पाचोरा – शहराच्या ऐतिहासिक ओळखीचा व स्वातंत्र्यलढ्याच्या अभिमानाचा प्रतीक असलेल्या हुतात्मा स्मारकाजवळ पुन्हा एकदा अतिक्रमणाचे सावट गडद झाले आहे. स्वच्छता व वाहतूक व्यवस्थेची वाताहत झाल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत असून, पत्रकार व स्वातंत्र्यसैनिक पुत्र संदीप महाजन यांनी या गंभीर समस्येकडे पाचोरा नगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधत तातडीने अतिक्रमण हटविण्याची मागणी केली आहे. स्मारकाजवळील अतिक्रमण तातडीने न काढल्यास 15 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजल्यापासून नगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर जोपर्यंत सदरचे अतिक्रमण काढले जात नाही तो पर्यंत दररोज नगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारांजवळ राष्ट्रभक्तीपर गीत वाजवून जनजागृती आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
हुतात्मा स्मारक हे केवळ पाचोराच नव्हे तर संपूर्ण जळगाव जिल्ह्याच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचे स्मारक आहे. जिल्ह्यात फक्त पाचोरा व आडगाव येथेच अशा स्वरूपाचे स्मारक असल्याने, येथे अतिक्रमण व अस्वच्छतेचे प्रमाण वाढणे हे नागरिकांच्या भावनांशी थेट जोडलेले प्रकरण आहे. या स्मारकाचा परिसर स्वच्छ, शिस्तबद्ध व अतिक्रमणमुक्त राखणे ही नगरपालिका प्रशासनाची जबाबदारी आहे.
पूर्वी तात्कालीन मुख्याधिकारी शोभाताई बाविस्कर यांच्या कार्यकाळात छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून महादेव मंदिर व सुलभ शौचालयापर्यंत संपूर्ण परिसर केवळ एका तासात अतिक्रमणमुक्त करण्यात आला होता. मात्र, अलीकडच्या काळात पुन्हा येथे बेकायदेशीरपणे लोटगाडी, खोके, टरबुजविक्री (या अतिक्रमणाची सुरुवात माजी नगरसेवक यांच्या आशीर्वादाने खास टरबूज विक्रीच्या दुकानांपासूनच झाली हे लक्षणिय आहे ) त्यानंतर व्यापाऱ्यांनी व टोकर, कलताण लावुन, टपरी ठेऊन जागा अडवून बसल्याचे दिसून येत आहे. परिणामी, रिक्षा स्टॅण्डजवळील चालकांना नियमानुसार रिक्षा उभ्या करण्यास अडचणी येत आहेत, वाहतुकीत अडथळे निर्माण होत आहेत आणि कचराकुंडीमुळे परिसरात अस्वच्छतेचे वातावरण पसरले आहे.
याशिवाय, येथे गटई कामगारांना देण्यात येणारे पत्र्याचे स्टॉलसुद्धा नियमांचे उल्लंघन करून बसवण्यात आल्याचे समोर आले आहे. नियमानुसार, अशा स्टॉलसाठी जी जागा मागितली जाते ती नगरपालिका प्रशासनाने संबंधितास भाड्याने, करारनाम्याने, खरेदीने किंवा मोफत परंतु अधिकृतरीत्या ताब्यात दिलेली असावी. मात्र, सदर ठिकाणी हे सर्व नियम धाब्यावर बसवून स्टॉल ठेवण्यात आला आहे आणि मुख्य म्हणजे त्याच्या आडोशाला किंवा त्याच्या नावाखाली संबंधित अतिक्रमणधारकांनी स्वतःचा फायदा करून घेण्याचे प्रकार सुरू आहेत. या जागेचा कोणताही भाडेपट्टा किंवा मालकीहक्क नगरपालिका प्रशासन देऊ शकत नसल्याने, त्या पत्र्याच्या स्टॉलसह सर्व अतिक्रमण तातडीने हटविणे आवश्यक असल्याची मागणी करण्यात आली आहे.
या परिसरात विद्यमान आमदार किशोरआप्पा पाटील यांचे कार्यालय, विविध शासकीय विभागांचे अधिकारी व नागरिकांची सतत वर्दळ असते. अतिक्रमणामुळे पार्किंगसाठी जागा उपलब्ध राहत नाही, तसेच स्वच्छतेच्या अभावामुळे स्मारकाचे सौंदर्य मलिन होत आहे. हे केवळ नियमांचे उल्लंघन नसून, स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मारकाचा अवमान आहे, असे महाजन यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे.
महाजन यांनी मागणी केली आहे की –
1) हुतात्मा स्मारकाजवळील अतिक्रमण तातडीने हटवावे.
2) परिसराची स्वच्छता व सौंदर्यीकरण कायम ठेवावे.
3) अतिक्रमणाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कायमस्वरूपी देखरेखीची व्यवस्था करावी.
4) रिक्षा स्टॅण्ड व पार्किंगसाठी शिस्तबद्ध नियोजन करावे.
या निवेदनाची प्रत पाचोरा प्रांताधिकारी व जळगाव जिल्हाधिकारी यांनाही पाठविण्यात आली असून, आता प्रकरण वरच्या स्तरावर पोहोचले आहे. नगरपालिका प्रशासनाने निवेदनानंतर साफसफाईची काही कामे हाती घेतली असली तरी स्मारकाच्या लगतचे अतिक्रमण मात्र जैसे थे आहे. त्यामुळेच, जर 14 ऑगस्टपर्यंत अतिक्रमण काढण्यात आले नाही, तर 15 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजल्यापासून नगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ राष्ट्रभक्तीपर गीत वाजवून बलिदान दिलेल्या सैनिकांच्या शौर्याची आठवण करून देत जनजागृती आंदोलन केले जाईल, असा स्पष्ट इशारा महाजन यांनी दिला आहे.
नागरिकांचे म्हणणे आहे की, ऐतिहासिक स्थळांचे संरक्षण हे केवळ कागदोपत्री न राहता प्रत्यक्ष कृतीत उतरवणे गरजेचे आहे. हुतात्मा स्मारक परिसरात अतिक्रमण होणे ही प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे करते. “स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मृती जपणारा हा परिसर म्हणजे आपल्या शहराचा सन्मान आहे आणि त्याचा अपमान कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही,” असा इशारा देशप्रेमी नागरिकांनी दिला आहे. आता पाहणे महत्त्वाचे ठरेल की, नगरपालिका व जिल्हा प्रशासन या जनभावनांचा आदर करून स्वातंत्र्यदिनाच्या आधीच ठोस कारवाई करते की आंदोलनानंतरच कारवाईला गती मिळते.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.