पाचोरा शहराने आज एक मानबिंदू गमावला आहे. तालुका व शहराच्या राजकारणात, समाजकारणात आणि उद्योग क्षेत्रात वेगळा ठसा उमटवणारे, सर्वसामान्यांच्या मनात आपुलकी जिंकणारे आदरणीय नानासाहेब श्री. शांताराम सोनजी पाटील (वय ७८) यांचे पुणे येथे दिनांक १ सप्टेंबर २०२५ रोजी मध्यरात्री १२:४५ वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने पाचोरा तालुका तसेच संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. नानासाहेबांचे व्यक्तिमत्त्व म्हणजे साधेपणा, प्रामाणिकपणा आणि सेवाभाव यांचे मूर्त रूप होते. आयुष्यभर त्यांनी समाजकारणाला ध्येय मानले. पाचोरा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष, जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी जिल्हाध्यक्ष, जळगाव जिल्हा परिषदेचे सदस्य आणि एस.एस. पाटील उद्योग समूहाचे संस्थापक व एम एस पी ग्रुपचे मार्गदर्शक या सर्व जबाबदाऱ्या त्यांनी समर्थपणे पार पाडल्या. सत्ता किंवा प्रतिष्ठा ही त्यांची कधीच लालसा नव्हती, तर सामान्य नागरिकांच्या समस्या सोडवणे, त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणणे हेच त्यांचे राजकारण होते. शहराच्या विकासासाठी त्यांनी घेतलेले प्रयत्न आजही प्रत्येकाच्या स्मरणात आहेत. रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण, उद्योग या क्षेत्रात त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. एक उद्योजक म्हणून पाचोरा व परिसरातील असंख्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे कार्य त्यांनी केले. नानासाहेबांशी भेटणारा प्रत्येकजण त्यांना वडिलधाऱ्याप्रमाणेच सल्ला देणारे, संकटसमयी खांदा देणारे व खरी आत्मीयता दाखवणारे म्हणून अनुभवायचा. त्यांची कार्यपद्धती नेहमीच जमिनीशी जोडलेली होती. दिखाऊपणापासून दूर राहून, ‘सामान्य माणसाच्या हृदयाशी थेट संवाद’ साधण्याची ताकद त्यांच्यात होती. त्यांच्या दानशूर वृत्तीने कित्येक गरजूंना नवजीवन मिळाले. नानासाहेबांच्या निधनाने पाचोरा शहर एका मार्गदर्शक छायेला मुकले आहे. त्यांचे विचार, त्यांची तत्वनिष्ठ जीवनशैली आणि समाजाशी असलेले घट्ट नाते हे पुढील पिढ्यांसाठी दीपस्तंभ ठरणार आहे. त्यांचे पुत्र संजय शांताराम पाटील, प्रदीप शांताराम पाटील आणि मनोज शांताराम पाटील हे राजकीय व सामाजिक क्षेत्रात वडिलांची परंपरा पुढे नेण्याचे कार्य करत असून, वडिलांचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अंत्ययात्रा आज दिनांक ०१ सप्टेंबर २०२५, सोमवार रोजी दुपारी २:०० वाजता पाचोरा येथील निर्मल निवास, विवेकानंद नगर, भडगाव रोड येथील राहत्या घरून निघेल. अंत्यविधी पाचोरा येथील अमरधाम येथे पार पडेल. त्यांच्या जाण्याने पाचोर्याचे एक समाजभान असलेले नेतृत्व, दयाळू उद्योजक व सर्वसामान्यांचे आधारवड कायमचे हरपले आहे. त्यांच्या कार्याची व स्मृतींची परंपरा मात्र सदैव जिवंत राहील.
शांती शांती शांती
पाटील परिवाराच्या दुःखात झुंज वृत्तपत्र – ध्येय न्युज संपादक संदीप महाजन व परिवार सहभागी आहे
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.