जग जिंकण्याची महत्त्वाकांक्षा माणसाच्या स्वभावातच आहे. प्रत्येकजण आपल्या परीने यशस्वी व्हायचा प्रयत्न करत असतो. कुणी पैसा कमावतो, कुणी प्रसिद्धी, कुणी सत्तेच्या शिखरावर पोहोचतो. पण या सर्व प्रवासात जेव्हा आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यावर माणूस पोहोचतो, तेव्हा त्याच्या हातात उरलेली शिल्लक ही केवळ आठवणींची, माणुसकीची, प्रेमाची आणि केलेल्या सत्कर्मांचीच असते. याच विचाराला अधोरेखित करत इतिहासातला एक थोर विजेता सिकंदर शेवटी मृत्यूच्या क्षणी सांगतो – “माझे दोन्ही हात शवपेटीतून बाहेर ठेवा, जेणेकरून जगाला कळावे की मी संपूर्ण जग जिंकलं, पण जाताना रिकाम्या हातानेच गेलो.” हे शब्द केवळ शोकांतिक नाहीत, तर ते संपूर्ण जीवनदर्शनाचे गूढ उलगडणारे आहेत.
आयुष्य म्हणजे एक गणित आहे, पण हे गणित नेहमीच चुकीचं वाटतं कारण आपण त्यात योग्य चिन्ह वापरत नाही. जीवनात बेरीज करायची असते चांगल्या नात्यांची, सवयींची, गुणांची. वजाबाकी करावी लागते द्वेषाची, मत्सराची, अहंकाराची. गुणाकार करावा लागतो परिश्रमाचा, श्रद्धेचा, संयमाचा आणि भागाकार करावा लागतो अनुभवाचा, ज्ञानाचा, आनंदाचा. पण आपण अनेकदा यात गोंधळ करतो. ज्याची वजाबाकी हवी, त्याची बेरीज करतो. ज्याचा भागाकार हवा, त्याचा गुणाकार करतो. परिणामी, उत्तर नेहमीच मनाविरुद्ध येते आणि आपण म्हणतो, ‘आयुष्याचे गणित चुकले’. पण आयुष्य कधी चुकत नाही, चुकतो तो आपला दृष्टिकोन.
अनुभव सांगतो की माणसे पारखताना भावनांपेक्षा निरीक्षणावर, कृतीवर आणि वेळेवर आधारित विचार करावा. चांगल्या दिवसांत सर्वजण जवळ असतात, पण कठीण प्रसंगात कोण उभं राहतं, हेच खरे माणूस ओळखण्याचे कसोटीदर्शक तत्त्व असते. “स्वार्थी लोक फुलासारखे असतात, सुगंध असेपर्यंत जवळ राहतात” – हीच खरी भावना समाजात आजच्या घडीला दिसून येते. म्हणून अनुभवाशिवाय कोणाच्याही शब्दांवर विसंबून चालत नाही. मैत्री असो, नाते असो, व्यवहार असो, अनुभव हेच खरे आरसे असतात.
आजच्या भौतिकवादी युगात आपण जग जिंकण्याच्या नादात हृदयं गमावतो आहोत. सामाजिक माध्यमांवर हजारो मित्र आहेत, पण प्रत्यक्ष संकटात फोन उचलणाराही नसतो. एकत्र फोटो काढणारे असंख्य, पण एकत्र दुःख वाटणारे कुठे हरवले? म्हणूनच पैसा कमवला , जग जिंकलं म्हणजे यशस्वी झालो, ही कल्पना चुकीची आहे. खरे यश म्हणजे हृदयं जिंकणे. कोणी एखाद्या वृद्ध मातेला औषधं देऊन तिचा आशीर्वाद मिळवतो, कोणी शेतकऱ्याला शेतीसाठी मदत करून त्याचे आयुष्य बदलतो, कोणी विद्यार्थ्याला पुस्तकं देऊन त्याच्या स्वप्नांना दिशा देतो – हाच खरा विजय असतो. कारण अशा माणसाच्या नावाचा उच्चार करताना डोळ्यांत कृतज्ञतेची नमी दिसते.
