पाचोरा – महाराष्ट्रातील गणेशोत्सव केवळ धार्मिकतेचा नव्हे तर समाजजागृतीचा महोत्सव ठरत आहे. या परंपरेत पाचोरा-भडगाव परिसरातील गिरणा-तापी जनविकास पर्यावरण संस्था गेली दोन दशके सातत्याने समाजहिताचे संदेश देणारे उपक्रम राबवते आहे. यावर्षीही संस्थेतर्फे आकर्षक व विचारप्रवर्तक देखावे सादर करणाऱ्या गणेश मंडळांना ढाली प्रदान करून गौरविण्यात आले. यावेळी पर्यावरण रक्षण व संवर्धन, लोकसंख्या नियंत्रण, राष्ट्रीय एकात्मता, स्त्रीभ्रूण हत्या विरोध, देहदान व अवयवदान – हे विषय निवडण्यात संस्थेचा सामाजिक दृष्टिकोन स्पष्टपणे दिसून येतो. गणेशोत्सवातील रंगीबेरंगी दिवे, गजर आणि उत्साह यासोबतच जर समाजहिताचा ठसा उमटला तर त्याचे रूपांतर ‘संस्कार महोत्सवा’त होते. याच जाणिवेतून या स्पर्धात्मक आरासांचे आयोजन केले जाते. या विषयांवर आकर्षक व हृदयाला भिडणारे संदेश मंडपांतून नागरिकांपुढे आले. परीक्षक मंडळाने पाहणी करून समाजमनाला भिडणाऱ्या सादरीकरणांची निवड केली. त्या मंडळांना ढाली देऊन गौरविण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मरणार्थ पर्यावरण संवर्धनावरील प्रथम क्रमांकाची ढाल पांचाळेश्वर गणेश मित्र मंडळ, कोंडवाडी गल्ली आणि जयहिंद क्रीडा व लेझीम मंडळ, कृष्णापुरी यांनी पटकावली. लोकसंख्या नियंत्रणावरील पुरस्कार रंगारगल्ली सार्वजनिक गणेश मंडळ व जय मल्हार गणेश मंडळ, देशमुखवाडी यांनी जिंकला. राष्ट्रीय एकात्मतेवरील ढाल जय मल्हार गणेश मंडळ, देशमुखवाडी यांना बहाल झाली. स्त्रीभ्रूण हत्या विरोधातील सर्वोत्तम सादरीकरण श्री गणेश लक्ष्मी प्रतिष्ठान, गाडगेबाबा नगर यांनी केले. देहदान व अवयवदान या विषयावर पांचाळेश्वर मित्र मंडळ, कोंडवाडा गल्ली यांनी अव्वल स्थान पटकावले. लालबागचा राजा गणेश मंडळ, बालाजी मित्र मंडळ व बाहेरपुरा येथील श्री गणेश मित्र मंडळ यांनी अनुक्रमे दुसरे व तिसरे क्रमांक मिळवत समाजोपयोगी संदेश देण्यात मोलाचे योगदान दिले. या सोहळ्याचा केंद्रबिंदू म्हणजे माजी प्राचार्य डॉ. डी. एफ. पाटील यांचे कार्य. आज त्यांच्या समाजहिताच्या उपक्रमांना उभे राहून १९ वर्षे पूर्ण झाली. विशेष म्हणजे त्यांच्या आयुष्याचे ८१ वे वर्ष सुरू असूनही त्यांचा उत्साह आणि मार्गदर्शन पाहून तरुणाईसुद्धा दंग होते. शरीर थकले असले तरी मन अजूनही जाज्वल्य आहे. जीवनात असंख्य अडचणी, संघर्ष आणि चढउतार त्यांनी अनुभवले; परंतु प्रत्येक वेळेस ते वन मॅन आर्मीप्रमाणे लढले. समाजासाठी झटणाऱ्या या व्यक्तिमत्वाने गणेशोत्सवाला नवे रूप दिले. बक्षीस वितरण सोहळा अनेकांनी सुरू केला, पण सातत्य टिकवणारे मात्र फक्त डॉ. पाटील ठरले. त्यांच्या दृढ इच्छाशक्तीमुळे आज पाचोऱ्यातील गणेशोत्सव हा केवळ धार्मिक आनंदाचा उत्सव न राहता सामाजिक संदेश देणारा महोत्सव बनला आहे. या वेळी अध्यक्षस्थानी वृषाली गोकुळ चव्हाण (मुंबई) होत्या. आनंद नवगिरे यांनी प्रास्ताविक केले. व्ही. टी. जोशी, शीला पाटील, उज्वला महाजन, विद्या कोतकर, प्रा. डॉ. सुनिता मांडोळे, नयना कापुरे यांनी आपली मनोगते व्यक्त करताना मंडळांच्या कामाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उज्वला महाजन यांनी केले तर आभार वर्षा राठोड यांनी मानले. प्राचार्य डॉ. डी. एफ. पाटील, आर. पी. बागूल, अशोक महाजन, के. एन. शेख, डॉ. भरतकुमार प्रजापत, राजेश धनराळे, कैलास राठोड, दुर्गा मोरे, माला पंजाबी, दत्तात्रय बोरसे पाटील, एस. एच. कोतकर, डॉ. योगेश पाटील (पत्रकार), अनिल आबा येवले (पत्रकार), खंडू सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एकनाथ सदनरशीव, के. डी. पाटील, कैलास अहिरे, नाना महाजन, साथी आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. या उपक्रमामुळे पाचोरा-भडगाव तालुक्यात गणेशोत्सवाची ओळख बदलली आहे. एकीकडे धार्मिक भक्तिभाव आणि दुसरीकडे सामाजिक संदेश – या दोन्हींचा संगम या सोहळ्यात दिसतो. पर्यावरण रक्षण, स्त्रीभ्रूण हत्या विरोध, देहदान यांसारखे विषय जनमानसात पोहोचवून मंडळांनी आपल्या जबाबदारीची जाणीव दाखवली. गणेशोत्सवाचे पावित्र्य टिकवून ठेवत त्याला समाजहिताचा आधार देणारे कार्य गेल्या १९ वर्षांपासून सुरू आहे, ही बाब केवळ अभिमानास्पदच नव्हे तर आदर्शवत आहे. आजच्या पिढीने यापासून प्रेरणा घेणे आवश्यक आहे. गणेशोत्सव हा केवळ उत्सव नाही, तर तो समाजरचनेला दिशा देणारा उत्सव ठरू शकतो हे पाचोरा-भडगावातील उपक्रमाने दाखवून दिले आहे. डॉ. डी. एफ. पाटील यांचे मार्गदर्शन, कार्यकर्त्यांची मेहनत, मंडळांचा उत्साह आणि समाजाचा प्रतिसाद – या चौघांचा संगम होत असल्याने हा सोहळा खऱ्या अर्थाने “समाजजागृतीचा दीप” ठरत आहे.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.