मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आशिया कप २०२५ मधील सुपर फोर सामन्यात भारताने बांगलादेशवर ४१ धावांनी दणदणीत विजय मिळवला. भारताचा हा या स्पर्धेतील सलग पाचवा विजय ठरला. दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या चौथ्या टी-२० सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत १६८ धावा केल्या आणि प्रतिस्पर्ध्यास १६९ धावांचे लक्ष्य दिले. प्रत्युत्तरात बांगलादेशाचा डाव १९.३ षटकांत १२७ धावांवर गुंडाळला गेला.
नाणेफेक बांगलादेशाने जिंकली आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतासाठी अभिषेक शर्मा चमकदार ठरला. त्याने केवळ ३७ चेंडूत ७५ धावा करत सामन्याचा पाया रचला. या खेळीत त्याने ६ चौकार आणि ५ षटकार फटकावले. अभिषेक आशिया कप स्पर्धेतील नवा सिक्सर किंग ठरला. त्याला शुभमन गिलने १९ चेंडूत २९ धावांचे योगदान दिले, तर हार्दिक पांड्याने ३८ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. भारताने २० षटकांत १६८/६ अशी मजल मारली.
बांगलादेशकडून तंजिम हसन साकिब, मुस्ताफिझुर रहमान आणि मोहम्मद सैफुद्दीन यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला, तर रिषाद हुसैनने २ गडी बाद केले.
१६९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशचा सलामीवीर सैफ हसन ६९ धावांसह झुंजार लढला. पण त्याला योग्य साथ लाभली नाही. परवेज हुसैन इमोनने २१ धावा केल्या; मात्र त्यानंतर बाकीच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांसमोर शरणागती पत्करली. जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव यांनी बांगलादेशच्या आशा संपवल्या.
भारतीय गोलंदाजांपैकी कुलदीप यादव सर्वाधिक यशस्वी ठरला. त्याने ४ षटकांत केवळ १८ धावा देत ३ गडी बाद केले. बुमराह आणि चक्रवर्ती यांनी प्रत्येकी २, तर तिलक वर्मा आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.
या सामन्याचा सामनावीर अभिषेक शर्मा ठरला. त्याच्या आक्रमक फलंदाजीमुळे भारताला निर्णायक धावसंख्या उभारता आली आणि अखेरीस ४१ धावांनी विजय मिळवून भारतीय संघ स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला संघ ठरला.
भारताचा पुढचा सामना २६ सप्टेंबर २०२५ रोजी दुबईमध्ये श्रीलंकेविरुद्ध होणार आहे.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.