समर्पित सेवेला सलाम – संजय दत्तू सरांचा सेवायात्रेचा अखेरचा टप्पा

0

Loading

पाचोरा : प्रत्येक शिक्षक हा आपल्या कार्यकाळात शेकडो विद्यार्थ्यांचे भविष्य घडवतो. तो केवळ वर्गात शिकवत नाही, तर विद्यार्थ्यांच्या आयुष्यात प्रेरणेचा दीप प्रज्वलित करतो. अशाच तेजस्वी प्रवासातून समाजाला घडवणारे संजय सिताराम दत्तू हे 28 वर्षांच्या अखंड सेवेनंतर 31 ऑगस्ट 2025 रोजी श्री गो से हायस्कूल चे शिक्षक म्हणून सेवानिवृत्त होत आहेत. साध्या शेतकरी कुटुंबात जन्मलेले दत्तूसर लहानपणापासूनच मेहनत, प्रामाणिकपणा आणि चिकाटीचे धनी होते. प्राथमिक शिक्षण अण्णासाहेब सु. भा. पाटील विद्यामंदिर पाचोरा येथे झाले, तर माध्यमिक शिक्षण श्री. गो. से. हायस्कूलमध्ये पूर्ण केले. शिक्षणासोबतच क्रीडाक्षेत्रातही त्यांचे विशेष प्राविण्य होते. कबड्डी, हँडबॉल, बास्केटबॉल आणि ॲथलेटिक्स या खेळांमध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवून विद्यार्थी जीवनात शाळेचे नाव उज्ज्वल केले. महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी श्री शेठ एम. एम. कॉलेज, पाचोरा येथे घेतले आणि केमिस्ट्री विषयात बी.एस्सी. पदवी संपादन केली. त्यानंतर शिक्षणक्षेत्राची ओढ मनात बाळगून त्यांनी 1993 मध्ये सद्गुरु एज्युकेशन सोसायटी, जळगाव येथून बी.पी.एड. पदवी संपादन केली. शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांचे सर्वांगीण व्यक्तिमत्त्व घडवण्याचे ध्येय त्यांनी मनाशी पक्के केले. 1 जुलै 1997 हा त्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय दिवस ठरला. कारण याच दिवशी त्यांची नेमणूक श्री. गो. से. हायस्कूल, पाचोरा येथे झाली. या शाळेतच त्यांनी तब्बल 28 वर्षे अखंड सेवा बजावत असंख्य विद्यार्थ्यांच्या जीवनात ज्ञान, संस्कार व शिस्तीचा पाया घातला. शाळेत काम करताना त्यांना नेहमीच मुख्याध्यापकांचे सहकार्य लाभले.त्यात प्रामुख्याने एस. एम. जाधव सर, मथुरवैष्य सर, एस. एच. पवार सर, सौ. पी. एम. वाघ मॅडम आणि एन. आर. पाटील सर यांनी वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शनामुळे त्यांची सेवा अधिक परिणामकारक ठरली. पाचोरा तालुका एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी स्वा.सै.दादासाहेब आर एस थेपडे व आप्पासो ओं.ना. वाघ यांच्यामुळे संस्थेच्या कामकाजात आपले योगदान देण्याची संधी मिळाली. संस्थेचे सध्याचे पदाधिकारी माजी आमदार भाऊसाहेब दिलीप वाघ व नानासाहेब संजय वाघ यांनीही त्यांच्या सेवाकाळात अनमोल सहकार्य दिले. या सगळ्या मार्गदर्शनामुळेच आज या यशस्वी वाटचालीचा मुक्काम साध्य झाला, असे दत्तूसर भावुकतेने सांगतात. त्यांचा वैयक्तिक प्रवासही तितकाच प्रेरणादायी आहे. 