मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : डिमेंशिया—एक वैद्यकीय आणि सामाजिक आव्हान. याच विषयावर संशोधन, समाजशास्त्रीय दृष्टिकोन आणि भविष्याचे मार्ग शोधण्यासाठी मंगळवार, दिनांक १२ ऑगस्ट २०२५ रोजी डॉ. बी. एम. एन. कॉलेज ऑफ होम सायन्स (स्वायत्त), श्रीमती मणिबेन एम. पी. शाह कला व वाणिज्य स्वायत्त महिला महाविद्यालयाचा समाजशास्त्र विभाग आणि आजी केअर सेवक फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रुसा प्रायोजित एक दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद पार पडली. देश-विदेशातील ३६५ प्रतिनिधींनी प्रत्यक्ष आणि आभासी स्वरूपात सहभाग घेतला.
परिषदेचे बीजभाषण लोकमान्य टिळक रुग्णालयातील मानसोपचारतज्ज्ञ डॉ. नीलेश शाह यांनी केले. “आजोबा, चला शाळेत जाऊ या” या संकल्पनेद्वारे त्यांनी ज्येष्ठांसाठी खास शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला. या शाळेत फिजिओथेरपी सत्रे, शारीरिक व मानसिक व्यायाम, तसेच तरुणांकडून डिजिटल कौशल्य प्रशिक्षण अशा उपक्रमांचा समावेश असावा, अशी सूचना त्यांनी दिली.
आजी केअर सेवक फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश बोरगावकर यांनी डिमेंशियाची सद्यस्थिती, रुग्णसंख्या आणि सुरुवातीची लक्षणे स्पष्ट केली.
मानसोपचारतज्ज्ञ व डिमेंशिया तज्ज्ञ डॉ. संतोष बांगर यांनी डिमेंशियाची कारणमीमांसा सांगितली. त्यांनी संतुलित आहार, नियमित चालणे आणि सवयींवर नियंत्रण ठेवण्याच्या सोप्या पद्धतींचा आग्रह धरला.
प्राचार्य डॉ. अर्चना पत्की यांनी कुटुंबातील तरुणांनी वृद्धांच्या भावना समजून घ्याव्यात, वर्तनातील बदल दुर्लक्षित करू नयेत आणि गरज पडल्यास तत्काळ काळजी घ्यावी, असे सांगितले.
प्रश्नोत्तर सत्रात डॉ. खालप यांनी रुग्णाच्या खोलीची व्यवस्था न बदलणे, आहार वेळेवर देणे आणि नियमित क्रियाकलाप कायम ठेवणे यावर भर दिला. प्रसाद भिडे यांनी विश्वासार्ह संस्थेकडूनच काळजीवाहक नेमण्याचा आणि ठराविक निकष पाळण्याचा सल्ला दिला. अॅड. निर्मला सामंत प्रभावळकर यांनी मुलांनी वृद्ध पालकांना सोडू नये, असे ठाम सांगितले आणि एमडब्ल्यूपीएससी कायदा, २००७, मानसिक आरोग्य कायदा, २०१७ आणि अपंग व्यक्तींचे हक्क कायदा, २०१६ यांची सविस्तर माहिती दिली.
दुपारच्या सत्रात अमेरिकेतून सहभागी झालेल्या प्राजक्ता पाडगावकर यांनी “होप फॉर अल्झायमर” या सादरीकरणातून निदानातील आधुनिक उपकरणे आणि सक्रिय राहण्याचे फायदे सांगितले. प्रा. मानसी पै यांनी संज्ञानात्मक वृद्धत्व हे फक्त जैविक कारणांवर अवलंबून नसून जीवनशैली, मानसिक स्थिती आणि सामाजिक घटकांमुळेही प्रभावित होते, हे वैज्ञानिक दृष्टिकोनातून स्पष्ट केले.
या परिषदेच्या यशात सेवा मंडळ एज्युकेशन सोसायटीचे खजिनदार अतुल संघवी, प्राचार्य डॉ. माला पांडुरंग, प्राचार्य डॉ. अर्चना पत्की, समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. हिना शाह, प्रकाश बोरगावकर आणि समाजशास्त्र विभागातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थिनींचा मोलाचा वाटा होता.
डिमेंशियाग्रस्त व्यक्तींच्या काळजीत कुटुंब, समाज आणि तंत्रज्ञान या तिन्हींची सांगड आवश्यक आहे. प्रेम, समजूतदारपणा आणि योग्य वैद्यकीय मार्गदर्शन यांच्या जोरावरच डिमेंशियाला समर्थपणे सामोरे जाता येते — हा परिषदेचा सामूहिक संदेश ठरला.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.