विरार (गुरुदत्त वाकदेकर) : ज्ञानदीप मंडळ संचालित सेंट जोसेफ कला आणि वाणिज्य महाविद्यालय, सत्पाळा येथे आंतरिक गुणवत्ता हमी प्रकोष्ठ (आईक्यूएसी) अंतर्गत मराठी विभाग आणि ‘कोमास’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘श्रावण सरी’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात मराठी वाङ्मय मंडळाच्या उद्घाटनाने झाली. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून, मराठी विभाग प्रमुख जगदीश संसारे यांनी स्वागतपर भाषण केले. यानंतर ‘श्रावण सरी’च्या सुरेल वर्षावाला सुरुवात झाली.
सुप्रसिद्ध गायक आणि ‘सुर संस्कार’ गायन वर्गाचे संचालक उदय डांगे यांनी सादर केलेल्या कोळीगीतावर विद्यार्थ्यांनी ताल धरला. ‘कानडा राजा पंढरीचा’ या सुस्वर भक्तिगीताने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. ज्योती मुदलीयार यांनी सादर केलेल्या ‘रेशमाच्या रेघांनी’ या लावणीने कार्यक्रमाची रंगत अधिक वाढवली.
महाविद्यालयातील अकाउंट विषयाचे प्राध्यापक डॉ. प्रसाद डाबरे आणि कार्यालयीन अधीक्षक विल्यम रॉड्रिग्ज यांनीही बहारदार गीते सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. कार्यक्रमाच्या प्रभावाने प्रेरित होऊन प्रथम वर्ष कला शाखेतील विद्यार्थिनी जिनिषा एरंगले आणि श्रेया गायकवाड यांनी देखील मनमोहक गीत सादर केले.
लावणी नृत्यांगना विस्मया माळकर हिने सादर केलेल्या नृत्याने वातावरणात आणखी रंग भरले.
एकूण १०० हून अधिक विद्यार्थी आणि शिक्षकांनी कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला. कार्यक्रमाचे सूत्रबद्ध आयोजन आणि बहारदार सूत्रसंचालन मराठी विभाग प्रमुख जगदीश संसारे यांनी केले.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.