1998 मध्ये विवाह झाला. पत्नी स्वतः शिक्षिका आहेत. दत्तू यांच्या आयुष्याच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये आई – वडील , भाऊ बहीण,पत्नी यांचा मोलाचा वाटा आहे. शैक्षणिक क्षेत्रातील जबाबदाऱ्या पार पाडताना प्रामुख्याने पत्नीने कुटुंबाची धुरा समर्थपणे सांभाळली. नोकरी काळात पतीला प्रत्येक टप्प्यावर प्रेरणा व आधार देत त्यांच्या आयुष्याच्या प्रत्येक यशात ती खंबीरपणे उभी राहिली. म्हणूनच दत्तू सर अभिमानाने सांगतात – “माझ्या या सेवायात्रेच्या यशाचे खरे श्रेय माझ्या माता – पितांसह पत्नीला पण जाते.” तिच्या सहकार्यामुळेच मी कुटुंबातील पुढील पिढीही ज्ञानाच्या परंपरेला पुढे नेत आहे. एक मुलगी एमबीबीएस शिक्षण पूर्ण करून वैद्यकीय क्षेत्रात आपली ओळख निर्माण करत आहे, तर मुलगा अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षाला शिकत आहे. आई-वडिलांनी जो संस्कारांचा पाया रचला तो त्यांच्या मुलांमध्येही दिसून येत आहे. सेवाकाळात दत्तूसर यांना अनेक हितचिंतक, नातेवाईक आणि बालमित्रांची साथ लाभली. प्रमोद जडे, संदीप महाजन, प्रदीप पाटील, शैलेश मोरे आणि संजय सूर्यवंशी हे बालमित्र त्यांच्या सुख-दुःखात सदैव खंबीरपणे उभे राहिले. या मैत्रीची नाळ आजही तितकीच घट्ट आहे. 31 ऑगस्ट 2025 रोजी जेव्हा सेवानिवृत्तीची घंटा वाजेल, तेव्हा शाळेच्या प्रांगणात एक वेगळेच वातावरण निर्माण होईल. वर्गखोल्यांमध्ये विद्यार्थ्यांच्या आठवणी, खेळाच्या मैदानावर उमटलेले पाऊलखूण, शिक्षकांच्या सभागृहातील गप्पा, सहकाऱ्यांसोबतचे अनमोल क्षण – या साऱ्या आठवणी दत्तू सर यांच्या मनात कायमच्या कोरल्या जातील. “28 वर्षांचा हा प्रदीर्घ प्रवास म्हणजे माझ्या आयुष्यातील एक अखंड साधना आहे. शेकडो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करता आले, पालकांचा विश्वास संपादन करता आला, सहकाऱ्यांसोबत आयुष्यभर टिकणारे संबंध जोडता आले – हीच माझी खरी कमाई आहे. शाळा, संस्था, सहकारी, मित्र व हितचिंतक यांनी दिलेले आशीर्वाद हे माझ्या जीवनाचे सर्वोच्च बक्षीस आहे,” अशा भावना संजय सिताराम दत्तू आपल्या सहकाऱ्यांसमोर व्यक्त करतात. खरं तर शिक्षकाची सेवानिवृत्ती ही केवळ नोकरी संपल्याची औपचारिकता नसून, ती एका युगाचा समारोप असतो. संजय सिताराम दत्तू यांच्या जाण्याने शाळा व संस्थेत एक पोकळी निर्माण होणार आहे. परंतु त्यांच्या शिकवणीचा ठसा विद्यार्थ्यांच्या हृदयात कायम राहील. शिक्षक म्हणून त्यांनी जो वारसा निर्माण केला आहे, तो पुढील अनेक वर्षे स्मरणात राहील. आज संपूर्ण पाचोरा तालुका एज्युकेशन सोसायटी, सहकारी शिक्षकवर्ग, विद्यार्थी व समाज त्यांचे योगदान मान्य करत कृतज्ञतेची भावना व्यक्त करीत आहे. सर्वजण त्यांना पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, आनंद व सुखशांतीच्या शुभेच्छा देत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here