![]()
नवी मुंबई – स्त्रीशक्ती म्हणजे केवळ घरापुरती मर्यादित जबाबदारी नव्हे, तर समाजाच्या प्रगतीची दिशा ठरवणारी एक प्रेरणादायी शक्ती आहे, हे दाखवून देणारा एक ऐतिहासिक सोहळा नुकताच पनवेल येथे उत्साहात पार पडला. मनमुक्त फाऊंडेशनतर्फे शनिवार, दिनांक २० सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरुची हॉल, पनवेल येथे “चाकोरीबाहेरील मैत्रीणी – कर्तृत्ववान महिलांचा कृतज्ञता सोहळा” या नावाने भव्य व वैभवशाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याची मूळ संकल्पना डॉ. राजेंद्र कुन्हाडे यांनी मांडली होती. त्यांच्या विचारातून जन्माला आलेल्या या उपक्रमाला मनमुक्त फाऊंडेशनच्या सर्व सदस्यांनी जोमाने उचलून धरले. स्थापनेपासूनच मानसिक आरोग्य संवर्धन, विधवा व परित्यक्ता महिलांचे पुनर्वसन, युवक व्यक्तिमत्व विकास, अनाथ मुलांचे शिक्षण, ज्येष्ठांचा सन्मान या क्षेत्रांत फाऊंडेशनने केलेले उल्लेखनीय कार्य समाजात वेगळा ठसा उमटवत आले आहे. “व्यक्त व्हा, रिक्त व्हा, मुक्त व्हा” हे संस्थेचे ध्येयवाक्य या कार्यक्रमातही प्रत्यक्ष जाणवले. या प्रेरणादायी सोहळ्यात महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांत कर्तृत्व गाजवून स्वतःचा स्वतंत्र मार्ग तयार करणाऱ्या दहा महिलांचा सामूहिक गौरव करण्यात आला. घरगुती जबाबदाऱ्या, परंपरागत बंधने, आर्थिक मर्यादा आणि समाजातील दृष्टीकोन या साऱ्यावर मात करून या महिलांनी केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे त्या अनेकांसाठी दीपस्तंभ ठरल्या आहेत. या सन्मानार्थींमध्ये मनीषा यादव, अनिता कोलते, गीता जुन्नरकर-राऊत, प्रतीक्षा वाडे, सुचित्रा घोगरे काटकर, नेहा दाबके, स्मिता गायकवाड, सुरेखा काटकर, संध्या गायकवाड आणि देवयानी गोविंदवार या नावांचा विशेष समावेश आहे. त्यांच्या प्रवासाने सिद्ध केले की स्त्रीशक्तीला कोणतीही चौकट थांबवू शकत नाही. सदर कृतज्ञता सोहळ्यास महाराष्ट्रातील नामांकित मान्यवर उपस्थित राहून महिलांच्या या यशगाथांना मानाचा मुजरा केला. मनीषा वर्मा (अपर मुख्य सचिव, प्रशासकीय नाविन्यता, उत्कृष्टता व सुशासन, महाराष्ट्र), अंजली ढमाळ (उपसंचालक, मराठी भाषा विभाग, मंत्रालय), डॉ. वैशाली पाटील (ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व संचालिका, अंकुर ट्रस्ट) आणि ललिता बाबर (उपआयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका) या व्यक्तिमत्त्वांच्या उपस्थितीने सोहळ्याला विशेष वैभव प्राप्त झाले. त्यांच्या प्रेरणादायी भाषणांनी उपस्थित प्रेक्षकांच्या मनात स्त्रीशक्तीबद्दल नवा आत्मविश्वास निर्माण झाला. कार्यक्रमात बोलताना मान्यवरांनी मनमुक्त फाऊंडेशनच्या कार्याचे विशेष कौतुक केले. संचालिका अस्मिता कालन, मनिषा कुन्हाडे व मुक्ता भोसले यांच्या अथक परिश्रमामुळे हा दैदिप्यमान सोहळा यशस्वीपणे पार पडला, असे सर्वांनी एकमुखाने नमूद केले. समाजातील प्रत्येकाला आपल्या व्यस्त जीवनातून थोडा वेळ काढून “व्यक्त व्हा, रिक्त व्हा, मुक्त व्हा” या संकल्पनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले. या भव्य सोहळ्याचे सूत्रसंचालन डॉ. पराग कालन आणि दिव्या भोसले यांनी आकर्षक, सहज व भावनात्मक शैलीत केले. त्यांच्या सूत्रसंचालनामुळे कार्यक्रम अधिक रंगतदार व संस्मरणीय ठरला. उपस्थित प्रेक्षकांनी या सोहळ्याचे अनुभवताना स्त्रीशक्तीचा गौरव करण्याची ही योग्य संधी असल्याची भावना व्यक्त केली. सोहळ्याच्या अखेरीस डॉ. राजेंद्र कुन्हाडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, अशा प्रकारचे कार्यक्रम भविष्यात सातत्याने आयोजित करण्यात येतील. कारण, स्त्रीशक्तीचा गौरव करणे म्हणजे समाजाला प्रेरणा देणे आणि नव्या पिढीला आदर्श घालून देणे होय. पनवेल शहर या दिवसाचा एक ऐतिहासिक साक्षीदार ठरले. स्त्रीशक्तीला मानाचा मुजरा अर्पण करणारा हा सोहळा महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबासाठी अभिमानाचा ठरला असून, मराठी भाषा आणि संस्कृतीचे दर्शन उपस्थितांच्या पोशाखातून व बोलण्यातून घडले. या सोहळ्याने समाजातील प्रत्येकाला विचार करायला लावले की, स्त्री ही केवळ घरापुरती मर्यादित नसून, समाजाच्या प्रगतीला दिशा देणारी एक सशक्त शक्ती आहे.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.






