मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : “दात आणि दातामुळे खुलणारे स्मितहास्य हे सौंदर्य उजळवणारा सर्वांत महत्त्वाचा घटक आहे. मात्र बदललेली खाद्यसंस्कृती दातांच्या समस्यांना मोठ्या प्रमाणात जबाबदार आहे. जुन्या काळी आपण खात असलेल्या भाकरी किंवा अपॉलिश भात यांत भरपूर तंतू असायचे. आजच्या अन्नपदार्थांमध्ये मात्र रसायनांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पचनशक्ती कमी झाली आहे आणि पित्तवृद्धीमुळे दातांवर दुष्परिणाम होत आहेत. जुन्या काळातील दातांवरील म्हणी आजही खरी ठरतात. यावरून स्पष्ट होते की, अखेरीस दातापासून सुरू झालेला प्रवास दातावरच संपतो. त्यामुळे दातांची निगा राखणे अत्यावश्यक आहे,” असे प्रतिपादन दंतचिकित्सक डॉ. रिबेका दोडती यांनी केले.
निमित्त होते सेवा मंडळ एज्युकेशन सोसायटी संचालित श्रीमती मणिबेन एम. पी. शाह कला आणि वाणिज्य स्वायत्त महिला महाविद्यालय, मराठी विभाग आयोजित शारदोत्सव २०२५ (पाचवे वर्ष) अंतर्गत ‘नवदुर्गा : नवविचार व्याख्यानमाला’. सातव्या व्याख्यानात ‘दातापासून दाताकडे’ या विषयावर त्या बोलत होत्या.
डॉ. रिबेका दोडती या दंतचिकित्सक असून मराठीवरील विशेष प्रेमामुळे सध्या त्या सेंट जोसेफ महाविद्यालय, सत्पाळा, विरार येथे मराठी पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रश्मी शेटये-तुपे यांनी केले. प्रमुख व्याख्यात्यांचे स्वागत प्रा. किरण जाधव यांनी केले, तर आभार प्रदर्शन सामिया काझी हिने केले. प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. कार्यक्रम आभासी माध्यमातून यशस्वीपणे पार पडला. अशा प्रकारे शारदोत्सवाच्या सातव्या माळेत झालेले हे व्याख्यान विद्यार्थिनींसाठी आरोग्याबाबत सजगतेचा संदेश देणारे ठरले. स्मितहास्याचे खरे सौंदर्य दातांच्या आरोग्यात दडलेले आहे, याची जाणीव या प्रबोधनातून प्रत्येक सहभागींच्या मनात दृढ झाली.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.