पाचोरा ( समाधान गुरुजी ) आश्विन महिन्यातील पौर्णिमा हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाची मानली जाते. आश्विन शुक्ल पौर्णिमेला येणारी कोजागरी पौर्णिमा ही या वर्षी सोमवार, दिनांक ६ ऑक्टोबर २०२५ रोजी आहे. या रात्री लक्ष्मी आणि इंद्र यांची विशेष पूजा केली जाते. कोजागरी या शब्दाचा अर्थच ‘जागरण करणारा’ असा आहे. या दिवशी लक्ष्मी माता पृथ्वीवर भ्रमण करते आणि जे भक्त जागरण करून मंत्रोच्चार, भजन-कीर्तन व पूजापाठ करतात, त्यांच्यावर ती प्रसन्न होते. श्रद्धाळूंनी या दिवशी रात्री जागरण करून सुख, समृद्धी, आरोग्य व ऐश्वर्य यासाठी प्रार्थना करावी, अशी धार्मिक परंपरा आहे. या शुभ पौर्णिमेला घराघरांत लक्ष्मी व इंद्र पूजन केले जाते. पूजा संपल्यानंतर फुलांची अर्पण (पुष्पांजली) केली जाते. नैवेद्य म्हणून नारळाचे पाणी, पोहे, आटवलेले दूध इत्यादी पदार्थ अर्पण करण्याची प्रथा आहे. त्यानंतर संपूर्ण कुटुंबीय आणि उपस्थित भाविक यांनी प्रसाद ग्रहण करावा. पौर्णिमेच्या या पवित्र रात्री घरात किंवा मंदिरात जागरण केले जाते. भजन, कीर्तन, मंत्रोच्चार, श्लोक पठण यामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय होते. असे मानले जाते की लक्ष्मी माता या रात्री जागरण करणाऱ्या भक्तांच्या घरी येते आणि त्यांना आयुष्यभर सुख-समृद्धीचे आशीर्वाद देते. धार्मिक शास्त्रानुसार कोजागरी पौर्णिमा ही केवळ लक्ष्मीपूजेसाठीच नव्हे तर कृषिप्रधान समाजात नवे धान्य वापरण्याच्या प्रारंभासाठीही महत्त्वाची आहे. या दिवसापासून नवान्न प्राशन सुरू करण्याची परंपरा आहे. शेतकऱ्यांनी नुकत्याच कापणी केलेल्या ताज्या तांदुळाचा किंवा धान्याचा याच दिवशी प्रथम सेवन करावे, असे धर्मशास्त्र सांगते. याला आग्रयण असेही म्हटले जाते. याच दिवसापासून कार्तिक महिन्यातील पवित्र स्नानाची सुरुवात करणे शुभ मानले जाते. यंदा नवान्न पौर्णिमा मंगळवार, दिनांक ७ ऑक्टोबर २०२५ रोजी साजरी केली जाईल. या दिवशी संध्याकाळी कुटुंबातील ज्येष्ठ अपत्याचे ओवाळन करण्याची प्रथा आहे. पारंपरिक पद्धतीनुसार आई-वडील किंवा घरातील मोठी मंडळी ज्येष्ठ मुलाला दीपप्रज्वलन करून ओवाळतात आणि त्याच्या मंगलमय जीवनासाठी आशीर्वाद देतात. हे सर्व विधी पंचांगानुसार ठरवलेल्या मुहूर्तातच करावेत, असा शास्त्रार्थ सांगितला जातो. धार्मिक आख्यायिकेनुसार कोजागरी पौर्णिमेच्या रात्रीं लक्ष्मी माता आकाशातून पृथ्वीवर भ्रमण करते. जी घरे स्वच्छ, सजवलेली असतात, जिथे भक्त जागरण करून भजन-कीर्तनात रमलेले असतात, मंत्रोच्चार व पूजापाठ करतात, त्या घरात लक्ष्मी माता प्रसन्न होऊन स्थायिक होते, अशी श्रद्धा आहे. म्हणूनच या दिवशी बहुतेक ठिकाणी संपूर्ण रात्रभर भक्तिभावाने जागरण केले जाते. काही ठिकाणी विशेष कीर्तन, जागरण सोहळे, सामूहिक भजने आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांचेही आयोजन केले जाते. याशिवाय आश्र्विन पौर्णिमेला पती-पत्नींनी एकत्र पूजन करून एकमेकांच्या उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि समृद्धीची प्रार्थना करणे शुभ मानले जाते. या दिवशी केलेला पूजाविधी घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो आणि येणाऱ्या काळातील आर्थिक व कौटुंबिक प्रगतीसाठी मंगलसूचक ठरतो, अशी भावना भक्तांमध्ये आहे. धर्मशास्त्रानुसार पंचांगात दिलेल्या तारखा व मुहूर्तांचा आदर करूनच कोजागरी पौर्णिमा, नवान्न प्राशन व ज्येष्ठ अपत्याचे ओवाळन करावे. ६ ऑक्टोबरला कोजागरी पौर्णिमा आणि ७ ऑक्टोबरला नवान्न प्राशन तसेच ज्येष्ठ अपत्य ओवाळण्याचा सोहळा पार पाडल्यास कुटुंबाला सुख, समृद्धी, आरोग्य आणि समाधान प्राप्त होते, असा पारंपरिक विश्वास आहे. संदर्भ : पंचांग व धार्मिक परंपरा – श्री गजानन गुरु गोविंदराव कुलकर्णी शब्दांकन – समाधान गुरुजी जारगाव ता. पाचोरा जि.जळगाव
Mo.- 9822588170
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.