पाचोरा – एखाद्या मुलाने आपल्या परिश्रम, कष्ट आणि गुणवत्तेच्या जोरावर जेव्हा पुरस्कार प्राप्त केला जातो, तेव्हा त्या क्षणी त्याच्या पालकांच्या चेहऱ्यावर उमटणारा अभिमान आणि समाधान अवर्णनीय असतो. पण जेव्हा तोच मुलगा काळाच्या ओघात शिक्षण, कौशल्य आणि जिद्दीच्या जोरावर गुणवंत किर्तीवंत बनतो आणि त्याच व्यासपीठावर उभा राहून स्वतःच्या हाताने इतरांना बक्षीस देतो, तेव्हा त्या क्षणी पालकांच्या आनंदाला पारावर नसतो.
समाज म्हटला की त्यामध्ये राजकारण, मतभेद आणि एकमेकांचे पाय ओढण्याची प्रवृत्ती सहज दिसते. अनेकदा एखाद्याने समाजाच्या हितासाठी चांगला उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केला, तरी त्याच्या यशात अडथळे निर्माण करण्यासाठी काहीजण षडयंत्र रचतात. परंतु या नकारात्मक प्रवृत्तीच्या पार्श्वभूमीवर पाचोर्याचा सोनार समाज हा सकारात्मकता, एकता आणि प्रगतीचे उदाहरण ठरला आहे. सोनार समाजाने अनेक वर्षांपासून सातत्याने शिक्षण, संस्कार ,व्यवसाय प्रगती आणि सामाजिक प्रबोधन यासाठी जे उपक्रम राबवले आहेत, ते खरोखरच कौतुकास्पद आहेत. व्यक्तिगत स्वार्थ बाजूला ठेवून समाजहिताला प्राधान्य देणाऱ्या या समाजाच्या कार्याला त्रिवार अभिवादन करावे लागेल. या सोनार समाजाने दाखवून दिले आहे की एकता आणि सद्भावनेच्या बळावर कोणताही समाज आत्मविकास आणि प्रगतीचा दीपस्तंभ बनू शकतो. पाचोर्यातील सोनार समाजाने नुकताच अशाच एका अभिमानास्पद क्षणाचा साक्षीदार होऊन समाजाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवण्याजोगा सोहळा साजरा केला. सोनार समाजतर्फे आयोजित “गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा” या कार्यक्रमात समाजातील दोन तेजस्वी तरुण — इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड, मुंबई येथे असिस्टंट मॅनेजर म्हणून कार्यरत असलेले सौरभ मनीष बाविस्कर आणि ‘कौन बनेगा करोडपती’ या लोकप्रिय दूरचित्रवाणी कार्यक्रमातून देशभरात ओळख निर्माण करणारे साकेत नंदकुमार सोनार — हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विशेष म्हणजे हे दोघेही काही वर्षांपूर्वी या समाजाच्या व्यासपीठावर विद्यार्थी म्हणून उभे राहून पुरस्कार घेत होते, आणि आज त्याच मंचावर उभे राहून त्यांनी पुढच्या पिढीला गौरवाने सन्मानित केले. हा प्रवास म्हणजेच — “बक्षीस घेणाऱ्यापासून बक्षीस देणाऱ्यापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास” — या विचाराचा जिवंत पुरावा ठरला. तलाठी कॉलनी, पाचोरा येथील रहिवासी सौरभ मनीष बाविस्कर हा बालपणापासूनच कुशाग्र बुद्धीचा, शिस्तप्रिय आणि अभ्यासू विद्यार्थी होता. शिक्षणाविषयी प्रखर ओढ आणि आत्मविश्वासाच्या बळावर त्याने दहावी आणि बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले. पुढे पुण्यातील नामांकित एमआयटी कॉलेजमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी संपादन करताना त्याने तांत्रिक स्पर्धा, प्रकल्प आणि कार्यशाळांमध्ये सहभाग घेत आपले व्यक्तिमत्व सर्वांगीण विकसित केले. देशातील सर्वाधिक कठीण मानली जाणारी GATE परीक्षा उत्तीर्ण होऊन देशभरात 471वा क्रमांक मिळवत त्याने आपली गुणवत्ता सिद्ध केली. या गुणवत्तेच्या बळावर त्याला IIT दिल्लीमध्ये