पाचोरा तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनासाठी नियोजनपूर्व बैठक उत्साहात संपन्न

0

Loading

पाचोरा – तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांच्या अंगी असलेल्या क्रीडा कौशल्याला व्यासपीठ मिळवून देण्यासाठी सन २०२५-२६ मध्ये होणाऱ्या तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन भव्य स्वरूपात करण्याच्या दृष्टीने श्री एस.एस.एम.एम. महाविद्यालय, पाचोरा येथे एक महत्वपूर्ण व नियोजनात्मक बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीस तालुक्यातील विविध शाळांमधील क्रीडा शिक्षकांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रा. एस.एस. पाटील (उपप्राचार्य, एस.एस.एम.एम. महाविद्यालय) हे होते. तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक एन.आर. ठाकरे, महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. जे.पी. बडगुजर, तालुका क्रीडा समन्वयक प्रा. गिरीश पाटील, तसेच मुख्याध्यापक सुरवाडे सर, मुख्याध्यापक धोनी सर, मुख्याध्यापक पिंजारी सर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी तालुका क्रीडा समितीचे सदस्य गणेश पाटील, एस.के. पाटील, सुभाष राठोड व प्रा. वाल्मीक पाटील हे मान्यवरही उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. सभेच्या निमित्ताने काही नव्या जबाबदाऱ्या आणि नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. गणेश पाटील आणि गजानन सोमवंशी यांची मुख्याध्यापक पदावर नेमणूक झाल्याबद्दल सर्वांनी टाळ्यांच्या गजरात अभिनंदन केले. त्याचप्रमाणे चंद्रभान शिंदे यांची RSP (Road Safety Patrol) म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. याचप्रमाणे महाविद्यालयात स्पोर्ट्स कोट्यातून नुकतीच नियुक्त झालेल्या प्राध्यापिका ऋतुजा जोशी यांचा देखील पुष्पगुच्छ देऊन क्रीडा समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. या बैठकीचे प्रमुख आकर्षण ठरले ते मुख्याध्यापक एन.आर. ठाकरे यांचे सामाजिक वास्तव आणि शिक्षणातील क्रीडाविभागाच्या महत्वावर केलेले विचारमंथन. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “क्रीडा शिक्षक हा शाळेचा आत्मा असतो. तो विद्यार्थ्यांचे केवळ खेळात प्रशिक्षण देत नाही तर शिस्त, टीमवर्क, नेतृत्व आणि परिश्रम या मुल्यांचाही विकास करतो.” त्यांनी आजच्या विद्यार्थ्यांची मोबाईलच्या आहारी गेलेली जीवनशैली हा एक गंभीर सामाजिक प्रश्न म्हणून उपस्थित करत क्रीडा आणि मैदानी उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शरीरसंपदा, मानसिक संतुलन व सकारात्मकता निर्माण होते हे अधोरेखित केले. स्पर्धा पारदर्शक आणि निपक्षपाती पद्धतीने घेतल्या गेल्या पाहिजेत, असा ठाम आग्रहही त्यांनी व्यक्त केला. त्यानंतर तालुका क्रीडा समन्वयक प्रा. गिरीश पाटील यांनी आपल्या सविस्तर मार्गदर्शनातून उपस्थित क्रीडा शिक्षकांना येणाऱ्या शैक्षणिक वर्षातील तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांचे स्वरूप, नियोजन, प्रक्रिया याविषयी माहिती दिली. त्यांनी सांगितले की, “या वर्षी पाचोरा तालुकास्तरावर एकूण १० प्रकारांच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. शाळा, खेळाडू आणि संघ नोंदणीसाठी ऑनलाइन प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे.” यामध्ये खेळाडू इम्पोर्ट प्रक्रिया, मागील वर्षाची प्राविण्य प्रमाणपत्रे डाऊनलोड करणे, तसेच प्रत्येक खेळाचे नियम व शिस्तबद्ध संचालन याविषयीचे तांत्रिक आणि व्यावहारिक मार्गदर्शन त्यांनी दिले. प्रा. गिरीश पाटील यांनी सर्व शाळांनी आणि महाविद्यालयांनी या स्पर्धांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांचा सहभाग मोठ्या संख्येने नोंदवावा, जेणेकरून सर्व ग्रामीण आणि निमशहरी भागातील गुणी खेळाडूंना संधी उपलब्ध होईल, असे आवाहनही केले. “क्रीडांगण हीच खरी प्रयोगशाळा आहे जिथे खेळाडू स्वतःला घडवतो, हरतो, जिंकतो आणि आयुष्याला आकार देतो,” असे उद्गार त्यांनी यावेळी काढले. या बैठकीला तालुक्यातील जवळपास सर्वच शाळांतील क्रीडा शिक्षक आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष राठोड यांनी अतिशय नेटकेपणाने केले. त्यांनी प्रत्येक मान्यवराला योग्य त्या पद्धतीने बोलते करून कार्यक्रमात सुसूत्रता राखली. तर आभार प्रदर्शन प्रा. वाल्मीक पाटील यांनी करत उपस्थित मान्यवरांचे आणि सहभागी शिक्षकांचे मन:पूर्वक आभार मानले. सभेचा संपूर्ण प्रवास अत्यंत सौहार्दपूर्ण आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला. शाळेतील क्रीडा शिक्षक एकत्र येऊन काम करत असल्यामुळे एक सकारात्मक ऊर्जा सभागृहात जाणवत होती. बैठकीत अनेकांनी आपले अनुभव, अडचणी आणि सूचना मोकळेपणाने मांडल्या. एकमेकांच्या सहकार्याने अधिकाधिक खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सर्वांनी एकत्र काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला. या बैठकीद्वारे केवळ आगामी क्रीडा स्पर्धांचे नियोजन झाले नाही, तर शिक्षकांमध्ये संवाद, सहकार्य आणि सशक्त तालुका क्रीडा यंत्रणा उभी करण्याची चळवळही रुजलेली दिसून आली. ग्रामीण भागातील विद्यार्थी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्यासाठी ही एक महत्त्वाची पायरी ठरावी, अशी अपेक्षा सर्वांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here