भडगाव – शहरातील पाचोरा तालुका सह. शिक्षण संस्था संचलित नामांकित सौ. सुमनताई गिरिधर पाटील माध्य. विद्यालय, सौ. ज. ग. पूर्णपात्री कनिष्ठ महाविद्यालय, उच्च माध्यमिक व्यावसायिक अभ्यासक्रम तसेच जिजाऊ प्राथमिक विद्यालय या सर्व विभागांची संयुक्त पालक–शिक्षक सभा नुकतीच अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या सभेला मोठ्या संख्येने पालकांनी हजेरी लावून आपल्या मुलांच्या शैक्षणिक प्रगतीबद्दल माहिती घेतली व शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी रचनात्मक सूचना मांडल्या. या सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे मुख्याध्यापक व प्राचार्य अजयजी अहिरे उपस्थित होते. त्यांच्या सोबत व्यासपीठावर उपमुख्याध्यापक आर. बी. पाटील, पर्यवेक्षिका सी. व्ही. बिऱ्हाडे, पर्यवेक्षक एस. एस. महाजन, तसेच शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर डॉ. पल्लवी पाटील व डॉ. अतुल देशमुख सर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक पद्धतीने दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर उपस्थित पालकांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. सभेचे प्रास्ताविक मुख्याध्यापक अजयजी अहिरे यांनी सविस्तरपणे केले. त्यांनी शाळेच्या मागील शैक्षणिक वर्षातील विविध उपक्रम, विद्यार्थी विकासासाठी राबविलेल्या योजनांची माहिती पालकांसमोर ठेवली. संस्थेच्या शैक्षणिक प्रगतीबद्दल सविस्तर इतिवृत वाचन सभेचे सचिव प्रा. एल. के. वाणी यांनी सादर केले. गेल्या वर्षातील उल्लेखनीय यश, गुणवंत विद्यार्थ्यांची कामगिरी तसेच शाळेच्या सर्व विभागांनी घेतलेले उपक्रम यांचा आढावा घेताना पालकांनी समाधान व्यक्त केले. पर्यवेक्षिका छाया बिऱ्हाडे यांनी मागील वर्षातील शैक्षणिक कार्याचा सखोल आढावा सादर केला. विद्यार्थ्यांच्या ज्ञानवृद्धीसोबतच चारित्र्य विकासासाठी शाळेत घेतल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती त्यांनी दिली. तसेच येत्या वर्षात राबविण्यात येणाऱ्या विविध नवीन योजनांचा परिचयही त्यांनी करून दिला. उपमुख्याध्यापक आर. बी. पाटील यांनी शैक्षणिक दर्जा अधिक उंचावण्यासाठी पालकांचे सहकार्य आवश्यक असल्याचे सांगितले. सभेदरम्यान शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला. एन. एन. एम. एस. (National Means cum Merit Scholarship) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या तिलक जडे याचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. तसेच हुशु स्पर्धेत नाशिक विभागीय पातळीवर १९ वर्षे वयोगटात प्रथम क्रमांक मिळवून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी छत्रपती संभाजीनगर येथे पात्र ठरलेल्या प्रतिभावान विद्यार्थी प्रतिक दाभाडे याचाही विशेष सन्मान करण्यात आला. या गौरव समारंभामुळे सभेला एक वेगळेच औचित्य प्राप्त झाले. यावेळी प्रा. शरद महाजन, छाया बिऱ्हाडे, डॉ. पल्लवी पाटील व डॉ. अतुल देशमुख सर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शाळेत राबविल्या जाणाऱ्या शैक्षणिक आणि सहशालेय योजनांचा सविस्तर आढावा घेतला. त्यांनी १० वी आणि १२ वी च्या परीक्षांमध्ये शाळेचा नेहमीच उत्कृष्ट निकाल राहिल्याचा अभिमान व्यक्त केला. विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये मिळविलेल्या यशामुळे शाळेचे नाव सतत उज्ज्वल होत असल्याचे त्यांनी सांगितले. पालक–शिक्षक संघाची नव्याने निवडणूकही यावेळी पार पडली. त्यामध्ये अध्यक्षपदी मुख्याध्यापक अजयजी अहिरे, उपाध्यक्षपदी डॉ. पल्लवी निकम, सचिवपदी प्रा. एल. के. वाणी, सहसचिवपदी गजानन सोनजे यांची निवड करण्यात आली. शासनाच्या धोरणांनुसार इतर सदस्यांची निवड देखील करण्यात आली. या संघटनेच्या माध्यमातून शाळा आणि पालक यांच्यातील संवाद अधिक प्रभावी होऊन विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी नवे उपक्रम राबविता येतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. सभेच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे विशेष प्रयत्न लाभले. कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन प्रा. शरद डी. पाटील यांनी केले, तर उपमुख्याध्यापक आर. बी. पाटील यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली. ही पालक–शिक्षक सभा फक्त माहिती देवाणघेवाण करण्यापुरती मर्यादित न राहता शाळा व पालक यांच्यातील सशक्त नातेसंबंध अधिक दृढ करणारी ठरली. पालकांनी शाळेच्या प्रशासनाची पारदर्शकता, विद्यार्थ्यांच्या गुणात्मक प्रगतीबद्दल व्यक्त केलेले समाधान आणि शाळेने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उचललेली पावले यामुळे संपूर्ण परिसरात या संस्थेच्या कार्याचे पुन्हा एकदा कौतुक झाले. अशा प्रकारे, सौ. सुमनताई गिरिधर पाटील विद्यालय समूहाने पालक–शिक्षक सहकार्याचा नवा आदर्श निर्माण केला आहे.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.