पाचोरा- पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात २० जुलै २०२५ रोजी रात्रीपासून २१ जुलैच्या पहाटेपर्यंत करण्यात आलेल्या नियमित गस्तीदरम्यान पोलिसांनी घरफोडीच्या तयारीत असलेल्या संशयित इसमास रंगेहाथ पकडून त्याच्याकडून चोरीचे साहित्य जप्त केले. त्यानंतर पुढील तपासादरम्यान त्याच आरोपीकडून दोन स्वतंत्र चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले असून, यामध्ये चोरीस गेलेली मोटारसायकल देखील हस्तगत करण्यात आली आहे. या कामगिरीमुळे पाचोरा पोलीस ठाण्याच्या कार्यपद्धतीवर नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. दिनांक २० जुलै २०२५ रोजी रात्री ११ वाजल्यापासून ते २१ जुलै रोजी पहाटे ५ वाजेपर्यंत पाचोरा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात रात्र गस्त सुरू होती. गस्तीदरम्यान पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे यांच्या नेतृत्वाखालील पथकात सफौ/२६५८ रणजित देवसिंग पाटील, पोहेकॉ/०६२५ राहुल काशिनाथ शिंपी, पोकॉ/१२३० योगेश सुरेश पाटील, पोकॉ/१४२२ शरद मांगो पाटील, पोकॉ/१९०७ कमलेश शांताराम पाटील, पोकों/२३३० संदीप पाटील आणि पोकॉ/१४०९ हरीष कनीराम परदेशी सहभागी होते. या पथकाने गस्तीदरम्यान पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास जारगाव चौफुली परिसरात एक इसम पोलिसांना पाहून संशयास्पद हालचाली करीत असल्याचे निदर्शनास आणले. पोलिसांनी तत्काळ दक्षता दाखवत त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे यांनी त्यास विश्वासात घेत विचारणा केली असता त्याने आपले नाव कुलदिपसिंग सतपालसिंग बावरी, वय २३ वर्षे, रा. कजगाव, ता. भडगाव, जि. जळगाव असे सांगितले. त्याच्या जवळ असलेल्या बॅगेची पोलिसांनी झडती घेतली असता, त्यात घरफोडीसाठी वापरले जाणारे विविध धारधार आणि अनकुचीदार हत्यारे जप्त करण्यात आली. यामध्ये एक लोखंडी सुरा, दोन लोखंडी चिमटे, एक लोखंडी टी-आकाराचे हत्यार आणि एक लोखंडी कात्री असा संशयास्पद साहित्य समाविष्ट होता. सदर साहित्य पाहता त्याने घरफोडीच्या उद्देशाने यांची बेकायदेशीररीत्या वाहतूक केली असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी त्यास पाचोरा पोलीस ठाण्यात आणले व त्याच्याविरुद्ध गुन्हा रजि. क्र. ३५६/२०२५ अन्वये महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १२२(क) आणि भारतीय शस्त्र अधिनियमाच्या कलम ४, २५ अन्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास पोना/३१३६ महेंद्र प्रकाश पाटील करत आहेत. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान आणखी एक धक्कादायक बाब समोर आली. आरोपी कुलदिपसिंग बावरी याने काही काळापूर्वी पाचोरा तालुक्यातील लासगाव येथे मोटारसायकल चोरी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार त्याच्याविरुद्ध पाचोरा पोलीस ठाण्यात गु. रजि. क्र. ३५८/२०२५, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२), ३ (५) अन्वये दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून ४०,००० रुपये किमतीची हिरो कंपनीची फॅशन प्रो, लाल रंगाची, क्रमांक MH-19 BV-8763 ही चोरीस गेलेली मोटारसायकल हस्तगत केली. सदर प्रकरणाचा तपास पोहेकॉ/१०५८ वसीम सलीम शेख करत आहेत. यापुढे तपास अधिक खोलवर सुरू असतानाच तिसऱ्या गुन्ह्याचाही छडा लागला. आरोपी कुलदिपसिंग बावरी याने पाचोरा शहरातील गिरणा पंपींग रोड येथील एका घरात चोरी केल्याची माहिती तपासात समोर आली. त्यानुसार त्याच्यावर पाचोरा पोलीस ठाण्यात गु. रजि. क्र. ३३७/२०२५, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०५ (अ) अन्वये आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला असून, या गुन्ह्याचा तपास सफौ/२६५८ रणजित देवसिंग पाटील करत आहेत. या तीनही गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी दाखवलेली सतर्कता, चातुर्य आणि तत्परता ही उल्लेखनीय असून, एका संशयास्पद व्यक्तीस तात्काळ अटक करून त्याच्याविरुद्ध तीन स्वतंत्र गुन्ह्यांचा पर्दाफाश करण्यात पाचोरा पोलीस यशस्वी ठरले आहेत. ही संपूर्ण कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक (चाळीसगाव परिमंडळ) श्रीमती कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अरुण आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. राहुलकुमार पवार यांच्या नेतृत्वात पार पडली. या कारवाईत प्रत्यक्ष सहभाग घेणाऱ्या पोउपनिरीक्षक योगेश गणगे, सफौ रणजित पाटील, पोहेकॉ राहुल शिंपी, पोकॉ योगेश पाटील, शरद पाटील, कमलेश पाटील, संदीप पाटील आणि हरीष परदेशी या सर्वांच्या कार्याचे विशेष कौतुक करण्यात येत आहे. पाचोरा शहरासह तालुक्यात सध्या विविध ठिकाणी चोरी व घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत पोलिसांनी केलेली ही कामगिरी केवळ गुन्हेगारांना रोखण्यासाठीच नाही, तर नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठीही अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. पोलिसांची नियमित गस्त, सतर्क निरीक्षण आणि तत्काळ कारवाई यामुळे भविष्यात अशा गुन्ह्यांवर प्रतिबंध घालण्यात मदत होईल, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांतून व्यक्त होत आहे. या प्रकरणातील पुढील तपास पूर्ण होताच आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करून न्याय मिळविण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. दरम्यान, या कारवाईमुळे पाचोरा पोलीस ठाण्याचे गुन्हे अन्वेषण पथक पुन्हा एकदा चर्चेत आले असून, त्यांच्या कार्यशैलीला जिल्ह्यातूनही प्रशंसा मिळत आहे.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.