पाचोरा – तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अतिवृष्टी अनुदानातील घोटाळ्याच्या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई व्हावी, तसेच या प्रकरणाची चौकशी विशेष तपास पथक (SIT) किंवा आर्थिक गुन्हा शाखेकडे वर्ग करण्यात यावी, या मागणीसाठी पाचोऱ्यातील पत्रकार संदीप दामोदर महाजन यांनी 1 सप्टेबर 2025 पासून प्रांताधिकारी कार्यालयासमोर अन्न-पाणी त्याग आमरण उपोषणास सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. सन 2023-24 मध्ये झालेल्या अतिवृष्टीत तालुक्यातील तब्बल 52,689 शेतकऱ्यांची शेती बाधित झाली होती. यासाठी शासनाकडून 70 कोटी 16 लाख 53 हजार 240 रुपयांचे अनुदान प्राप्त झाले होते. मात्र या अनुदानाचे वितरण करताना 39 शेतकऱ्यांच्या सुमारे 14 लाख 50 हजार रुपयांची रक्कम इतरांच्या खात्यात वळवण्यात आली. तहसीलदारांनी चौकशी करून संबंधित कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावल्या असून आतापर्यंत 4 लाख 63 हजार रुपयांची वसुली करण्यात आली आहे. उर्वरित रक्कम चार दिवसांत वसूल होईल, अशी माहिती पत्रकारांना देण्यात आली मात्र, केवळ नोटिसा बजावणे व वसुलीवर समाधान न मानता, हे थेट गुन्हेगारी कृत्य असल्याने दोषींवर गुन्हा दाखल होऊन SIT अथवा आर्थिक गुन्हा शाखेकडून चौकशी व्हावी, अशी मागणी पत्रकार संदीप महाजन यांनी केली आहे. महाजन यांनी दिलेल्या निवेदनात पुढील प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या आहेत :
1) महसूल विभागातील दोषी अधिकारी-कर्मचाऱ्यांचे तात्काळ निलंबन करावे.
2) दोषी अधिकारी व कर्मचारी यांच्यासह दोषी ई-सेवा केंद्र चालक व खातेदारांवर तातडीने गुन्हा दाखल करावा.
3) केवळ 2023-24 नव्हे, तर सन 2020-21 पासून आजपर्यंतच्या सर्व अनुदानाची चौकशी व्हावी.
4) चुकीच्या खात्यांमध्ये वळवलेली रक्कम परत मूळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी.
5) सर्व अनुदान यादी सार्वजनिक करून पारदर्शकता सुनिश्चित करावी.
“शेतकऱ्यांचा हक्काचा पैसा हडप करून काहींनी भ्रष्टाचाराचा खेळ खेळला आहे. हे पोटभरणेचे नव्हे तर सरळ लुटमारीचे प्रकरण आहे. दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास शेतकरी वर्गाच्या न्यायासाठी माझे आमरण उपोषण कोणत्याही परिस्थितीत मागे घेणार नाही. याची जबाबदारी प्रशासनावरच राहील,” असा इशाराही महाजन यांनी दिला आहे.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.