M.Tech साठी प्रवेश मिळाला आणि तिथून शिक्षण पूर्ण केल्यानंतर ONGC, IOCL, SAIL, BHEL अशा प्रतिष्ठित संस्थांच्या मुलाखती यशस्वीरीत्या उत्तीर्ण करून अखेर त्याची निवड Indian Oil Corporation Limited (IOCL) मध्ये बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून झाली. सुरत येथून कारकीर्द सुरू करत केवळ तीन वर्षांतच त्याने असिस्टंट मॅनेजर पदावर बढती मिळवली आणि आज तो मुंबई मुख्यालयात कार्यरत आहे. सौरभ म्हणतो, “समाजाने वेळोवेळी दिलेले प्रोत्साहन, कौतुकाची थाप आणि आत्मीय पाठबळ यामुळेच मी आज या स्थानी पोहोचलो.” त्याची ही नम्रता आणि कृतज्ञता समाजातील प्रत्येक तरुणासाठी प्रेरणादायी ठरते. याच मंचावर सौरभसोबत उपस्थित होते साकेत नंदकुमार सोनार — पाचोर्याचा आणखी एक तेजस्वी तारा. नवोदय विद्यालयातून शिक्षण घेताना साकेतने नेहमीच शैक्षणिक क्षेत्रात आघाडी राखली. पुढे त्याने देशातील प्रतिष्ठित जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU), दिल्ली येथे प्रवेश मिळवून जर्मन भाषेत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. भाषाशिक्षणावरील आवड आणि परिश्रमामुळे त्याने स्पेनमध्ये जाऊन तेथील विद्यार्थ्यांना जर्मन भाषा शिकवली, अशा प्रकारे जागतिक पातळीवर भारताचा शैक्षणिक झेंडा फडकवला. त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा टप्पा म्हणजे देशातील लोकप्रिय ज्ञानस्पर्धात्मक कार्यक्रम “कौन बनेगा करोडपती” मध्ये सहभाग. महानायक अमिताभ बच्चन यांच्या समोर शांत आत्मविश्वासाने प्रश्नांची उत्तरे देत त्याने देशभरातील प्रेक्षकांची मने जिंकली. आपल्या ज्ञान आणि संयमाच्या बळावर त्याने तब्बल ₹12.5 लाख रुपयांची रक्कम जिंकली. साकेत म्हणतो, “माझ्या प्रवासात माझ्या पालकांचा पाठिंबा, घरातील शैक्षणिक वातावरण आणि समाजाने दिलेला आत्मविश्वास हेच माझ्या यशामागील खरे कारण आहे.” या दोन्ही तरुणांचा प्रवास म्हणजे यश, जिद्द, संयम आणि संस्कार यांचा सुंदर संगम आहे. त्यांनी सिद्ध केले की परिस्थिती कोणतीही असो, प्रयत्नांची पराकाष्ठा आणि शिस्तबद्धता यामुळेच आयुष्य उजळते. सोनार समाजाने त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून सन्मानित करून समाजातील इतर विद्यार्थ्यांना नव्या उर्जेची प्रेरणा दिली आहे. या कार्यक्रमात समाजाने आणखी एक अभिमानास्पद निर्णय घेतला — आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च समाज उचलणार असल्याची घोषणा करण्यात आली. या निर्णयाने अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणाचे नवे दार उघडले आहे. सौरभ बाविस्कर आणि साकेत सोनार यांचा प्रवास केवळ व्यक्तिगत यशकथा नाही, तर समाजासाठी दीपस्तंभ आहे. त्यांच्या हातून जेव्हा नवीन विद्यार्थ्यांना बक्षीस मिळाले, तेव्हा तो क्षण प्रत्येक पालकाच्या डोळ्यात अभिमानाचे अश्रू घेऊन आला. त्यांनी दाखवून दिले — “जेव्हा बक्षीस घेणारे हात बक्षीस देणारे हात बनतात, तेव्हा तीच समाजाच्या व कुटूंबाची प्रगतीची खरी निशाणी ठरते.” हा प्रवास यशाचा आहे, पण त्याहून महत्त्वाचा म्हणजे तो प्रेरणेचा प्रवास आहे — जो उद्याच्या पिढीला दिशा, धैर्य आणि ध्येय देणारा ठरणार आहे.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.