पुरानंतर पाचोरा नगरपालिकेचा कठोर निर्णय : बसस्टॅन्ड रोडवरील अतिक्रमण हटवून नाले व गटारी मोकळे, नागरिकांच्या डोळ्यात दिलाशाचे अश्रू

0

Loading

पाचोरा – शहराने दिनांक 22 सप्टेंबर रोजी अनुभवलेला पुराचा तांडव अजूनही नागरिकांच्या मनातून गेला नाही. आकाशातून कोसळलेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे तसेच घाटमाथ्यावर झालेल्या अतिवृष्टीमुळे धरणे, नाले, ओढे ओसंडून वाहू लागले आणि त्याचा थेट फटका शहराला बसला. बसस्टॅन्ड परिसर ते रेल्वे उड्डाणपूल, जनता वसाहत, छत्रपती शिवाजी नगर, नागसेन नगर, भीम नगर, सफाई कामगार वसाहत तसेच बसस्टॅन्ड रोड या भागांत पाणी इतक्या झपाट्याने शिरले की, काही कुटुंबांना संसाराचा गडाच वाहून गेला. घरातील कपाटे, अंथरूण, शालेय दप्तर, पुस्तके, गणवेश, किराणा माल, भाकरीचे टोप, अगदी शिजवलेला जेवणाचा भांडाही पाण्यात तरंगताना दिसला. या दृश्याने अनेकांच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले. नुकसानीची व्याप्ती इतकी होती की शेकडो नागरिकांनी उघड्यावर रात्र काढली. काहींनी छपरावर चढून जीव वाचवला. एक वृद्ध सफाई कामगार वसाहतीतील आजीबाई पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या, “आमच्या नातवाच्या शाळेच्या पुस्तकांचा गठ्ठा पाण्यात गेला. तो सारखा विचारतो, आता मी शाळेला कसा जाणार? याचे उत्तर माझ्याकडे नाही.” एका गृहिणीने सांगितले, “पाणी घरात इतक्या झपाट्याने आले की दोन वर्षांचा मुलगा गादीवर बसलेला होता, पाणी गादीवर येऊन त्याला उचलून घ्यायला आम्हाला जीवाच्या आकांताने धाव घ्यावी लागली.” या भीषण परिस्थितीची दखल घेऊन पालकमंत्री गुलाबराव पाटील, आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, आमदार किशोर पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, तसेच स्थानिक नेते अमोल शिंदे व वैशाली सूर्यवंशी यांनी घटनास्थळी भेट देऊन पूरग्रस्तांना धीर दिला. त्यांनी पाचोरा नगरपालिका प्रशासनाला स्पष्ट शब्दांत आदेश दिला की, “नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळाली पाहिजे, पंचनामे करून अहवाल सादर झाला पाहिजे आणि ज्या कारणामुळे पाणी अडले त्या मुळावर गदा घातली पाहिजे.” यानंतर पाचोरा नगरपालिका प्रशासनाने कठोर पाऊल उचलले. प्रशासक मंगेश देवरे यांनी बुधवारी दिनांक 24 सप्टेंबर रोजी पहाटेपासूनच मोठा फौजफाटा रस्त्यावर उतरवला. जेसीबी, ट्रॅक्टर आणि शेकडो कर्मचाऱ्यांच्या साथीने त्यांनी बसस्टॅन्ड रोडवरील नाले आणि गटारींवरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवली. छत्रपती शिवाजी नगरातील नाल्यावर उभारलेली सात ते आठ पक्या दुकानांची रांग ही नागरिकांच्या संकटाचे मूळ होती. नाल्यांवर सिमेंटचे बीम टाकून त्यावर लोखंडी अँगल व पत्रे लावून दुकाने बांधली गेली होती. या अतिक्रमणामुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह पूर्णपणे बंद झाला होता. परिणामी पाणी उलटून घरे, वस्त्या पाण्यात बुडत होत्या. या वस्तुस्थितीची प्रचिती घेतल्यानंतर प्रशासक देवरे यांनी कुठलाही विलंब न करता जेसीबीच्या सहाय्याने ती सर्व दुकाने जमिनदोस्त केली. नागरिकांनी हात जोडून या कारवाईला पाठिंबा दर्शवला. फक्त तेवढेच नव्हे तर बसस्टॅन्ड रस्त्यावरील गटारींवर टाकलेले सिमेंटचे ढापे आणि त्यावर बसवलेले दुकानदारांचे अतिक्रमणही पाण्याच्या निचऱ्यास मोठा अडथळा ठरत होते. अनेक नागरिकांनी सांगितले की, “आम्ही कित्येकदा नगरपालिकेकडे तक्रारी दिल्या होत्या, पण अडथळे दूर झाले नाहीत. त्यामुळे पावसात आमची घरे नेहमी पाण्याखाली जातात.” या वेदना ऐकून प्रशासक देवरे यांनी सर्व ढापे तोडून टाकण्याचा निर्णय घेतला. काही तासांतच त्या गटारी पुन्हा मोकळ्या झाल्या. मोहिम सुरू करण्यापूर्वी पाचोरा नगरपालिका प्रशासनाने सर्व दुकानदारांना नोटिसा देऊन अतिक्रमण स्वखुशीने काढण्याची संधी दिली होती. मात्र कोणीही पुढे आले नाही. अखेरीस बुधवारी सकाळी जेसीबींचा गडगडाट सुरू झाला आणि दुपारी बारा वाजेपर्यंत बसस्टॅन्ड रोडवरील पक्या दुकानांचे अतिक्रमण हटवून टाकले गेले. या कारवाईच्या वेळी काही दुकानदार नाराजी व्यक्त करत होते, परंतु बहुसंख्य रहिवासी मात्र डोळ्यांत अश्रू आणून म्हणत होते, “आज प्रशासनाने खरोखर आमच्या मुलांच्या भविष्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे.” प्रशासक मंगेश देवरे यांनी स्पष्ट केले की, “शहरातील नागरिकांच्या सुरक्षेपेक्षा महत्त्वाचे दुसरे काहीही नाही. पाणी वाहून जाण्याच्या मार्गात अडथळे निर्माण करणारे आणि नागरिकांच्या जीवितास धोका पोहोचवणारे अतिक्रमण आम्ही अजिबात सहन करणार नाही. बसस्टॅन्ड परिसरातील कारवाई ही सुरुवात आहे, लवकरच शहरातील इतर नाले व गटारींवरील अतिक्रमणही हटवले जाणार आहे.” पाचोरा नगरपालिका प्रशासनाच्या या कठोर कारवाईमुळे नागरिकांच्या चेहऱ्यावर दिलाशााचे भाव उमटले आहेत. काहींनी ही मोहीम ‘जगण्याचा श्वास परत मिळाल्यासारखी’ असल्याची प्रतिक्रिया दिली. एक गृहस्थ म्हणाले, “पावसाच्या पाण्यात आमची घरे बुडत होती, पण आता गटारे मोकळी झाल्यावर निदान सुरक्षिततेची आशा निर्माण झाली आहे.” पुराच्या भीषण घटनेनंतर पाचोरा नगरपालिका प्रशासनाने दाखवलेली ही तत्परता ही केवळ अतिक्रमण हटवण्यापुरती मर्यादित नसून, नागरिकांच्या आयुष्याला सुरक्षित करण्यासाठी उचललेले धाडसी पाऊल आहे. आपत्ती निवारणापासून शहराच्या शाश्वत विकासापर्यंतचा हा प्रवास प्रशासन व नागरिकांच्या एकत्रित प्रयत्नांमुळेच शक्य होईल, याची जाणीव या कारवाईने करून दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here