पाचोरा – शहरातील सामाजिक, आर्थिकदृष्ट्या दुर्बल वस्तीमधून शिक्षणाची एक नवी उमेद निर्माण करणाऱ्या कु. राजनंदिनी खैरे हिने शासकीय जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत घवघवीत यश संपादन करून पाचोरा तालुक्याच्या शैक्षणिक इतिहासात एक नवे पान जोडले आहे. श्री. गो. से. हायस्कूल पाचोरा या नामवंत शाळेच्या इयत्ता पाचवी ‘क’ वर्गातील ही विद्यार्थिनी 18 जानेवारी 2025 रोजी झालेल्या नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत यशस्वी झाली असून तिची निवड जवाहर नवोदय विद्यालयासाठी निश्चित झाली आहे. या यशस्वी विद्यार्थिनीचा शाळेचे मुख्याध्यापक नरेंद्र पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कु. राजनंदिनी भीमराव खैरे ही सौ. सुवर्णा व भीमराव आनंद खैरे यांची कन्या असून, पाचोरा शहरातील मिलिंद नगर भागातील दलित वस्तीमध्ये राहते. या परिसरात शैक्षणिक वातावरणाचा पूर्णतः अभाव असून, मूलभूत सुविधा सुद्धा अपुऱ्या आहेत. येथे शिक्षणाच्या दृष्टीने कोणतेही उपक्रम नियमित राबवले जात नाहीत. त्यामुळे अशा प्रतिकूल परिस्थितीतून आलेल्या राजनंदिनीने मिळवलेले यश हे केवळ तिचे नाही, तर संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी ठरले आहे. नवोदय प्रवेश परीक्षा ही अत्यंत स्पर्धात्मक परीक्षा असून संपूर्ण भारतातील लाखोने विद्यार्थी दरवर्षी या परीक्षेत सहभागी होतात. या वर्षी 2025-26 साठी झालेली परीक्षा 18 जानेवारी 2025 रोजी पाचोरा येथील श्री एम. एम. महाविद्यालयात पार पडली. या परीक्षेची तयारी करताना राजनंदिनीने अत्यंत साधनशून्यतेतून अभ्यास केला. आर्थिक अडचणींमुळे तिला कोणत्याही खास क्लासमध्ये प्रवेश घेता आला नव्हता, मात्र गणित विषयासाठी तिने बोरसे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली थोडकाच कालावधी क्लासेस लावले होते. या परीक्षेदरम्यान ओएमआर शीट भरताना तिने नावाच्या स्पेलिंगमध्ये किरकोळ चूक केली होती. त्यामुळे पालक घाबरले, पण या वेळी शाळेच्या शिक्षकांनी व संबंधित व्यक्तींनी नवोदय प्रशासनाशी थेट संपर्क साधून योग्य ती दुरुस्ती करून पालकांना समाधान दिले. या प्रसंगातूनही विद्यार्थिनी आणि कुटुंबाला आधार देण्यात आला. शाळेतील विजय पाटील सरांनी राजनंदिनीला वेळोवेळी मार्गदर्शक व्हिडीओ पाठवले. त्याच व्हिडीओवर आधारित अभ्यास करून तिने नवोदयसाठी तयारी केली. पण खरा दिशादर्शक ठरले ते सुहास बागुल सर. बागुल सरांचा मिलिंद नगर परिसराशी अनेक वर्षांचा संबंध असल्याने या भागातील सामाजिक व शैक्षणिक स्थिती त्यांना चांगल्या प्रकारे माहिती होती. राजनंदिनीच्या अंगी असलेले शैक्षणिक गुण त्यांनी हेरले आणि पालकांशी संपर्क करून तिला नवोदय परीक्षेसाठी प्रवृत्त केले. राजनंदिनीच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट आहे. वडील भीमराव खैरे हे हातमजुरीवर रोजंदारी तत्त्वावर काम करतात. आई सुवर्णा खैरे शिवणकाम करून उदरनिर्वाह करते. घरात कोणतेही शैक्षणिक वातावरण नाही. सतत दारिद्र्याशी झगडत हे कुटुंब जीवन जगत आहे. अशा अवस्थेमध्येही त्यांनी मुलीच्या शिक्षणाचा निर्धार सोडला नाही. बागुल सरांनी त्यांच्या परिस्थितीची जाणीव ठेवून “कसलंही आर्थिक टेन्शन घेऊ नका, तुमच्या मुलीला नवोदयसाठी लागेल ते मी पाहतो,” असे आश्वासन दिले. सुहास बागुल सरांनी केवळ शैक्षणिक मार्गदर्शनच दिले नाही, तर राजनंदिनीच्या रोजच्या दिनचर्येवर बारकाईने लक्ष ठेवले. वेळोवेळी तिला म्हणत, “बेटा, मिलिंद नगरमध्ये लाल दिव्याची गाडी घेऊन येणारी पहिली मुलगी तूच व्हायचीस!” अशा प्रेरणादायी शब्दांनी तिला मानसिक बळ दिले. या यशानंतर शाळेत राजनंदिनीचा सन्मान करण्यात आला. प्रमुख उपस्थितीत मुख्याध्यापक नरेंद्र पाटील, पालक सौ. सुवर्णा व भीमराव खैरे, पर्यवेक्षिका अंजली गोहिल, पर्यवेक्षक रहीम तडवी, ज्येष्ठ शिक्षक प्रीतम सिंग पाटील, वर्गशिक्षक विजय पाटील यांच्यासह सागर पाटील, मयूर देवरे, प्रशांत पाटील, रवींद्र जाधव, विशाल बागुल यांचीही उपस्थिती होती. सर्वांनी राजनंदिनीच्या यशाबद्दल गौरवोद्गार काढले आणि तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. राजनंदिनीच्या यशामध्ये तिच्या परिश्रमाबरोबरच तिच्या शिक्षकांचे, शाळेचे व कुटुंबाचे महत्त्वाचे योगदान आहे. हे यश केवळ एका विद्यार्थिनीचे नसून संपूर्ण वस्तीतील, शाळेतील आणि समाजातील प्रत्येक गरिब, वंचित मुला-मुलींसाठी एक प्रेरणा आहे. मुख्याध्यापक नरेंद्र पाटील म्हणाले, “राजनंदिनीसारखी विद्यार्थिनी आमच्या शाळेचा अभिमान आहे. तिच्या जिद्दीला आमच्या शिक्षकांनी दिशा दिली. हे यश संस्था, शाळा, शिक्षक आणि कुटुंब यांच्या सामूहिक प्रयत्नांचे फलित आहे.” या यशानंतर पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था देखील याचे कौतुक करत असून भविष्यात इतर विद्यार्थ्यांसाठी नवोदयसारख्या स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी विशेष मार्गदर्शन शिबिरे राबवण्याचा विचार करीत आहे. राजनंदिनीचे स्वतःचेही मोठे स्वप्न आहे – “मी भविष्यात एक मोठी अधिकारी बनून माझ्या भागातील परिस्थिती बदलवायची आहे,” असे ती आत्मविश्वासाने सांगते. अशा प्रकारच्या यशोगाथा हे ग्रामीण भागातील शिक्षण क्षेत्रासाठी दीपस्तंभ ठरतात. कु. राजनंदिनी खैरे हिचे हे यश लाखो वंचित विद्यार्थ्यांसाठी आशेचा किरण तिच्या या यशाबद्दल झुंज वृत्तपत्र व ध्येय न्यूज संपादक संदीप महाजन, उपशिक्षीका सौ. शितल सं. महाजन व परिवारा तर्फे हार्दिक अभिनंदन सह भावी जीवनाच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.