
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : मराठी साहित्य व कला सेवा आणि शोध आनंदाचा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, १४ सप्टेंबर २०२५ रोजी राजा शिवाजी विद्यालय, हिंदू कॉलनी, दादर येथे १९वे कविसंमेलन रंगले.
कविसंमेलनाची सुरुवात झाली ८ वर्षांच्या सत्यम विजयकुमार पवार यांनी सादर केलेल्या पोवाड्याने. छोट्या कलाकाराच्या कोवळ्या आवाजाने सभागृह मंत्रमुग्ध झाले. त्यावेळी त्याची आई आणि बहीण देखील उपस्थित होते, ज्यामुळे वातावरण आणखी उत्साही झाले.
कविसंमेलन तीन सत्रांत नियोजनबद्ध आखणी केले गेले होते: शिक्षक दिनानिमित्त पहिले सत्र, नवरात्र-दसरा साजरे करण्याचे दुसरे सत्र, आणि तिसरे सत्र मुक्त विषयावरील कविता सादरीकरणासाठी राखीव ठेवले होते.
कार्यक्रमात आश्विनी सोपान म्हात्रे, वैभवी विनीत गावडे, उत्तम कुलकर्णी, विक्रांत मारुती लाळे, कल्पना दत्तात्रेय देशमुख, प्रा. स्नेहा केसरकर, कल्पना दिलीप मापूसकर, विवेक वसंत जोशी, धनंजय पांडुरंग पाटील, अनुकूल छाया माळी आणि गुरुदत्त दिनकर वाकदेकर यांनी आपापल्या कविता सादर करून रसिकांची मने जिंकली.
चंद्रकांत दढेकर यांनी “मनातील माणसं” या नरेंद्र चपळगावकर यांच्या पुस्तकातील काही अंशांचे सादरीकरण केले, तर नमिता नितीन आफळे यांनी “साधना” या शैला दातार यांच्या पुस्तकातील काही भाग प्रभावी नाट्यमय पद्धतीने सादर केला. यामुळे उपस्थितांना भावनिक आणि मनोवेधक अनुभव मिळाला. त्यांच्या प्रभावी अभिवाचनाने संमेलनाची शोभा वाढवली आणि रसिकांमध्ये कौतुकाचे वातावरण निर्माण झाले.
आस्वादक म्हणून प्रा. जगदीश संसारे, श्रीमती मणिबेन एमपी शाह कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, मुंबईच्या १२ विद्यार्थिनी, किरण जाधव व अशोक भाई नार्वेकर यांनी विशेष उपस्थिती दर्शविली. आश्विनी सोपान म्हात्रे यांनी आणलेला खाऊ आणि नमिता आफळे यांनी आणलेले चॉकलेट हा प्रसंग खास गोड करणारा ठरला.
कार्यक्रमात प्रा. जगदीश संसारे यांचा शाल व शब्दगुच्छ अर्थात पुस्तक भेट देऊन तसेच सत्यम विजयकुमार पवार आणि गीतांजली मोहन पोळ यांना विश्वभान प्रतिष्ठान, मराठी साहित्य व कला सेवा आणि शोध आनंदाचा फाऊंडेशन यांच्या वतीने मेडल देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रम पद्धतशीरपणे आणि नियोजनबद्धरीत्या संपन्न व्हावा यासाठी विक्रांत लाळे, सनी आडेकर, वैभवी गावडे आणि नमिता आफळे यांनी विशेष सहकार्य केले. किरण जाधव यांनी छायाचित्रणाची जबाबदारी उत्कृष्टरीत्या सांभाळली.
कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांनी २०वे कविसंमेलन ५ ऑक्टोबर २०२५ रोजी आयोजित होणार असल्याचे जाहीर केले, ज्यामुळे सर्व साहित्यप्रेमींमध्ये आगामी कार्यक्रमाची उत्सुकता वाढली.
या कविसंमेलनाने साहित्यप्रेमींना मंत्रमुग्ध करणारी कविता सादरीकरणे ऐकायला मिळाली आणि सर्व उपस्थितांचा अनुभव संस्मरणीय ठरला.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.


