माऊली फाउंडेशनचा ५०१ वृक्ष लागवड व संगोपन संकल्प : पर्यावरण संरक्षणासाठी व्यापक उपक्रमांचे भव्य पाऊल

0

Loading

भडगाव – आजच्या बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी समाजातील विविध संस्था आणि नागरिकांनी पुढाकार घेणे गरजेचे झाले आहे. याच भावनेतून प्रेरित होत, माऊली फाउंडेशन या सामाजिक संस्थेने २०२५ या वर्षात ५०१ वृक्ष लागवड व संगोपन संकल्प हाती घेतला आहे. फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मनोहर सूर्यवंशी यांच्या प्रेरणादायी संकल्पनेतून या अभियानाची सुरुवात झाली असून, या उपक्रमाला भडगाव तालुक्यातील सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. या वृक्षारोपण व संगोपन उपक्रमाचा शुभारंभ नुकताच साई समर्थ मतीमंद शाळा, नाचणखेडा रोड, भडगाव येथे झाला. या उद्घाटनप्रसंगी माऊली फाउंडेशनचे उपाध्यक्ष युवराज सूर्यवंशी, संचालिका संगिता जाधव, जनमंच संस्थाध्यक्ष शिवराम पाटील, शेतकरी संघ संचालिका व नगरसेविका योजना पाटील, तसेच मोरसिंग राठोड, निलेश मालपुरे, शांताराम पाटील, गुलाबसिंग पाटील, राजेश वाघ, साई समर्थ मतीमंद शाळेचे अधीक्षक आणि माऊली फाउंडेशनचा समर्पित सहकारी वृंद हे सर्वजण प्रमुख उपस्थित होते. उद्घाटनप्रसंगी परिसरात विविध प्रजातींच्या झाडांची लागवड करण्यात आली. विशेष म्हणजे, फक्त लागवडीपुरतेच हे कार्य मर्यादित न राहता, त्या झाडांचे नियमित संगोपन व संवर्धन करण्याचा संकल्पही या फाउंडेशनने केला आहे. “सजीव सृष्टी टिकवायची असेल तर निसर्ग व पर्यावरणाचे संतुलन राखणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी वृक्षलागवड ही काळाची गरज आहे. पण त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे त्यांचे संगोपन.” – असे विचार या वेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. या संकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे माऊली फाउंडेशन फक्त वृक्षारोपण करून थांबत नाही, तर त्या झाडांची वाढ, संरक्षण व निगा यासाठी विशेष समिती स्थापणार आहे. प्रत्येक झाडाचे दत्तकत्व स्थानिक स्वयंसेवकांना देण्यात येणार असून त्याच्या वाढीचा कालावधी, देखरेख आणि त्यावर होणाऱ्या बदलांचा लेखाजोखा ठेवण्याचे नियोजन आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक मनोहर सूर्यवंशी होते. आपल्या मनोगतात त्यांनी सांगितले की, “आपल्या देशात दरवर्षी लाखो झाडे लावली जातात. परंतु त्यातील फारच थोड्या झाडांचे संगोपन होते. म्हणूनच आमच्या फाउंडेशनने केवळ वृक्ष लागवड न करता ‘संगोपन’ या शब्दाला सुद्धा समान महत्त्व देत ५०१ झाडांच्या संगोपनाची जबाबदारी घेतली आहे. हे झाडे केवळ पर्यावरणच नव्हे तर भविष्यातील पिढ्यांचे आरोग्य, हवामानाचे संतुलन आणि जैवविविधतेचे रक्षण करणारे ठरणार आहेत.” कार्यक्रमात उपाध्यक्ष युवराज सूर्यवंशी यांनी सांगितले की, “माऊली फाउंडेशन गेल्या अनेक वर्षांपासून समाजोपयोगी उपक्रम राबवत आहे. यामध्ये आरोग्य तपासणी शिबिरे, रक्तदान शिबिरे, शैक्षणिक साहित्य वाटप, विशेष विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रम असे विविध उपक्रम सतत राबवले जातात. आता पर्यावरण रक्षणासाठी