लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये फर्स्ट क्लास मिळवणाऱ्या सिद्धेश बोरसेवर पाचोऱ्यात अभिनंदनाचा वर्षाव

0

Loading

पाचोरा : पाचोरा शहरातील प्रतिष्ठित बिल्डर्स अँड डेव्हलपर्स तसेच नामवंत शासकीय ठेकेदार, भाजपचे माजी नगरसेवक दत्ताआबा बोरसे यांचे सुपुत्र सिद्धेश बोरसे याने आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स (London School of Economics – LSE) या जागतिक दर्जाच्या संस्थेतून उच्च शिक्षण घेत, नुकतीच फर्स्ट क्लासमध्ये उत्तीर्णता मिळवली आहे. या उल्लेखनीय शैक्षणिक यशाबद्दल पाचोरा शहरासह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण आहे. विविध क्षेत्रांतील मान्यवर, सामाजिक संस्था, राजकीय कार्यकर्ते आणि नागरीकांमधून सिद्धेशचे मन:पूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे. सिद्धेश बोरसे याने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या जगप्रसिद्ध संस्थेतून आर्थिक व्यवस्थापन व धोरण या शाखेत पदवी मिळवली आहे. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स ही जगातील सर्वोत्तम आणि कठीण प्रवेश प्रक्रिया असलेली संस्था समजली जाते. भारतासह संपूर्ण जगातून हजारो विद्यार्थी दरवर्षी येथे प्रवेश घेण्यासाठी प्रयत्न करतात, मात्र त्यामध्ये फारच थोड्या जणांची निवड होते. अशा परिस्थितीत सिद्धेश याने लंडनमध्ये जाऊन शिक्षण पूर्ण करणे आणि त्यातही प्रथम श्रेणीत यश संपादन करणे हे निश्चितच कौतुकास्पद आहे. सिद्धेशचा शैक्षणिक प्रवास हा नेहमीच उज्ज्वल आणि प्रेरणादायी राहिलेला आहे. प्राथमिक शिक्षण पाचोरातील नामवंत शाळेत घेतल्यानंतर त्याने माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण जळगाव , पुणे येथे पूर्ण केले. त्यानंतर त्याची आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा परीक्षांमध्ये निवड होऊन, लंडनमधील या उच्च दर्जाच्या संस्थेत प्रवेश मिळाला. अभ्यासात असलेली चिकाटी, सातत्य, आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावर सिद्धेशने शिक्षण पूर्ण करताना आपल्या कुटुंबाचे आणि गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. त्याचे वडील दत्ताआबा बोरसे हे पाचोरा नगरपरिषदेचे माजी नगरसेवक असून, शहरातील अनेक विकासकामांमध्ये त्यांचा मोलाचा वाटा राहिलेला आहे. बिल्डिंग कन्स्ट्रक्शन तसेच शासकीय ठेक्यांमध्ये त्यांचा व्यवसाय असून, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातही त्यांचा ठसा आहे. पाचोरा शहराच्या विकासासाठी त्यांनी अनेक उपक्रम हाती घेतले असून, त्यांची कामे नेहमीच पारदर्शक आणि गुणवत्तापूर्ण मानली जातात. त्यांचे सुपुत्र सिद्धेश याने आज शिक्षणाच्या माध्यमातून केलेली भर म्हणजे त्यांच्या संपूर्ण कुटुंबासाठी अभिमानास्पद क्षण आहे. सिद्धेशच्या या यशाबद्दल पाचोरा शहरातील अनेक मान्यवरांनी, शैक्षणिक संस्थांनी आणि सामाजिक संस्थांनी त्याचे मन:पूर्वक अभिनंदन केले आहे. पाचोरा नगरपरिषद सदस्य, व्यापारी संघटना, उद्योजक वर्ग, पत्रकार, शिक्षक संघटना तसेच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी सिद्धेशला शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियावरही त्याच्या या यशाचे भरभरून कौतुक होत आहे. अनेकांनी त्याला प्रेरणास्रोत ठरवत, नव्या