पाचोरा (जि. जळगाव) – तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाणे हद्दीतील एका अल्पवयीन १७ वर्षीय शाळकरी मुलीवर झालेल्या अमानुष अत्याचाराने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. शालेय बस चालक असलेला ४१ वर्षीय आबिद हुसेन शेख या विकृत प्रवृत्तीच्या व्यक्तीने फोटो आणि व्हिडिओ दाखवून मुलीला मानसिक छळ देत वारंवार तिच्यावर अत्याचार केला. पीडितेच्या निष्पाप आयुष्यावर काळोख पसरवणारी ही घटना उघड होताच समाजमनात प्रचंड संतापाची लाट उसळली. या प्रकरणात पिंपळगाव पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून आरोपी आबिद हुसेन शेख आणि त्याच्या आईला अटक केली असून, दोघांना न्यायालयीन कोठडीत पाठवून जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. या विकृत कृत्याचा निषेध करण्यासाठी आणि दोषींना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी शुक्रवार दि. २९ ऑगस्ट २०२५ रोजी पाचोरा शहरात सकल हिंदू समाजातर्फे भव्य मूक मोर्चा काढण्यात आला. सकाळीच कृष्णापुरी भागातील हनुमान मंदिर परिसरात नागरिकांचा जमाव उसळू लागला. महिला, विद्यार्थिनी, महाविद्यालयीन तरुण, शेतकरी, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते—सर्व जण संतप्त मनाने रस्त्यावर उतरले. काहींच्या डोळ्यांत अश्रू दाटले होते, काहींच्या चेहऱ्यावर प्रचंड राग ओसंडून वाहत होता. गालावर रुमाल धरून स्त्रिया रडत होत्या, पण हातात फलक घट्ट पकडून उभ्या होत्या—“आरोपीला फाशी झालीच पाहिजे”, “लव जिहाद थांबवा” असे ठळक संदेश देणारे हे फलक संपूर्ण मोर्चाला धार देत होते. मोर्चामध्ये सहभागी झालेल्या शाळकरी मुलींच्या चेहऱ्यावर भीती, संताप आणि असुरक्षिततेचे मिश्र भाव उमटले होते. “उद्या आमच्या बरोबर असे घडले तर…?” असा प्रश्न त्यांच्या नजरेत दाटलेला जाणवत होता. गावागावांतून आलेल्या महिलांनी आपल्या लहान मुलांना घट्ट मिठी मारत चाल करत सहभाग नोंदवला. पायवाटेवर चालणाऱ्या या हजारोंच्या जनसमुदायाने मौन बाळगले होते, पण त्यांच्या पावलांचा आवाज जणू काळजाला हादरवणाऱ्या हंबरड्यासारखा घुमत होता. कृष्णापुरी भागातून निघालेला मोर्चा शहरातील मुख्य मार्गाने छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत गेला. प्रत्येक वळणावर नागरिकांची गर्दी वाढत गेली. बालकांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वजण रस्त्यावर उतरले होते. अंगावर शहारे आणणारे ते दृश्य—एखाद्या लष्करी तुकडीसारखा शिस्तबद्ध जनसमुदाय, पण हातात हत्यारे नव्हती… होती ती केवळ फलकं, घोषवाक्यं आणि मौनातील आक्रोश. मोर्चाच्या समारोपस्थळी प्रशासनाला निवेदन देण्यात आले. या निवेदनात काही ठोस मागण्या मांडण्यात आल्या—पीडित मुलीला तातडीने मानसिक, आर्थिक व वैद्यकीय मदत मिळावी. आरोपींवर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून अल्पावधीत फाशीची शिक्षा सुनावली जावी. शालेय प्रशासनाने तक्रारीकडे दुर्लक्ष केले, त्यांचीही चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी. यापुढे अशा घटना घडू नयेत म्हणून प्रशासनाने ठोस पावले उचलावीत. निवेदन स्वीकारताना नायब तहसीलदार विनोद कुमावत व पोलिस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्यासमोर अनेक महिला डोळ्यात पाणी आणून “आमच्या मुली सुरक्षित ठेवा” अशी हाक देत होत्या. विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक, धर्मजागरण विभागाचे कार्यकर्ते यांनी मोर्चातील जनतेला संबोधित करताना लव जिहादच्या कटकारस्थानांवर जोरदार भाष्य केले. “ही केवळ एका मुलीची वेदना नाही, तर प्रत्येक हिंदू घरातील लेकीची किंकाळी आहे” असे उद्गार व्यक्त करत त्यांनी समाजाला जागृत राहण्याचे आवाहन केले. गोरक्षनाथ आखाड्याचे महंत योगी दत्तनाथ महाराज यांनी ठाम शब्दांत सांगितले—“यापुढे अशा प्रकारांना हिंदू समाज गप्प बसणार नाही, समाजातील प्रत्येक लेकीला बहीण मानून तिच्या सुरक्षिततेसाठी आपण सज्ज आहोत.” याच घटनेच्या निषेधार्थ शेंदुर्णी व पिंपळगाव हरेश्वर येथेही यापूर्वी मूक मोर्चे निघाले होते. मात्र पाचोरा येथे काढलेला हा मोर्चा अधिक भव्य व प्रचंड लोकसहभागाने यशस्वी ठरला. सर्व जाती, पंथ, संप्रदाय आणि राजकीय पक्षातील हिंदू समाज एकत्र येऊन या अमानुष घटनेविरोधात एकमुखीपणे उभा ठाकला. मोर्चात आमदार किशोरआप्पा पाटील, पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजय वाघ, भाजप नेत्या वैशालीताई सूर्यवंशी, गोविंद शेलार, दीपक माने, पाचोरा पंचायत समितीचे माजी सभापती बन्सीलाल पाटील, अखिल भारतीय गुर्जर परिषदेचे राष्ट्रीय सचिव संदीप महाजन, एरंडोल पंचायत समितीचे माजी सभापती अनिल महाजन, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष परेश पाटील यांच्यासह विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीने नागरिकांचा आत्मविश्वास अधिक दृढ झाला. हजारोंचा जनसमुदाय रस्त्यावर उतरल्यानंतर शहरात तणाव निर्माण होण्याची शक्यता होती. परंतु पाचोरा पोलिस निरीक्षक राहुल कुमार पवार यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवून संपूर्ण मोर्चा शांततेत पार पडला. मोर्चाच्या अखेरीस नागरिकांच्या डोळ्यांतून एकच संदेश उमटत होता—“आमच्या लेकींवर हात टाकणाऱ्यांना समाज माफ करणार नाही.” हा मोर्चा केवळ एका गुन्ह्याविरोधात नव्हता, तर समाजातील प्रत्येक मुलगी सुरक्षित राहावी यासाठीची सामूहिक प्रतिज्ञा होती.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.