पाचोरा – पोलिस उपविभागाचे अधिकारी धनंजय येरुळे यांनी आपल्या ३५ वर्षांच्या प्रदीर्घ व कर्तव्यपरायण सेवेची यशस्वी सांगता करत दिनांक ३० जून रोजी आपल्या सेवेतून निवृत्ती घेतली. त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्त दिनांक १ जुलै रोजी भडगाव रोडवरील आशीर्वाद हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेला सेवानिवृत्ती समारंभ हा

अत्यंत उत्साहात, सुसज्ज आणि भावनांनी भारावलेला असा संपन्न झाला. या समारंभात जिल्हाभरातून पोलीस, महसूल, नगरपालिका, कृषी, राजकीय आणि विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या समारंभाची सुरुवात एका अनोख्या आणि भव्य मिरवणुकीने झाली. गिरड रोडवरील डीवायएसपी कार्यालयापासून सजवलेल्या खुल्या जीपमध्ये धनंजय येरुळे आणि त्यांच्या पत्नी सौ. राजश्री येरुळे यांची मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक गिरड चौफुली, बाजार समिती, पोलीस लाईन, राजे संभाजी चौक, इंदिरा नगर मार्गे आशीर्वाद हॉलमध्ये पोहोचली. पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दोर ओढत देशभक्तिपर घोषणा देत या मिरवणुकीला अभूतपूर्व स्वरूप दिले. मिरवणुकीदरम्यान देशप्रेम जागवणारे घोष, फुलांची उधळण आणि आनंदोत्सवाचे वातावरण पाहायला मिळाले. कार्यक्रमस्थळी पोहोचल्यावर येरुळे दांपत्याचे नातेवाईकांकडून औक्षण करण्यात आले आणि फटाक्यांच्या गजरात, फुलांच्या वर्षावात मंचावर सन्मानाने आणण्यात आले. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्रांत अधिकारी डॉ. भूषण अहिरे होते. मंचावर मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम अधिक भारदस्त झाला. व्यासपीठावर प्रांत अधिकारी विनय गोसावी, तहसीलदार विजय बनसोडे, नगरपालिका प्रशासक मंगेश देवरे, शंकर अप्पा येरुळे, चंद्रकांत द्वासे, उमाकांत येरुळे, चंद्रकांत येरुळे, मानीक निला, मन्मथ आप्पा फास्के, डॉ. विजयकुमार द्वासे, मल्लिकार्जुन गिरवलकर, अशोक तोंडारे, अतुल फास्के, आदित्यराज येरुळे, सौ. अपूर्वा फास्के, निवृत्त जिल्हा प्लॅनिंग अधिकारी प्रतापराव पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दीपकसिंग राजपूत, माजी जि.प. सदस्य भुरा आप्पा पाटील, नानासाहेब देशमुख (भडगाव), राजाराम सोनार, डॉ. सागर गरुड, डी.डी. पाटील, सौ. हिरा गिरवलकर, सौ. योजना पाटील, सचिन सोमवंशी, राजधर पांढरे, शिवव्याख्याते सुनील पाटील, शेख रसूल उस्मान, पत्रकार संदीप महाजन, प्रा. सी. एन. चौधरी, अनिल येवले, राजू खैरनार, शांताराम चौधरी, पोलीस निरीक्षक अशोक पवार, सचिन सानप आदी मान्यवर उपस्थित होते. या समारंभात अनेकांनी आपले मनोगत व्यक्त करत येरुळे यांच्या कर्तृत्वाचा गौरव केला. चंद्रकांत द्वासे, डॉ. विजयकुमार द्वासे, आदित्यराज येरुळे, सौ. अपूर्वा फास्के, सचिन सोमवंशी, राजधर पांढरे, निवृत्त प्राचार्य सुनील पाटील, पोलीस कॉन्स्टेबल राहुल सोनवणे, स्थानिक गुन्हे शाखेचे लक्ष्मण पाटील, ईश्वर पाटील, शेख रसूल उस्मान, पत्रकार संदीप महाजन, सुनील पाटील, राहुल सोनवणे आदींनी येरुळे यांच्याबद्दलच्या आपल्या भावना मांडत त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी येरुळे यांच्या सुपुत्र आदित्यराज येरुळे व कन्या सौ. अपूर्वा फास्के यांनी आपल्या वडिलांच्या सेवेचा मागोवा घेत एक अनोखा आणि भावनिक सादरीकरण केले. महाराष्ट्र राज्याच्या नकाशात वडिलांनी सेवा बजावलेल्या ठिकाणांचा कल्पक उल्लेख करत ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या पोलीस खात्याच्या घोषवाक्यास अनुसरून त्यांची कार्यकिर्द उभी केली. याशिवाय वैष्णवी दातीर हिने धनंजय येरुळे यांचे सुंदर स्केच तयार करून त्यांना भेट दिले. या सर्व सादरीकरणांनी उपस्थितांचे मन भरून आले. विशेष आकर्षण ठरली ती एक हृदयस्पर्शी व्हिडीओ क्लिप, जी येरुळे दांपत्याच्या कर्तृत्वमय प्रवासावर आधारित होती. अपूर्वा फास्के आणि आदित्यराज येरुळे यांनी ती व्हिडीओ तयार करून उपस्थितांसमोर दाखवली. या व्हिडीओने उपस्थितांना भावनाविवश केले. या सोहळ्याला उत्तर देताना धनंजय येरुळे यांनी आपल्या सेवाजिवनाचा आढावा घेतला. उपनिरीक्षक पदापासून सुरुवात करून डीवायएसपी पदापर्यंतचा प्रवास त्यांनी सुस्पष्ट आणि मार्मिक शब्दांत मांडला. त्यांनी आपल्या नोकरीदरम्यान तपासलेल्या महत्त्वपूर्ण गुन्ह्यांचा, कडक निर्णयांचा, आणि तडफदार कामगिरीचा उल्लेख करून अनेक आठवणींना उजाळा दिला. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या सहकार्यामुळेच आपण यशस्वी सेवा करू शकलो असे नमूद केले. या सोहळ्याचे प्रास्ताविक पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी केले. प्रा. सी. एन. चौधरी व प्रा. शिवाजी शिंदे यांनी सुरेख सूत्रसंचालन केले. समारोपाप्रसंगी आदित्यराज येरुळे यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून उपस्थितांप्रती आभार व्यक्त केले. राष्ट्रगीताने या समारंभाची सांगता झाली. या संपूर्ण सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. उत्साही मिरवणूक, शिस्तबद्ध कार्यक्रम, सन्मानाचे वातावरण, आणि भावनांनी भरलेली सादरीकरणे यांनी येरुळे यांच्या सेवानिवृत्ती समारंभाला संस्मरणीय बनवले. धनंजय येरुळे यांनी आपल्या सेवाजिवनात नेहमीच नियमप्रियता, कर्तव्यनिष्ठा, धैर्य, आणि माणुसकी या मूल्यांना जपले. त्यांच्या सेवानिवृत्तीने पोलीस दलातील एक अभ्यासू, शिस्तप्रिय, व कर्मठ अधिकारी निवृत्त झाला आहे, पण त्यांच्या कार्याची प्रेरणा अनेक पोलीस अधिकारी व नवतरुणांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.