता केल्यामुळे अनेकांना आर्थिक फसवणूक सहन करावी लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. देशपांडे यांनी फसवणुकीपासून वाचण्यासाठी काही महत्त्वाचे आणि व्यवहार्य उपाय सुचवले, त्यात खाजगी कुटुंबासाठी वेगळा मोबाईल नंबर आणि ईमेल आय.डी., आणि आर्थिक व्यवहार/कार्यक्षेत्रासाठी वेगळा वापरणे, सोशल मीडियावर आपल्या पर्यटनाची माहिती, फोटो वा स्टेटस लगेच पोस्ट न करता थांबून विचार करणे, आधार कार्डाचा वापर आवश्यकतेपुरता व कायदेशीर चौकशी झाल्यावरच करणे, मोबाईलवर येणाऱ्या कोणत्याही लिंकवर क्लिक करण्याआधी ती लिंक विश्वसनीय आहे का हे तपासणे, ओळखीचा नसलेला फोन नंबर, QR कोड, किंवा लिंकवर काहीही स्कॅन करण्यापूर्वी काळजी घेणे, गुन्हा झाल्यास अर्ध्या तासाच्या आत 1930 या सायबर हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधणे हे आहे.
व्याख्यानानंतर सुमारे एक तास खुले प्रश्नोत्तर सत्र घेण्यात आले, ज्यामध्ये श्रोत्यांनी आपले वैयक्तिक प्रश्न विचारले. त्यावर डॉ. देशपांडे यांनी अत्यंत तज्ञपणे, उदाहरणासहित स्पष्टीकरण दिले. अनेकांनी आपल्या मोबाईलचा वापर, बँकिंग अ‍ॅप्सची सुरक्षितता, QR कोड, आणि स्कॅम कॉल याबाबत चिंता व्यक्त केली. यामध्ये अनेक तरुण, महिला व वयोवृद्ध यांचा सहभाग उत्साहपूर्ण होता.
कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. मुकेश तेली यांनी उपस्थित मान्यवरांचे तसेच श्रोत्यांचे मन:पूर्वक आभार मानले. त्यांनी सांगितले की, डॉ. धनंजय देशपांडे यांचे आजचे सखोल मार्गदर्शन हे नागरिकांमध्ये एक नवा जागरूकतेचा प्रकाश पसरवणारे ठरले आहे. या उपक्रमात रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. पवनसिंग पाटील, सेक्रेटरी डॉ. शिवाजी शिंदे, तसेच सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. पाचोरा डॉक्टर्स असोसिएशनच्या सदस्यांचे देखील महत्त्वाचे सहकार्य लाभले. पाचोरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक अशोक पवार आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय निकम यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला. या कार्यक्रमातून पाचोऱ्यातील नागरिकांना हे स्पष्टपणे उमगले की सायबर फसवणूक ही केवळ एखाद्या शहरापुरती मर्यादित न राहता ती देशभरातील सर्वच स्तरांतील लोकांना आपले लक्ष्य बनवते. त्यामुळे प्रत्येकाने डिजिटल व्यवहार करताना जागरूक राहणे, आपली वैयक्तिक माहिती अज्ञात व्यक्तींना देणे टाळणे, आणि कोणत्याही प्रकारच्या शंका आल्यास तातडीने अधिकृत माध्यमांचा वापर करणे आवश्यक आहे. आजच्या डिजिटल युगात जिथे प्रत्येक गोष्ट मोबाईलवर अवलंबून आहे, तिथे ‘सावध रहा सुरक्षित रहा’ हे ब्रीद वाक्य लक्षात ठेवणे हेच सायबर गुन्ह्यांपासून वाचण्याचे मुख्य अस्त्र आहे.

Loading

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here