मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : सेवा मंडळ एज्युकेशन सोसायटी संचालित श्रीमती एम.पी.शाह महिला महाविद्यालयच्या मराठी विभागात शारदोत्सव व्याख्यानमाला २०२५ (वर्ष पाचवे) अंतर्गत ‘‘नवदुर्गा : नवविचार- बहुआयामी स्त्री’’ व्याख्यानमालेच्या दुसऱ्या पुष्पात विद्यार्थिनींसमोर ‘‘गंध सुरांचा ठाव स्त्रीमनाचा’’ ह्या विषयावर संस्कार प्रतिष्ठानच्या विश्वस्त व संगीत विशारद ॲड. सुरेखा भुजबळ यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले.
ॲड. सुरेखा भुजबळ म्हणाल्या, ‘‘संगीत आणि सूर हे केवळ संवेदना नाहीत, तर स्त्रीमनाच्या अस्तित्वाचे अविभाज्य भाग आहेत. सुरांमधील गंध जेव्हा स्त्रीच्या कोमल मनाचा ठाव घेतो, तेव्हा खऱ्या अर्थाने स्त्री स्वतःसाठी जगते. शारदोत्सवा निमित्ताने विद्यार्थिनींसमोर ह्या सुंदर विषयावर बोलण्याची संधी मिळाली. पाश्चिमात्य संगीताबरोबरच भारतीय शास्त्रीय व सुगम संगीत महत्त्वाचे आहे; कारण आपल्याला आपली परंपरा जोपासणे आणि वाढवणे आवश्यक आहे.’’
महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अर्चना पत्की यांनी व्याख्यानमालेस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाची सुरुवात सहा.प्रा. माधवी पवार यांच्या शारदास्तवनाने झाली. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तृतीय कला शाखेतील प्राची रांगळे, परिचय सिद्धी मेमाणे, तर आभार प्रदर्शन कीर्ती नाटेकर यांनी ओघवत्या शैलीत केले. कार्यक्रमास माननीय प्राध्यापकवृंद, ग्रंथालयीन व शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.