पिढीला उंच स्वप्न बघण्याचे आणि ती पूर्ण करण्याचे बळ त्याने दिल्याचे मत व्यक्त केले आहे. या यशानंतर पुढील टप्प्यावर सिद्धेश बोरसे याने आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक धोरण व संशोधन क्षेत्रात काम करण्याचा मानस व्यक्त केला आहे. त्याच्या मते, भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये आर्थिक समतोल, धोरणात्मक योजना, आणि युवा उद्योजकता यामध्ये जागतिक तंत्रज्ञान व ज्ञानाची आवश्यकता आहे. याच उद्देशाने तो लवकरच एका आंतरराष्ट्रीय संस्था अथवा बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करण्याचा निर्णय घेणार आहे. दत्ताआबा बोरसे यांनीही या प्रसंगी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “सिद्धेशने लहानपणापासूनच अभ्यासात चांगली गती ठेवली होती. आमच्या कुटुंबात स्पेशली त्याच्या आईने शिक्षणाला कायम सर्वोच्च प्राधान्य दिले. त्याने हे यश मिळवून आम्हाला गौरवाची आणि समाधानाची भावना दिली आहे. समाजाच्या प्रत्येक थरातून मिळणाऱ्या शुभेच्छा आमच्यासाठी अधिकच प्रेरणादायी ठरत आहेत.” या आनंदाच्या क्षणी सिद्धेशच्या स्वर्गीय मातोश्रीं असायला हव्या होत्या कारण की, “मुलगा लांब असूनसुद्धा त्याच्या यशामुळे घरात एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा संचारत आहे.तो क्षण तिने बघायला हवा होता आम्हाला अभिमान आहे की आमच्या मुलाने पाचोराचे आणि भारताचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल केले आहे.” सिद्धेशच्या यशामुळे केवळ त्याच्या कुटुंबीयांनाच नाही तर संपूर्ण पाचोरा शहराला अभिमान वाटत आहे. त्याचं हे यश भविष्यातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, अशी भावना अनेक शिक्षक आणि पालकांनी व्यक्त केली आहे. पाचोरासारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थीही कठोर परिश्रम, योग्य दिशा आणि अभ्यासाच्या माध्यमातून जागतिक स्तरावर पोहोचू शकतात, याचा आदर्श उदाहरण म्हणजे सिद्धेश बोरसे होय. पाचोरा परिसरातील शैक्षणिक संस्था,ध्येय करिअर अकॅडमी,झुंज वृत्तपत्र व ध्येय न्युज परिवार आणि विविध स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनीही सिद्धेश बोरसेच्या या यशाचे स्वागत केले. सिद्धेश बोरसे याने या सर्व शुभेच्छा आणि अभिनंदनपर संदेशांबद्दल आभार व्यक्त करत सांगितले की, “ही एकट्याची नाही तर माझे संपूर्ण कुटुंब, समाज आणि शिक्षकवर्गाची यशोगाथा आहे. मला जे शिकायला मिळाले, ती संधी, ती दिशा ही मला इथल्या माणसांनी दिलेली आहे. पुढेही भारतासाठी काम करण्याचा आणि देशातील युवकांना जागतिक विचारांच्या दिशेने मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेन.” पाचोरा शहराच्या उज्ज्वल वाटचालीमध्ये बोरसे कुटुंबाचा हातभार लक्षणीय राहिलेला आहे. आता सिद्धेशच्या यशामुळे या वाटचालीला आंतरराष्ट्रीय स्पर्श मिळाला आहे. शिक्षण, प्रगती, चिकाटी आणि मेहनतीचे उत्तम उदाहरण म्हणून सिद्धेश बोरसेचं नाव पुढे येत आहे. त्याच्या यशामुळे संपूर्ण पाचोरा शहर एकवटून त्याच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देत आहे. अशा तरुणांकडून पाचोरा शहराला आणि संपूर्ण जिल्ह्याला भविष्यात नवी दिशा लाभेल, असा ठाम विश्वास व्यक्त केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here