पाचोरा – शहर पोलीस ठाण्याचे माजी पोलिस निरीक्षक अशोक कचरू पवार यांची नुकतीच बदली करण्यात आली असून या निर्णयामागील पार्श्वभूमी आणि त्याचे पडसाद सध्या शहरात चर्चेचा विषय ठरत आहेत.
एकीकडे महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना, दुसरीकडे पाचोरा बसस्थानकावर घडलेली अति गूढ आणि गंभीर स्वरूपाची गोळीबाराची घटना, ज्यात एका तरुणाचा मृत्यू झाला, या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडवली होती. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी तातडीने निर्णय घेत पवार यांची बदली केली असून, बदली आदेशातही “कायद्याची व सुव्यवस्थेची गरज” या कारणाचा स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे.मात्र, या बदलाच्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी खाजगी पातळीवर याचे श्रेय स्वतःकडे घेण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, ज्या काही व्यक्तींनी माजी निरीक्षक यांच्या निलंबनाची मागणी केली होती, त्यांचं आता पोलीस ठाण्यात वारंवार विनाकारण येणं-जाणं वाढले असून, तासन्तास पोलीस ठाण्यात व पोलीस ठाण्याच्या परिसरात त्यांचा वावर दिसून येतो. “आमच्या आंदोलनामुळेच बदली झाली” अशा प्रकारचा टेंभा मारत पोलीस ठाण्यातील वातावरणावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न काहीजण करत असल्याचेही बोलले जात आहे.
दुसरीकडे, माजी निरीक्षक अशोक पवार यांच्या जागी नियुक्त झालेले विद्यमान पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांनी पदभार स्वीकारताच अष्टपैलू कार्यशैलीने जनतेचा विश्वास संपादन करण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या विविध सकारात्मक उपक्रमांची चर्चा सर्वत्र होत असून, विविध सामाजिक स्तरांतून त्यांचे कौतुकही होत आहे.या पार्श्वभूमीवर स्थानिक स्तरावरून चिंता व्यक्त होत आहे की, काही मंडळींच्या अशा अनावश्यक छटांमध्ये रंगलेल्या हस्तक्षेपामुळे पोलीस प्रशासनातील गटबाजी सारख्या प्रवृत्ती पुन्हा डोके वर काढू शकतात. त्यामुळे कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि पोलीस अधिकाऱ्यांना निर्भयपणे काम करता यावे यासाठी, अशा हस्तक्षेपांना त्वरित लगाम घालणे गरजेचे असल्याचे सुजाण नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.