शारदोत्सवातील नववे पुष्प : महिला सुरक्षेसाठी सायबर धडे

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : “डिजिटल युगात जग जवळ आले असले तरी महिलांसाठी ऑनलाईन सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर बनत चालला आहे. सायबर गुन्ह्यांमध्ये महिलांना लक्ष्य केल्या जाण्याच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. सोशल मीडियावर फोटो मॉर्फिंग, फसवणूक, ब्लॅकमेलिंग, खोट्या ओळखी तयार करणे आणि खाजगी माहिती लीक करणे यासारख्या गुन्ह्यांमुळे महिला मानसिक त्रासाला आणि सामाजिक अपमानाला सामोऱ्या जात आहेत. एआयचे विश्व जितकं संधी देते, तितकंच ते धोका ही निर्माण करू शकतं. महिलांनी आत्मविश्वासासह आणि जागरूकतेने डिजिटल जगाचा वापर केल्यासच खऱ्या अर्थाने सुरक्षितता साधता येईल,” असे मत इंटरपोल गुन्हे शाखा मुंबई येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक गौरी जगताप-पाटील यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधताना व्यक्त केले.

निमित्त होते सेवा मंडळ एज्युकेशन सोसायटी संचालित श्रीमती मणिबेन एम. पी. शाह कला आणि वाणिज्य स्वायत्त महिला महाविद्यालय, मराठी विभाग आयोजित शारदोत्सव २०२५ (वर्ष पाचवे) नवदुर्गा : नवविचार – बहुआयामी स्त्री या व्याख्यानमालेचे नववे पुष्प “महिला सुरक्षा आणि सायबर क्राईम” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन.

शारदोत्सव २०२५ या सलग नऊ दिवस चालणाऱ्या व्याख्यानमालेस महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अर्चना पत्की यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाची सुरुवात सहा. प्रा. माधवी पवार यांच्या लक्ष्मीस्तोत्राने झाली. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियांका पालशेतकर हिने केले तर आभार प्रदर्शन मराठी विभाग प्रमुख डॉ. रश्मी शेटये-तुपे यांनी केले.

सदर कार्यक्रमाला महाविद्यालयाचे माननीय प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here