मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : सेवा मंडळ एज्युकेशन सोसायटी संचालित श्रीमती मणिबेन एम. पी. शाह कला आणि वाणिज्य स्वायत्त महिला महाविद्यालय, मराठी विभाग आयोजित ‘शारदोत्सव व्याख्यानमाला २०२५ (वर्ष पाचवे) नवदुर्गा : नवाविचार- बहुआयामी स्त्री’ या मालिकेतील चौथे पुष्प ‘स्त्रीचे समाजभान’ या विषयावर लेखिका व समाजसेविका रोटेरियन जयश्री चौधरी यांचे व्याख्यान उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. विद्यार्थिनींच्या उपस्थितीमुळे सभागृहात उत्साहाचे वातावरण रंगले होते.
आपल्या व्याख्यानात जयश्री चौधरी म्हणाल्या की, स्त्री केवळ कुटुंबाची जबाबदारी सांभाळत नाही तर ती समाजरचनेतील एक सक्षम घटक आहे. समाजभान म्हणजे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि नैतिक जबाबदाऱ्यांची जाणीव ठेवून कृती करणे होय. स्त्री सजग झाली तर संपूर्ण समाज सुजाण, समतावादी आणि प्रगतिशील होतो. त्यांच्या विचारांना विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त दाद दिली.
कार्यक्रमाची सुरूवात एकात्म मानववादाचे प्रणेते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्र स्वच्छता अभियान यावर प्रतिज्ञा घेऊन झाली. या कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अर्चना पत्की यांनी शुभेच्छा दिल्या. शारदोत्सव २०२५ या सलग नऊ दिवस चालणाऱ्या व्याख्यानमालेचे हे चौथे सत्र असून, विचारमंथन आणि संवादाच्या माध्यमातून विद्यार्थिनींमध्ये नवचेतना निर्माण झाली.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनाली मणचेकर यांनी केले. प्राची गुढेकर यांनी व्याख्यात्यांचा परिचय करून दिला तर आभार प्रदर्शन दीक्षा घनवटे यांनी केले. प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनींच्या मोठ्या उपस्थितीने कार्यक्रम अधिक आकर्षक झाला. शारदोत्सवाच्या या चौथ्या माळेत स्त्रीचे सजग, सृजाण आणि प्रगतीवादी समाजभान प्रभावीपणे प्रकट झाले.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.