मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अभ्युदय नगर, काळाचौकी येथील सार्वजनिक नवरात्र महोत्सव इ. क्र. १५ यावर्षीच्या सोहळ्याने ४७ वे वर्ष गाठले आहे. परंपरा, भक्तिभाव आणि सामाजिक एकात्मतेचा वारसा जपणारा हा उत्सव परिसरातील सर्वांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. देवीच्या आराधनेसोबतच विविध सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून भाविकांना भक्ती, आनंद आणि ऐक्याचा अनोखा अनुभव मिळणार आहे.
या महोत्सवाचे अध्यक्षपद अरुण वाघे भूषवत असून, सचिव म्हणून सचिन गुरव आणि खजिनदार म्हणून राहुल खामकर कार्यरत आहेत. कार्यकारिणीच्या पुढाकाराने व स्थानिकांच्या सक्रिय सहभागामुळे गेली चार दशके हा उत्सव यशस्वीरीत्या साजरा होत आहे. सर्वसमावेशकता, शिस्तबद्ध आयोजन आणि लोकसहभाग हीच या महोत्सवाची खरी ताकद असल्याचे आयोजकांनी सांगितले.
पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात आणि मंत्रोच्चारांच्या वातावरणात देवीची स्थापना करण्यात आली आहे. नवरात्रभर भजन, कीर्तन, गाणी, नृत्यस्पर्धा, सामाजिक प्रबोधनपर कार्यक्रम तसेच मुलांसाठी विशेष उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे हा उत्सव केवळ धार्मिकतेपुरता मर्यादित न राहता सांस्कृतिक आणि सामाजिकतेचाही दिमाखदार आविष्कार ठरत आहे.
काळाचौकीतील हा नवरात्र महोत्सव वर्षानुवर्षे भक्तांना एकत्र आणत आहे. ४७ वर्षांच्या प्रवासानंतरही त्याच उत्साहाने आणि श्रद्धेने हा सोहळा साजरा होत असल्याने परिसरात आनंदोत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे. देवीच्या चरणी अर्पण केलेला हा भक्तिभावाचा सोहळा श्रद्धा, परंपरा आणि सामुदायिक ऐक्याचा तेजस्वी दीप उजळवत आहे.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.