निरोगी दीर्घायुष्यासाठी योग्य व्यायामाची गरज अधोरेखित – डॉ. रितेश चंदलवार

0

Loading

ऐनपूर : आजच्या गतिमान युगात ताणतणाव, असंतुलित आहार, कमी हालचाल आणि बदलती जीवनशैली यामुळे शरीरावर विविध आजारांचे सावट येत आहे. विशेषतः वृद्धावस्थेत शारीरिक तक्रारी वाढत जातात आणि त्यातून जीवनमानावर परिणाम होतो. या पार्श्वभूमीवर सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय, ऐनपूर येथे प्रधानमंत्री उच्चस्तर शिक्षण अभियान योजनेअंतर्गत आजीवन अध्ययन व विस्तार विभाग आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जेष्ठ नागरिकांसाठी “निरोगी दीर्घायुष्य व व्यायामाचे महत्त्व” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भागवत विश्वनाथ पाटील होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांनी सादर केले. कार्यशाळेचे उद्घाटन अधिसभा सदस्य प्रा. डॉ. पद्माकर पाटील यांच्या हस्ते लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर डी. के. महाजन (वाघोदा), टी. महाजन, टी. एल. पाटील (खिर्डी), प्रा. राकेश तळेले (धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर), यशवंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश पाटील, ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन श्रीराम नारायण पाटील, उपाध्यक्ष रामदास नारायण महाजन, जेष्ठ नागरिक दत्तात्रेय महाजन तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने उपस्थित होते. उद्घाटन प्रसंगी प्रा. डॉ. पी. डी. पाटील यांनी कार्यशाळेला शुभेच्छा देत जेष्ठ नागरिकांनी शारीरिक तंदुरुस्तीबरोबर मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे सांगितले. त्यांनी आयुष्याच्या उत्तरार्धात सतत सक्रिय राहणे, चालणे, योगासने, प्राणायाम आणि नियमित व्यायामाचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यशाळेत एकूण चार शैक्षणिक सत्रे घेण्यात आली. पहिल्या सत्रात निलेश पाटील यांनी “तरुण पिढी आणि जेष्ठ नागरिकांमधील सुसंवाद” या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर समज, आदर आणि प्रेम वाढविण्याच्या टिप्स दिल्या. जेष्ठ नागरिकांचे अनुभव तरुणांनी स्वीकारावेत आणि तरुणाईने वयोवृद्धांच्या सन्मानासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. दुसऱ्या सत्रात रावेर येथील निसर्गोपचार तज्ञ डॉ. रितेश चंदलवार यांनी सांधेदुखी, तणाव, चिंता, अनिद्रा यांसारख्या जेष्ठ नागरिकांमध्ये आढळणाऱ्या समस्यांवर विविध व्यायामांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून मार्गदर्शन केले. त्यांनी साध्या हालचाली, श्वसनाचे व्यायाम, तसेच घरच्या घरी करता येणारे सोपे उपाय समजावून सांगितले. डॉ. चंदलवार यांनी विशेषत: “व्यायाम केवळ आजार टाळण्यासाठी नव्हे, तर मानसिक ताजेपणा व दीर्घायुष्यासाठी अत्यावश्यक आहे” असे स्पष्ट केले. तिसऱ्या सत्रात जामनेर येथील अमरीश चौधरी यांनी जेष्ठ नागरिकांसाठी उपयुक्त अशा योगासनांचे प्रात्यक्षिक करून दाखविले. त्यांनी सहभागी जेष्ठ नागरिकांकडूनही प्रत्यक्षात योगासने करून घेतली. चौथ्या सत्रात रावेर येथील फिजिओथेरपिस्ट डॉ. पवन पाटील यांनी सोप्या हालचाली आणि घरच्या घरी करता येतील असे लहान व्यायाम शिकवले. खिर्डी येथील काही जेष्ठ नागरिकांनीही स्वयंप्रेरणेने मंचावर येऊन योगासने व प्राणायामाचे सादरीकरण केले. या सत्रानंतर भागवत पाटील, श्रीराम पाटील, जगन्नाथ पाटील, पी. टी. महाजन, गंभीर चौधरी, काशीनाथ पाटील, ज्ञानेश्वर पाटील यांनी आरोग्यविषयक प्रश्न विचारले. त्यावर सर्व तज्ञांनी सविस्तर आणि समजेल अशा भाषेत मार्गदर्शन केले. या कार्यशाळेच्या शेवटच्या सत्रात रामदास महाजन व पी. आर. चौधरी यांनी ही कार्यशाळा आपल्या जीवनात अमूल्य ठरेल, दैनंदिन जीवनात शिकलेले व्यायाम अंगीकारून आपले आरोग्य सुधारण्याचा संकल्प केला असे सांगितले. अध्यक्षीय भाषणात मा. भागवत विश्वनाथ पाटील यांनी “आज आपण शिकलो ते फक्त एका दिवसापुरते मर्यादित न ठेवता रोज सातत्याने व्यायाम करून निरोगी आणि आनंदी जीवन जगूया” असे आवाहन केले. या कार्यशाळेत एकूण १०५ जेष्ठ नागरिक सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. जयंत नेहेते व डॉ. डी. बी. पाटील यांनी केले, तर कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. डॉ. प्रविण महाजन होते. महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उत्साही सहकार्याने आणि प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला. या कार्यशाळेमुळे जेष्ठ नागरिकांना आरोग्याची नवी दृष्टी मिळाली. योग्य व्यायाम, शिस्तबद्ध दिनचर्या आणि सकारात्मक विचारसरणी यांमुळे दीर्घायुष्य प्राप्त होऊ शकते, असा संदेश या उपक्रमातून सर्वांना मिळाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here