मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : सेवा मंडळ एज्युकेशन सोसायटी संचालित श्रीमती एम पी शाह महिला महाविद्यालयच्या मराठी विभागात शारदोत्सव २०२५ (वर्ष पाचवे) निमित्ताने सुरू झालेल्या ‘‘नवदुर्गा : नवविचार’’ व्याख्यानमालेत पहिले पुष्प विद्यार्थिनींसमोर राजमाता जिजाबाई : स्वराज्य जननी राष्ट्रमाता ह्या विषयावर रंगले.
कार्यक्रमात व्हॉईस कोच, लेखिका व इतिहास कथनकार पद्मश्री राव यांनी राजमाता जिजाबाईंच्या नेतृत्वाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले, ‘‘जिजाबाई हे केवळ मातृत्वाचे नव्हे, तर नेतृत्वाचेही आदर्श आहेत. त्यांचे विचार आणि तत्त्वे आजही विद्यार्थिनींसाठी मार्गदर्शक ठरतात. आजच्या काळात प्रत्येक स्त्रीला त्यांच्यातील जिजाऊ शोधणे आवश्यक आहे. जिजाई आणि शिवबा यांचा संबंध हे एक वेगळेच उदाहरण आहे. शारदोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थिनींसमोर जिजाबाईंच्या नवविचारांचे तेजस्वी दर्शन घडवणे ही काळाची गरज आहे.’’
महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अर्चना पत्की यांनी व्याख्यानमालेस शुभेच्छा दिल्या. उपप्राचार्य डॉ. अवनीश भट आणि कला शाखाप्रमुख डॉ. हिना शाह यांनी सांगितले, ‘‘नऊ दिवस साजरा होणारा शारदोत्सव आणि त्यातून हाताळले जाणारे विषय विद्यार्थिनींच्या सृजनतेला चालना देतात. अशा कार्यक्रमांचे आयोजन ही काळाची गरज आहे.’’
कार्यक्रमाची सुरुवात सहा. प्रा. माधवी पवार यांच्या महालक्ष्मी अष्टकाने झाली. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तृतीय कला शाखेतील अश्विनी चव्हाण यांनी तर आभार प्रदर्शन संघमित्रा पडवणकर यांनी ओघवत्या शैलीत केले. कार्यक्रमास माननीय प्राध्यापकवृंद, ग्रंथालयीन व शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.