![]()
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : सेवा मंडळ एज्युकेशन सोसायटी संचालित श्रीमती मणिबेन एम. पी. शाह कला आणि वाणिज्य स्वायत्त महिला महाविद्यालय मराठी विभाग आयोजित ‘शारदोत्सव व्याख्यानमाला २०२५ (वर्ष पाचवे) नवदुर्गा : नवविचार- बहुआयामी स्त्री’ या व्याख्यानमालेत ‘पु. ल. आणि सुनीताबाई सहजीवन’ या विषयावर लेखिका व कथाकथनकार मंजिरी देवरस यांचे व्याख्यान आभासी पद्धतीने आयोजित करण्यात आले होते.
या व्याख्यानात महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असलेल्या पु. ल. देशपांडे यांच्या जीवनात त्यांच्या सुविद्य पत्नी सुनीता देशपांडे यांचे किती महत्त्वाचे योगदान होते यावर प्रकाश टाकण्यात आला. पुलंच्या कलागुणांना जपत त्यांना सांभाळणाऱ्या सुनीताबाईंची जीवनयात्रा आणि त्यांची सहचारिणी म्हणून निभावलेली निःस्वार्थी भूमिका यांचे विविध पदर उलगडले गेले.
मंजिरी देवरस म्हणाल्या, “पु. ल. हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या आयुष्यात सुनीताबाईंचे योगदान मोठे आहे. त्यांच्या लिखाणात एकमेकांबद्दलच्या भावना आणि आठवणींचा सुंदर मिलाफ दिसतो. हे जोडपे म्हणजे जणू शिस्तप्रिय लेखणीच. भाई हा एक जातिवंत कलावंत आहे, त्यामुळे त्याने क्षणोक्षणी लोकांना आनंद देण्यासाठी लिहित राहावं, असे उद्गार सुनीताबाई काढायच्या. एका सर्वगुणसंपन्न, निःस्वार्थी पत्नीचे पतीविषयी असणारे हृदयस्पर्शी बोल यातून दिसतात आणि सहजीवनाचे सशक्त दर्शन घडते.”
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तृतीय कला शाखेतील मनिषा शिलवंत हिने केले. परिचय एकता पारकर यांनी करून दिला तर आभार प्रदर्शन कनिष्ठ महाविद्यालयाच्या मराठी विभाग प्रमुख प्रा. नेहा भोसले यांनी केले. कार्यक्रमास प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.






