पालघर (गुरुदत्त वाकदेकर) : “साहित्य समाजमनाचा आरसा आहे. विविध क्षेत्रांत कार्य करणाऱ्यांना लिहायला लावले तर समाजाला दिशा मिळेल, तसेच भावी पिढीला स्फूर्ती मिळेल,” असे विचार ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ महादेव गो. रानडे यांनी मांडले. ते सर्वद फाऊंडेशनचे प्रथम राज्यस्तरीय साहित्य संमेलन सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते.
साहित्य संमेलनाची सुरुवात थाटामाटात, ढोल-ताशांच्या गजरात आणि पुस्तकांच्या सजीव झेंड्यांनी सजलेल्या ग्रंथदिंडीने झाली. उद्घाटन सनदी अधिकारी हर्षवर्धन जाधव यांच्या हस्ते झाले. त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या वतीने मराठी भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी विविध योजना सुरू असल्याचे सांगत, “साहित्यिक व संस्था यांनी या योजनांचा लाभ घ्यावा आणि सर्वद फाऊंडेशनने नव्या पिढीतील साहित्यिक घडवावेत,” असे मत व्यक्त केले.
सुप्रसिद्ध साहित्यिक अशोक बागवे यांनी साहित्यिक गंमतीजमतींनी उपस्थितांना खळखळून हसवले. कवी सतिश सोळांकूरकर यांनी सादर केलेल्या “शाळेतल्या दिवसांचा पाऊस” या कवितेला श्रोत्यांकडून भरभरून दाद मिळाली. कवी अरुण म्हात्रे यांनी कवितेच्या स्फुरणामागील भावविश्वाचे सुंदर विवेचन केले.
प्रास्ताविकात सर्वद फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुचिता पाटील म्हणाल्या, “आज मोबाईलच्या आभासी दुनियेत माणूस प्रत्यक्ष संवाद विसरला आहे. हे साहित्य संमेलन म्हणजे संवादाची खरी भाषा पुन्हा समजून घेण्याचा प्रयत्न आहे.”
स्वागताध्यक्ष डॉ. किरण सावे यांनी मनाच्या आरोग्यावर साहित्य संमेलनाचे महत्त्व अधोरेखित करत “मनाची ‘सर्व्हिसिंग’ झाली तर आजार दूर राहतात आणि समृद्धी वाढते. हे संमेलन त्यासाठी उपयुक्त आहे,” असे सांगितले.
या वेळी डॉ. सुचिता पाटील यांच्या “झाले जलमय” या कथासंग्रहाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झाले. उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन सुहास राऊत यांनी केले.
दुपारच्या सत्रात रंगलेल्या कविसंमेलनाचे सूत्रसंचालन प्रा. विवेक कुडू, रुपाली राऊत आणि शीतल संखे यांनी केले. नंतर साहित्यिक डॉ. महेश अभ्यंकर, पत्रकार अशोक शिंदे, आणि सुशील शेजुळे यांच्या मुलाखतींनी रसिक मंत्रमुग्ध झाले. हा कार्यक्रम निमा लोखंडे आणि नेहा राऊत यांनी नेत्रदीपकरीत्या नेला.
सायंकाळच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने संमेलनाला बहार चढवली. अभिजीत राऊत यांच्या सूत्रसंचालनाखाली लावणी, मंगळागौर, तारपा आदी पारंपरिक नृत्यांच्या सादरीकरणाने रसिकांना कलाविश्वाचा मनसोक्त आनंद दिला.
या संमेलनातून साहित्य, संस्कृती आणि परंपरेचा अनोखा मेळ घडला असून, सर्वद फाऊंडेशनचे हे पहिले राज्यस्तरीय पाऊल साहित्यजगताला नव्या दिशेची नांदी ठरणार आहे.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.