भुसावळ – मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील विभागीय रेल्वे व्यवस्थापक पुनीत अग्रवाल यांनी मंगळवार, दि. ८ ऑक्टोबर २०२५ रोजी भुसावळ–धुळे रेल्वेमार्गाचे विंडो ट्रेलिंगद्वारे सखोल निरीक्षण केले. या दौऱ्याचा उद्देश रेल्वे पायाभूत सुविधांची योग्य देखभाल, प्रवासी सेवांची गुणवत्ता वाढविणे आणि प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सोयीसुविधांमध्ये अधिक सुधारणा घडवून आणणे हा होता. निरीक्षणादरम्यान धुळे, चाळीसगाव, कजगाव, पाचोरा आणि जळगाव या महत्त्वाच्या स्थानकांची सखोल तपासणी करण्यात आली. विभागीय व्यवस्थापकांसोबत विविध विभागांचे वरिष्ठ शाखाधिकारी, अभियंते तसेच पर्यवेक्षक उपस्थित होते. अग्रवाल यांनी रेल्वे ट्रॅकची स्थिती, सिग्नल व दूरसंचार (S&T) प्रणालीतील सुधारणांची गरज, स्थानक परिसराची स्वच्छता, प्रवाशांना उपलब्ध करून दिलेल्या मूलभूत सुविधा, बुकिंग कार्यालयांची स्थिती, सुरक्षा उपाययोजना, लहान पूल व लेव्हल क्रॉसिंगची तपासणी अशा विविध मुद्द्यांवर विशेष लक्ष केंद्रित केले. प्रवाशांचा अनुभव अधिक चांगला करण्यासाठी आवश्यक असलेल्या दुरुस्त्या व सुधारणा वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. विशेषत: चाळीसगाव व पाचोरा स्थानके सध्या अमृत भारत स्टेशन योजना अंतर्गत आधुनिकीकरणाच्या टप्प्यात आहेत. या दोन्ही स्थानकांवर सुरू असलेल्या पायाभूत सुविधा उभारणीच्या कामांचा श्री. अग्रवाल यांनी प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला. प्रवाशांना आधुनिक, स्वच्छ आणि सुरक्षित सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने या प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच, स्थानक परिसरातील स्वच्छता मोहिमा, प्रवासी निवाऱ्यांची सोय, स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, गाड्यांच्या वेळापत्रकानुसार होणारी घोषणा व्यवस्था, तसेच दिव्यांग प्रवाशांसाठी उपलब्ध असलेल्या सुलभ सुविधा यांचीही तपासणी करण्यात आली. यावेळी प्रवासी तक्रारी व सूचना यावरही चर्चा होऊन आवश्यक ती पावले उचलण्याचा निर्णय घेण्यात आला. निरीक्षणादरम्यान विविध विभागांद्वारे चालू असलेल्या कामांचे सविस्तर सादरीकरण करण्यात आले. विभागीय व्यवस्थापकांनी संबंधित अधिकाऱ्यांना पायाभूत सुविधा आणि प्रवासी सेवांच्या उन्नतीसाठी ठोस पावले उचलण्याचे आदेश दिले. स्थानकांवरील चालू प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी गती वाढविण्यावर भर देण्यात आला. या पाहणी दौऱ्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेत आणि सोयीसुविधांमध्ये मोठी सुधारणा अपेक्षित आहे. भुसावळ विभाग सतत आधुनिकीकरण व सेवेत सुधारणा करण्याच्या दिशेने कार्यरत असून, या तपासणीनंतर संबंधित कामांना वेग मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.