दिल्ली (गुरुदत्त वाकदेकर) : केंद्र सरकार लवकरच एक स्मार्ट “जॉब डॅशबोर्ड” सुरू करणार आहे. या डॅशबोर्डवर एका क्लिकमध्ये विद्यार्थ्यांना, पालकांना आणि शैक्षणिक संस्थांना भविष्यात कोणत्या क्षेत्रात किती नोकऱ्या उपलब्ध असतील आणि त्या नोकऱ्यांसाठी कोणती कौशल्ये आवश्यक आहेत, हे समजेल. हा उपक्रम ब्रिटनच्या “जॉब्स अँड स्किल्स डॅशबोर्ड” आणि अमेरिकेतील वॉशिंग्टन राज्यातील “लेबर मार्केट अँड क्रेडेन्शियल डेटा डॅशबोर्ड”च्या धर्तीवर राबवला जाणार आहे.
यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने दूरसंचार आणि आयटी विभागाशी चर्चा केली आहे. ५जी, ६जी, क्वांटम कम्युनिकेशन्स, उपग्रह, कृत्रिम बुद्धिमत्ता, इंटरनेट ऑफ थिंग्ज, मशीन लर्निंग आणि सेमीकंडक्टर्स यांसारख्या क्षेत्रांमध्ये भविष्यात किती तज्ञांची गरज भासेल, याबाबत विभागांनी आपली मते मांडली आहेत. या डॅशबोर्डमुळे विद्यार्थ्यांना व पालकांना योग्य अभ्यासक्रम निवडणे सोपे होईल. तसेच शिक्षणानंतर कोणत्या करिअर संधी उपलब्ध होऊ शकतात, याची माहिती आधीच मिळेल.
शैक्षणिक संस्थांना अभ्यासक्रमात आवश्यक बदल करणे, नवे अभ्यासक्रम सुरू करणे किंवा कालबाह्य अभ्यासक्रम बंद करणे याबाबत या डॅशबोर्डकडून दिशा मिळेल. त्यामुळे रोजगारक्षम मनुष्यबळ तयार करण्यात या उपक्रमाची मोलाची भूमिका असेल. सध्या देशात कामगार ब्युरो डॅशबोर्ड, नियतकालिक कामगार दल सर्वेक्षण, भारत स्किल्स पोर्टल, स्किल इंडिया डिजिटल हब आणि असीम पोर्टल कार्यरत आहेत; परंतु ही साधने मुख्यतः भूतकाळातील आकडेवारी, प्रशिक्षण किंवा रोजगार जुळवणीपुरतीच मर्यादित आहेत.
अमेरिका आणि ब्रिटनमध्ये असे डॅशबोर्ड यशस्वीरीत्या चालवले जात आहेत. वॉशिंग्टन राज्यात हा डॅशबोर्ड रोजगार सुरक्षा विभाग आणि वॉशिंग्टन स्टेम या संस्थेकडून चालवला जातो. मे २०२५ मध्ये तेथील रिक्त पदांचा दर ३.७ टक्के होता. ब्रिटनमध्ये शिक्षण मंत्रालयाच्या देखरेखीखालील या पोर्टलवर राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या आकडेवारीवर आधारित माहिती दिली जाते. जून ते ऑगस्ट २०२५ या काळात ब्रिटनमध्ये तब्बल ७,२८,००० रिक्त पदांची नोंद झाली होती.
भारतामध्ये हा उपक्रम राबवताना विविध मंत्रालये, शैक्षणिक संस्था आणि खाजगी क्षेत्रातील माहिती एका व्यासपीठावर आणणे हे मोठे आव्हान ठरणार आहे. यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. एआयसीटीई, यूजीसी आणि एनसीव्हीईटी या संस्था या कार्यात महत्त्वाची भूमिका बजावतील. भविष्यातील रोजगार आणि शिक्षणाच्या दिशा दाखवणारा हा स्मार्ट जॉब डॅशबोर्ड देशातील तरुणांसाठी महत्त्वाची संधी निर्माण करेल.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.