फाउंडेशनने हे भव्य पाऊल उचलले असून हे फक्त एक दिवसाचे काम नाही, तर हे एक दीर्घकालीन अभियान आहे. यातूनच खरी सामाजिक जबाबदारी पार पाडली जाणार आहे.” संचालिका संगिता जाधव यांनी भावनिक शब्दांत सांगितले, “या वृक्षांची काळजी घेणे ही आपली स्वतःची जबाबदारी आहे. झाडे लावून फोटो काढणे ही काही शेवटची प्रक्रिया नाही, तर त्यांच्याबरोबर आपल्या मनाचे नाते निर्माण होणे आणि त्यांना जिवंत ठेवणे हाच खरा मानवतेचा खरा धर्म आहे.” नगरसेविका योजना पाटील यांनी सांगितले, “भडगावसारख्या ग्रामीण भागात वृक्ष लागवडीचा मोठा फायदा होतो. जलसंधारण, जमिनीत आर्द्रता टिकवणे, पक्ष्यांना आश्रय देणे, शुद्ध हवा यासाठी ही झाडे उपयुक्त ठरतात. माऊली फाउंडेशनचा हा उपक्रम खरंच कौतुकास्पद असून नगरपरिषदही भविष्यात यासाठी सहकार्य करण्यास तयार आहे.” शिवराम पाटील, मोरसिंग राठोड, निलेश मालपुरे, शांताराम पाटील, गुलाबसिंग पाटील, राजेश वाघ यांनीही आपले विचार व्यक्त करताना नागरिकांनी या अभियानात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. विशेषतः शालेय विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागृती निर्माण होण्यासाठी या प्रकारचे उपक्रम आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमात साई समर्थ मतीमंद शाळेचे अधीक्षक यांनी शाळेच्या वतीने वृक्षांचे रक्षण व संगोपन करण्याचा निर्धार व्यक्त केला. मतीमंद विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अशी कृतीतून शिकण्याची संधी मिळते आणि निसर्गाशी आत्मीय नाते निर्माण होते, असे त्यांनी नमूद केले. माऊली फाउंडेशनच्या या अभियानाची पुढील टप्प्यात भडगाव तालुक्यातील विविध गावांमध्ये विस्तार होणार असून शासकीय व खाजगी शाळा, महाविद्यालये, मंदिर परिसर, शासकीय कार्यालयांचे आवार, तसेच सार्वजनिक रस्त्यांच्या कडेला झाडे लावण्याचे नियोजन करण्यात येत आहे. या झाडांसाठी जलसिंचन, कुंपण व्यवस्था, खत व्यवस्थापन याचीही आखणी करण्यात आली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, वृक्ष लागवड अभियानाबरोबरच माऊली फाउंडेशन लवकरच रक्तदान शिबिर, मोफत रोगनिदान तपासणी शिबिर, महिलांसाठी आरोग्य जागर, युवकांसाठी नशाबंदी जनजागृती मोहीम, तसेच स्वच्छता अभियान हेही कार्यक्रम भडगाव तालुक्यात राबवणार आहे. त्यामुळे हे फक्त वृक्ष लागवडीपुरते मर्यादित न राहता, सर्वांगीण सामाजिक प्रबोधनाचे व पर्यावरण जागृतीचे उदाहरण ठरणार आहे. समारोपाच्या क्षणी संस्थेचे अध्यक्ष मनोहर सूर्यवंशी यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. त्यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, “या अभियानात प्रत्येकाने एक झाड दत्तक घेऊन त्याच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारावी. हे झाड तुमच्या मुलासारखे वाढवा, कारण हे झाडच उद्याचे प्राणवायू निर्माण करणारे यंत्र आहे.” एकूणच, माऊली फाउंडेशनचा ५०१ वृक्ष लागवड व संगोपन संकल्प हा केवळ एक उपक्रम नसून, ही एक सामाजिक चळवळ आहे. ही चळवळ पर्यावरणरक्षणाच्या दिशेने भडगाव तालुक्याला नवा मार्ग दाखवेल, यात शंका नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here