दहिसर दसरा २०२५: भक्तिप्रधान १८वा नवरात्रोत्सव, दररोज देवीचे अलौकिक दर्शन आणि भव्य दीपोत्सव

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : मुंबईतील जीएसबी समुदाय भक्तांसाठी आणखी एक खास उत्सव घेऊन येत आहे. दहिसर येथील जीएसबी सभा आयोजित दहिसर दसरा १८वा नवरात्रोत्सव २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ दरम्यान सारस्वत कल्चरल अँड रिक्रिएशन सेंटर (जी.एस.बी. गार्डन), एन.एल. कॉम्प्लेक्सजवळ, दहिसर ईस्ट, मुंबई येथे रंगणार आहे. हा उत्सव भक्तांना देवीच्या दिव्य अवतारांचे दर्शन घेऊन त्यांच्या श्रद्धा आणि भक्तिप्रधान अनुभवाचा आनंद घेण्याची अनन्यसाधारण संधी देतो. प्रत्येक दिवशी देवीचे वेगळे रूप दर्शनासाठी सजवले जाते, ज्यामुळे भक्तांना तिच्या प्रत्येक दिव्य अवताराचे पूजन करण्याची संधी मिळते. २००८ मध्ये परमपूज्य श्रीमद् सुधीन्द्र तीर्थ स्वामीजींच्या कृपाशिर्वादाने सुरू झालेला हा उत्सव आज मुंबईतील सर्वाधिक प्रतिष्ठित नवरात्रोत्सवांपैकी एक ठरला आहे.

भव्य दीपोत्सव आणि ‘माँ काली’ची पूजा हे उत्सवाचं मुख्य आकर्षण आहे. अष्टमीच्या दिवशी हजारो दिव्यांच्या प्रकाशाने उजळलेल्या मंडपामध्ये भक्तिभावाने पूजा केली जाते. दिव्यांच्या लुकलुकणाऱ्या प्रकाशात भक्तिगीतांचे स्वर आणि सामूहिक प्रार्थनेचे वातावरण भक्तांना मंत्रमुग्ध करते. उत्सव केवळ श्रद्धेचा नव्हे, तर सेवांचा आदर्शही ठरतो. दरवर्षी ५०,००० हून अधिक भक्तांना महाप्रसाद, पात्र विद्यार्थ्यांना १५–२० लाख रुपयांच्या शिष्यवृत्तीचे वितरण, तर २,००० पेक्षा जास्त मुलांना मोफत शैक्षणिक साहित्य संच प्रदान केले जातात.

समाजसेवा आणि सांस्कृतिक समृद्धी यावरही उत्सव भरपूर भर देतो. नियमित रक्तदान शिबिरे, मोफत आरोग्य तपासण्या आणि सतत चालू असलेली वैद्यकीय मदत समाजकल्याणात जीएसबी सभेची बांधिलकी अधोरेखित करतात. शास्त्रीय नृत्य, भजन-कीर्तन, वाद्यसंगीत आणि दीपोत्सवाची शोभा या सर्वांनी उत्सवाला विशेष ओळख दिली आहे. ह्या ह्या महापर्वाचे यूट्यूब आणि फेसबुक (@GSBSabhaDahisar) वर थेट प्रक्षेपण केले जाणार आहे, ज्यामुळे जगभरातील भक्तही उत्सवाचा अनुभव घेऊ शकतील.

जीएसबी सभा, दहिसर-बोरिवलीचे जयेश प्रभू म्हणाले, “१८ वर्षांपासून दहिसर दसरा हा केवळ सण नव्हे, तर श्रद्धा, सेवा आणि ऐक्याची एक यात्रा आहे. या वर्षीही आम्ही आपल्या परंपरा पुढे नेण्याचे वचन पुन्हा एकदा देत आहोत, तसेच शिक्षण, आरोग्यसेवा आणि अन्नदानाद्वारे समाजाची सेवा करत आहोत. मुंबईकरांना आमच्या नवरात्र उत्सवातील दैवी अनुभव आणि सांस्कृतिक संपन्नतेत सामावून घेण्यासाठी मनःपूर्वक आमंत्रित करतो.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here