पाचोरा – शहरातील चितामणी कॉलनी परिसरात एक महिला घरी एकटी असताना शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने अचानक निर्वस्त्र अवस्थेत घरात शिरून तिच्यावर मारहाण करत साडी ओढण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून आरोपी रामभाऊ माधव पाटील (रा. चितामणी कॉलनी, पाचोरा) याच्याविरोधात पाचोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून

मिळालेल्या माहितीनुसार, 26 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी सुमारे अकराच्या सुमारास हा प्रकार घडला. पीडित महिला घरात एकटी होती. तिचे पती सरकारी शाळेत शिक्षक असून ते त्या दिवशी ड्युटीवर गेले होते, तर घरातील वडीलधारीही इतर कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यावेळी आरोपी रामभाऊ माधव पाटील हा अचानक निर्वस्त्र अवस्थेत घरात घुसला. त्याने थेट महिलेपाशी जाऊन तिच्या चेहऱ्यावर चापट व बुक्यांनी मारहाण केली आणि तिची साडी खेचून अश्लील वर्तन करण्याचा प्रयत्न केला. या अचानक झालेल्या हल्ल्याने महिला घाबरून मदतीसाठी ओरडू लागली. तिच्या आरडाओरड ऐकताच कॉलनीतील बबलू पाटील यांच्यासह काही महिला व पुरुष त्वरित धावून आले. त्यांनी आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने त्यांनाही मारहाण करण्याचा प्रयत्न केला. अखेरीस परिसरातील नागरिकांनी एकत्र येऊन पीडित महिलेची सुटका केली आणि आरोपीस आटोक्यात आणले. घटनेनंतर महिलेच्या कुटुंबीयांना संपर्क साधण्यात आला. तिचे पती शाळेतून त्वरित घरी परतले व नातेवाईकांसह पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी पीडितेचा सविस्तर जबाब नोंदवून आरोपी रामभाऊ माधव पाटील याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप पसरला असून नागरिकांनी पोलिसांकडे आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पाचोरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीवर महिलेला मारहाण करून तिचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने केलेल्या कृतीबाबत संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.