शेतकऱ्यांची दिवाळी गोड करा — पाचोर्यात महाविकास आघाडीचे जारगाव चौफुलीवर जोरदार रस्ता रोको आंदोलन, सरकार विरोधात घोषणांनी परिसर दणाणला

0

Loading

पाचोरा – तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे झालेले मोठ्या प्रमाणावर नुकसान, त्यावर शासनाकडून झालेली केवळ घोषणांची पोकळ मालिका आणि शेतकरी अनुदान वितरणातील घोटाळ्यांमुळे प्रचंड नाराज झालेले शेतकरी आता रस्त्यावर उतरले आहेत. दिवाळीच्या उंबरठ्यावरही शासनाकडून अनुदानाचे पैसे न मिळाल्याने शेतकरी असंतोषाने पेटले आहेत. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (उबाठा) घटक पक्षांनी जारगाव चौफुली येथे भव्य रस्ता रोको आंदोलन करून शासनाविरोधात घोषणाबाजी केली. “शेतकऱ्यांचा विश्वासघात बंद करा”, “अनुदान घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा”, “शेतकऱ्यांचा हक्क परत द्या”, “सरकार जागे व्हा” अशा गर्जनांनी परिसर दणाणून गेला. या आंदोलनाचे नेतृत्व काँग्रेस तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी केले. त्यांच्या सोबत काँग्रेसचे माजी सभापती शेख इस्माईल शेख फकीरा, अॅड. अविनाश भालेराव, शिवसेना (उबाठा) चे उपनेते गुलाबराव वाघ, माजी सभापती उद्धव मराठे, ज्येष्ठ शिवसैनिक रमेश बाफना, राष्ट्रवादी काँग्रेसचे नितीन तावडे, शहराध्यक्ष अजहर खान तसेच विविध संघटनांचे नेते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी आंदोलनकर्त्यांनी शासनाकडे केलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये — शेतकरी अनुदान घोटाळ्याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच ज्यांच्या नावावरून अनुदान काढले गेले त्यांना लगेच अनुदान जमा करण्यात यावे, शासनाने अनुदान देताना पारदर्शकतेचा अभाव ठेवला असल्याने अनेक खरी पात्र शेतकरी वंचित राहिले आहेत, त्यामुळे ग्रामसेवक, कृषी सहाय्यक आणि पंचायत समिती पातळीवरील अनियमितता उघडकीस आणून जबाबदार अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात आली. काँग्रेस तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी सांगितले की, “शासनाने दिवसभर टीव्हीवर जाहीर केले की शेतकऱ्यांना मदत देत आहोत, पण वस्तुस्थिती अशी आहे की अनेक शेतकऱ्यांचे नाव यादीतून गायब आहे. काहींच्या खात्यात शून्य रुपये आलेत. अनुदानाचे पैसे कोणाच्या खिशात गेले, हे शासनाने उघड करावे. हाच या आंदोलनाचा मुख्य उद्देश आहे.” शिवसेनेचे उपनेते गुलाबराव वाघ यांनी संताप व्यक्त करताना सांगितले, “शासनाकडे तक्रारींचा ढीग लागलेला आहे. पण प्रशासनाने केवळ दाखवाचाच पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देणे टाळले आहे. हा शेतकऱ्यांवर अन्याय असून आम्ही यापुढे अशा भ्रष्टाचाराला झुकू देणार नाही. शासनाने तातडीने ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा यापुढे संपूर्ण जिल्ह्यात चक्काजाम आंदोलन करण्यात येईल.” आंदोलनस्थळी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी नितीन तावडे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, “शासनाकडून जाहीर झालेले एक लाख रुपयांचे साहाय्य हे आजही फक्त कागदावर आहे. अनेक शेतकऱ्यांनी नावे असतानाही पैसे मिळाले नाहीत. काही प्रकरणांमध्ये तथाकथित दलालांनी ऑनलाइन अर्ज करून खोटी माहिती देत अनुदान उचलले आहे. हे अत्यंत गंभीर असून याची सखोल चौकशी झालीच पाहिजे.” आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी एकमुखाने ठरवले की, पाचोरा तालुक्यातील प्रत्येक गावातील शेतकरी आता आपल्या अधिकारासाठी उभा राहील. गावागावात जनजागृती मोहीम राबवून या घोटाळ्याचे पुरावे गोळा केले जातील आणि प्रशासनाला सादर केले जातील. त्याचप्रमाणे ज्यांच्या शेतजमिनी खरडून गेल्या आहेत त्यांना हेक्टरी पाच लाख रुपये रोख स्वरूपात मिळेपर्यंत आंदोलन सुरू राहील. निवेदन देताना आंदोलनकर्त्यांनी मागणी केली की, शासनाने सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे पुन्हा करून यादी दुरुस्त करावी. खोटी नावे टाकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत. सोबतच कपाशी, सोयाबीन आणि ज्वारीसाठी तातडीने सीसीआय व शासकीय खरेदी केंद्रे सुरू करावीत, विहिरीत गाळ काढण्यासाठी दोन लाख रुपये सहाय्य द्यावे, तसेच दुधाळ जनावरांच्या नुकसानीसाठी प्रत्येकी एक लाख रुपयांचे अनुदान द्यावे. या सर्व मागण्या घेऊन अखेरीस महाविकास आघाडीच्या प्रतिनिधींनी नायब तहसीलदार कुमावत यांना निवेदन सादर केले. निवेदन स्वीकृतीनंतर कार्यकर्त्यांनी “शेतकऱ्यांचा जयघोष” करत आंदोलनाची सांगता केली. तथापि, आंदोलनकर्त्यांनी चेतावणी दिली की, शासनाने या मागण्यांवर लवकर निर्णय घेतला नाही, तर यापुढे जिल्हाभर तीव्र आंदोलन उभे केले जाईल आणि शेतकऱ्यांचा न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील. आंदोलनात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी, शेख इस्माईल शेख फकीरा, अॅड. अविनाश भालेराव, शिवसेना उपनेते गुलाबराव वाघ, उद्धव मराठे, रमेश बाफना, नितीन तावडे, अजहर खान, शशिकांत पाटील, अनिल सावंत, विनोद बाविस्कर, राजेंद्र पाटील, रवींद्र पाटील, अरुण तांबे, ज्ञानेश्वर भाऊ, प्रेमचंद पाटील, प्रशांत पाटील, निखिल भुसारे, मनोज चौधरी, हरीश देवरे, खंडू सोनवणे, पप्पू जाधव, भारत पाटील, सर्जेराव पाटील, रतन परदेशी, आनंदा पाटील, पितांबर मिस्त्री, गोकुळसिंग गांगुर्डे, सांडू तडवी, अमोल महाजन, चंद्रकांत पाटील, गजू पाटील, भिकन तडवी, गुलाब पाटील, दिनकर गीते आणि असंख्य कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी महाविकास आघाडीचे हे आंदोलन तालुक्यात चर्चेचा विषय ठरले असून शासनावर दबाव वाढला आहे. दिवाळीच्या पूर्वसंध्येला शेतकऱ्यांचा हक्काचा आवाज बुलंद करणारे हे आंदोलन, प्रशासनाला जाग आणणारा ठरल्याचे स्थानिक नागरिकांनी मत व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here