कधी कधी वाटतं, आयुष्याची किंमत आपण चुकीच्या मापाने मोजतो. पैशाच्या राशीत माणूस शोधतो, पण एकटा पडल्यावर समजतं की माणूस असणं हीच खरी संपत्ती आहे. एक उदाहरण घ्या – एखाद्या गावात श्रीमंत व्यापारी राहतो, त्याच्या घरी गाड्या, नोकरचाकर, ऐशआराम सर्व काही असतं. पण मृत्यूच्या वेळी त्याच्या डोळ्यांत फक्त पोकळी असते, कारण त्याने आयुष्यभर माणसं गमावली. दुसरीकडे एक शिक्षक असतो, ज्याचं स्वतःचं घरही डागडुजीचं असतं. पण त्याच्या शिष्यांनी मिळवलेले यश, समाजात त्याच्याबद्दल असलेला सन्मान, आणि शेवटच्या क्षणी त्याच्या खांद्याला खांदा लावणारे शेकडो हात – ही त्याची खरी संपत्ती असते.
यावर एक सुंदर शायरी आठवते
“कुछ ऐसा करो कि जाने के बाद भी,
लोग तुम्हारे नाम से मुस्कुराएं।
दौलत तो सब कमा लेते हैं,
मगर दिलों को जीतना सबके बस की बात नहीं।”
आपण आपल्या मुलांना किती पैसे देऊ शकलो, याचं मोजमाप समाज करत नाही, पण आपण किती प्रेम दिलं, किती वेळ दिला, किती मूल्य शिकवलं – यावरच त्यांच्या आयुष्याची घडण अवलंबून असते. घरात जेवण असावं, पण प्रेमाचं ताटही वाढलं पाहिजे. शिक्षण असावं, पण संस्कारांची शिदोरी त्याहून महत्त्वाची आहे. आणि म्हणूनच आपण ‘संपत्ती’ कमवणं थांबवून ‘संपर्क’ कमवायला हवे.
जीवन हे क्षणभंगुर आहे. शरीर सुंदर असो वा कुरूप, धनाढ्य असो वा गरीब – अखेर मृत्यू एकसमानच. यमराज आहे की नाही? स्वर्ग – नरक आहे की नाही हे मला माहीत नाही व कोणी ते पहिले देखील नाही परंतु हे सर्व बघायला मिळते ते मनुष्य मृत झाल्यानंतर त्याच्याच कर्मभूमीवर कारण शेवटी समाज हे विचारत नाहीत की बँक बॅलन्स किती आहे, ते पाहतात की मनुष्यानं कोणकोणाच्या जीवनात प्रकाश आणला? कोणाची मदत केली? कोणासाठी उभा राहिला? म्हणून माणूस म्हणून जगावं, तेही इतकं ताकदीने की, की मृत्यूही म्हणेल – “अरे, हा जीव अगदी हृदय जिंकून आला!”
आपल्या समाजात संतांच्या जीवनाकडे पाहिलं, तर ते कधीच सिंहासनावर नव्हते, पण लाखो हृदयं त्यांच्या पायाशी होती. संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेव – हे कुणी मोठ्या कॉलेजातून शिकलेले नव्हते, पण त्यांच्या शब्दांनी समाज घडला, हृदयं जिंकली. यामध्येच यशाचं खरं गमक आहे.
“जग जिंकल्याचा मोठेपणा काय सांगतो,
जर हृदय गमावलं असेल तर?
सिंहासन मिळालं, पण नातं हरवलं
तर यशाचं काय अर्थ आहे खरं?”
जीवनाचं अंतिम सत्य हे आहे की, एक दिवस आपण सगळेच निघून जाणार आहोत. पण आपल्या मागे उरणार आहे ती आपली आठवण. म्हणून ती अशी असावी की, लोक म्हणावे – “हा माणूस खूप काही करून गेला, रिकाम्या हाताने गेला खरं, पण हृदयं भरून गेला.”
आपल्याला विचार करावा लागेल की आपण दररोज काय कमावत आहोत – पैसा की प्रेम? पद की प्रतिष्ठा? अहंकार की आत्मसंतोष? कारण यशस्वी होणं हे निव्वळ परिणाम नसून, एक प्रवास आहे – मूल्यांचा, माणुसकीचा, आणि आत्मिक उन्नतीचा.
शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं –
“पैसा हेच जर सगळं असतं,
तर मृत्यूच्या क्षणी माणूस रडत नसता.
माणुसकी, प्रेम आणि आपुलकी –
हीच खरी कमाई असते, बाकी सर्व फसवणूक असते.”
जग जिंका जरूर, पण हृदयं हरवू नका. कारण शेवटी जिंकलेली हृदयं हीच तुमचं खरं साम्राज्य असतात. आणि म्हणूनच – “जग जिंकूनही सिंकंदर रिकाम्या हातानेच गेला होता!”
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.