वादळपावसाने घडवले मानवतेचे धडे : पाचोरा पंचक्रोशीतील नागरिकांचे अष्टपैलू सहकार्य

0

Loading

पाचोरा – शहर, तालुका आणि पंचक्रोशी परिसर तसेच संलग्न तालुके व जिल्ह्यांमध्ये निसर्गाने आपली प्रचंड ताकद दाखवून दिली. वरून आकाशात राजाने कडकडाट करत विजांचा प्रचंड कडकडाट केला आणि त्यानंतर वादळ व मुसळधार पावसाने थैमान घातले. धरण, नद्या, नाले तर उफाळून वाहू लागलेच, पण गेल्या पन्नास वर्षांत नागरिकांनी कधीच पाहिला नव्हता असा विध्वंसक वादळी पाऊस यावेळी कोसळला. या पावसाने परिसरातील शेतकरी, व्यापारी, कामगार, घरगुती महिलांपासून लेकरांपर्यंत प्रत्येक घटकाला भयभीत केले. पाचोरा परिसरातील वृद्ध मंडळींनीही थरथरत सांगितले की, “आमच्या जन्मात कधी असं थैमान आम्ही पाहिलं नव्हतं.” या संकटाच्या क्षणी सर्वांत मोठे उदाहरण घडले ते म्हणजे मानवतेचे. जे माजी सैनिक कधी देशाच्या सीमेवर तैनात राहून राष्ट्रसेवा करत होते, तेच आज पुन्हा एकदा आपल्या गावात, शहरात, शेजाऱ्यांत, माताभगिनींच्या रक्षणासाठी पुढे सरसावले. त्यांच्यावरची वर्दी जणू पुनश्च परिधान झाली आणि देशसेवेइतकेच गाव-समाजसेवेचे महत्त्व त्यांनी दाखवून दिले. त्यांच्या बरोबरच मंत्री, आमदार, खासदार, विविध राजकीय पक्षांचे आजी-माजी पदाधिकारी, सरकारी अधिकारी, निमसहकारी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था या सर्वांनी एकत्रित येऊन मदतीचा हात पुढे केला. जात, धर्म, पंथ यांच्या पलीकडे जाऊन प्रत्येक नागरिकाने “मी फक्त मानव आहे आणि मानवतेची सेवा हा माझा धर्म आहे” ही भावना डोळ्यासमोर ठेवून तन, मन आणि धनाने अष्टपैलू सहकार्य केले. याच क्षणी साने गुरुजींच्या कवितेतील अमर ओळी जणू आकाशातून दुमदुमून गेल्या—”खरा तो एकच धर्म, जगाला प्रेम अर्पावे.” या ओळींनी जणू प्रत्येक नागरिकाला प्रेरणा दिली आणि प्रेम, करुणा, माणुसकी या तीन मूल्यांनीच मानवतेचे रक्षण होते हे अधोरेखित केले. आई, बहिणी, मुली याही मागे राहिल्या नाहीत. काहींनी स्वयंपाक करून गरम जेवण पोहोचवले, काहींनी आपल्या घरातील कपडे, अंथरुणं गरजूंसाठी दिली, तर काहींनी लहान मुलांच्या रडण्यावर स्वतःच्या लेकरांप्रमाणे त्यांना कुशीत घेतले. लहानग्यांनीही हातभार लावला—कधी पाणी पोहोचवले, कधी पिशव्या भरून नेल्या. प्रत्येकाच्या नजरेत केवळ एकच गोष्ट होती, ती म्हणजे संकटातून माणसाला वाचवणे. या वादळाने शेती तर अक्षरशः उध्वस्त केली. पिके पाण्याखाली गेली, शेतकऱ्यांचे स्वप्न उद्ध्वस्त झाले. कुणाचे घर कोसळले, कुणाचे संसार वाहून गेले. बऱ्याच जणांच्या डोळ्यांसमोर संसार उध्वस्त होतानाचा क्षण येऊन गेला. स्त्रियांचे दुःख शब्दांत मावत नाही, तर वृद्धांची हतबलता पाहून हृदय पिळवटून गेले. पण या भयाण परिस्थितीत एक गोष्ट समाधानकारक ठरली—संपूर्ण जनतेने एकजुटीने जागरूकपणे काम केल्यामुळे जीवितहानी टळली. जीव वाचवणे हेच सर्वांत मोठे कार्य ठरले. या सर्व अनुभवातून एक गोष्ट स्पष्ट झाली—निसर्गाने मानवजातीला एक धडा शिकवला आहे. जणू निसर्ग म्हणत आहे, “मानवा, तू जंगलं संपवलीस, झाडं तोडलिस, वाळू लुटलीस, नद्या आक्रसवल्या, माझं रूप विद्रूप केलंस… आता माझा बदला घ्यायलाच हवा.” आज आपण केलेल्या पापांची फळं निसर्ग आपल्या हातून वसूल करत आहे. आपल्याकडून नष्ट झालेल्या हिरवाईने, नष्ट झालेल्या निसर्गसंपत्तीनेच आज उग्र रूप धारण करून आपल्याला कळवले आहे की, चुकीची पावलं आता सुधारण्याची गरज आहे. पाचोरा पंचक्रोशीतील या आपत्तीने माणसामाणसांमधील भिंती पाडल्या. कुणी कोणत्या पक्षाचा, कुणी कोणत्या जातीचा, कुणी कोणत्या धर्माचा याची गणना कोणालाही नव्हती. सर्वत्र फक्त “आपण सारे एक” हा भाव दाटून आला. माणुसकीचा विजय निसर्गाच्या कहरावरही जणू ठसा उमटवून गेला. संकट कितीही मोठं असलं तरी आपण सारे मिळून उभं राहिलो, तर संकटाला हरवणं अशक्य नाही हे या प्रसंगाने सिद्ध केलं. ज्यांचे संसार उध्वस्त झाले त्यांच्या डोळ्यातील पाणी पाहून हृदय द्रवून जाते. वृद्ध आईचे थरथरणारे ओठ, घर गमावलेल्या मुलांचे निःशब्द रडणे, धान्यपाणी वाहून गेलेल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यांतले हतबल अश्रू—हे सारे दृश्य पाचोरा शहर व तालुक्यात कुठेही पाय ठेवला तरी पाहायला मिळाले. माणुसकीने मात्र प्रत्येकाला आधार दिला. एखाद्याने कपडे दिले, एखाद्याने घर उघडले, एखाद्याने शेजाऱ्याला आपल्या अंगणात आसरा दिला. ही दृश्यं जणू मानवतेच्या खरी ताकदीची साक्ष देऊन गेली. निसर्गाच्या या धड्यामुळे आता आपल्याला बदलण्याची वेळ आली आहे. जंगल जपायची, नद्या स्वच्छ ठेवायच्या, वाळूची चोरी थांबवायची आणि झाडं लावायची—ही आपली जबाबदारी आहे. अन्यथा निसर्गाचा कोप आणखी कठोर होईल. या वादळपावसाने दिलेला धडा विसरला, तर पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही. पाचोरा पंचक्रोशीतील नागरिकांनी दाखवलेली एकजूट, अष्टपैलू सहकार्य आणि मानवतेचा धर्म यामुळे आज सारेच म्हणत आहेत—निसर्गाचा कहर जरी प्रचंड होता, तरी माणुसकीची ताकद त्याहून मोठी होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here