जळगाव – जिल्ह्यातील पाचोरा येथील पत्रकार राजेंद्र खैरनार गेल्या काही महिन्यांपासून पोटाच्या आजाराशी झुंज देत आहेत. तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना शस्त्रक्रियेचा सल्ला दिला आहे. मात्र, आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना तातडीने निर्णय घेणे कठीण जात आहे. वैद्यकीय खर्चाबरोबरच प्रवास, औषधे व इतर आवश्यक बाबींमुळे त्यांच्या कुटुंबावर मोठा आर्थिक ताण आला आहे. दरम्यान, भाजप नेत्या वैशालीताई सूर्यवंशी यांच्या पत्रकार परिषदे नंतर चौका कट्यावर झालेल्या चर्चेत खैरनार यांची व्यथा इतर पत्रकार बांधवांपर्यंत पोहोचली. पत्रकार बंधूंनी क्षणाचाही विलंब न लावता, आपापल्या परीने जी काही मदत शक्य होती ती तातडीने जमा करून खैरनार यांच्या हाती दिली. या भावनिक प्रसंगामुळे उपस्थित सर्वांच्या डोळ्यांत अश्रू दाटले. आपल्या व्यावसायिक आयुष्यात समाजातील घडामोडींचा आवाज पोहोचवणाऱ्या पत्रकाराला, आज त्याच बांधवांनी दिलासा दिला, हे खऱ्या अर्थाने पत्रकारितेतील ऐक्याचे दर्शन होते. पत्रकार बांधवांनी तातडीने खैरनार यांना पुढील उपचारासाठी नासीक रवाना केले आणि जबाबदारी उचलली. तरीही पुढील प्रवास, उपचारादरम्यान लागणारे खर्च व औषधांसाठी अजूनही मदतीची आवश्यकता आहे. त्यामुळे स्नेही, पत्रकार बांधव किंवा समाजातील दानशूर व्यक्तींनी इच्छुक असल्यास राजेंद्र खैरनार यांच्या मोबाईल क्र. 9096237788 वर थेट संपर्क साधून रक्कम पाठवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. पत्रकार राजेंद्र खैरनार यांच्या उदाहरणातून समाजाने एकत्र येऊन दिलेला आधार हा नि:स्वार्थ सेवाभाव आणि खरी माणुसकी दाखवणारा प्रसंग आहे.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.