पाचोरा- शहरातील देशमुखवाडी भागातील ‘विघ्नहर्ता मेडिकल’चे संचालक निशिकांत साळुंखे (प्रसिद्ध नाव नंदू दादा) यांचे दिनांक 6 जुलै 2025 रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून वैद्यकीय क्षेत्रासह सामाजिक व व्यापारी वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे.
निशिकांत साळुंखे हे गेल्या अनेक वर्षांपासून पाचोरा शहरात औषध व्यवसायात कार्यरत होते. ‘विघ्नहर्ता मेडिकल’ या नावाने त्यांनी आपल्या व्यवसायाची स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. ग्राहकांशी सौहार्दपूर्ण व्यवहार, गरजू रुग्णांना वेळोवेळी दिलेला वैद्यकीय सहाय्य, आणि सामाजिक बांधिलकी जपत केलेली मदत या गुणांमुळे ते संपूर्ण परिसरात लोकप्रिय होते. ‘नंदू दादा’ या नावाने ते तरुणांमध्ये विशेष ओळखले जात असत.
त्यांच्या निधनामुळे पाचोऱ्यातील व्यापारी, डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने त्यांच्या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी दाखल झाले होते. अनेकांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून देखील त्यांच्याविषयी आपल्या भावना व्यक्त करत शोकसंदेश दिले आहेत. त्यांच्या निधनाने वैद्यकीय व्यवसायात एक प्रामाणिक, परिश्रमी आणि माणुसकी जपणारा चेहरा हरपल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. साळुंखे कुटुंब हे पाचोऱ्यात शैक्षणिक,सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सक्रीय सहभागी असलेले घराणे असून नंदू दादा हे अनेक उपक्रमांमध्ये अग्रभागी राहून मदतीस तत्पर असायचे. त्यांच्या सौम्य स्वभावामुळे आणि सामाजिक जाणीवेच्या दृष्टिकोनामुळे त्यांचा मोठा मित्रपरिवार तयार झाला होता. कोणत्याही प्रसंगी ते आपलेपणाने लोकांच्या मदतीला धावून जात असत. त्यांच्या जाण्याने साळुंखे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
त्यांची अंत्ययात्रा आज दिनांक 07 जुलै 2025 रोजी, सोमवार, सकाळी 10.30 वाजता त्यांच्याच राहत्या घरून पुनगाव रोडवरील आशीर्वाद ड्रीम सिटी येथून मार्गस्थ होणार आहे.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.