पाचोऱ्यात आशीर्वाद ड्रीम सिटीतील वाघांचे शुभेच्छा बॅनर फाडल्याची खळबळ –

0

Loading

पाचोरा – शहरातील आशीर्वाद ड्रीम सिटी परिसरात दिनांक १७ ऑक्टोबर २०२५ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास एक अनपेक्षित आणि खळबळजनक घटना घडली. माजी आमदार दिलीप भाऊ वाघ यांच्या पत्नी व माजी नगरसेविका सौ. सुचिताताई दिलीप भाऊ वाघ यांच्या वतीने दिवाळीनिमित्त शुभेच्छांचा एक आकर्षक बॅनर या ठिकाणी लावण्यात आला होता. परंतु, हा शुभेच्छा बॅनर कोणीतरी अज्ञात व्यक्तीने मुद्दाम फाडल्याचे सकाळी स्थानिक नागरिकांच्या लक्षात आले. घटनेची माहिती मिळताच

परिसरात काही काळ चर्चांचा भडिमार सुरू झाला. नागरिकांमध्ये याबाबत संताप व्यक्त करण्यात आला पाचोरा शहरात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वातावरण तापलेले असल्याने अशा घटनांकडे नागरिकांनी गंभीरतेने पाहिले आहे. सदर घटनेनंतर माजी नगरसेवक भूषण उर्फ सनी दिलीप वाघ यांनी माध्यमांशी संवाद साधत या प्रकरणावर आपली संतुलित आणि संयमी भूमिका मांडली. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “शहरात येणाऱ्या नगरपालिका निवडणुका असोत, जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीच्या निवडणुका असोत — प्रत्येक निवडणूक ही लोकशाहीच्या परिपक्वतेची कसोटी असते. या निवडणुकांमध्ये प्रशासनाची जबाबदारी जशी निर्विघ्न व शांततेत मतदान पार पाडण्याची आहे, तशीच जबाबदारी आपली – म्हणजे जनतेची, कार्यकर्त्यांची आणि स्थानिक नेतृत्वाचीही आहे. बॅनर फाडून कुणी निवडून येत नसतं किंवा कुणाचा पराभव होत नाही. अशा कृतींनी केवळ शहरातील वातावरण दूषित होतं, एवढंच नव्हे तर कायदा व सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होऊ शकतो.” भूषण (सनी) वाघ यांनी पुढे सांगितले की, “अशा प्रकारच्या घटना शहरातील सौंदर्य बिघडवतात आणि सामान्य नागरिकांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण करतात. आपण सर्वजण पाचोरा शहराचे रहिवासी आहोत. आपली राजकीय भूमिका काहीही असो, पण शहरातील शांतता आणि परस्पर आदर टिकवणे ही आपली प्राथमिक जबाबदारी आहे. दिवाळीचा सण हा आनंद, ऐक्य आणि शुभेच्छांचा आहे. अशा वेळी अशा निंदनीय घटनांनी समाजात कटुता निर्माण होऊ नये. म्हणूनच मी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना आणि नागरिकांना आवाहन करतो की, कोणत्याही पक्षाचा किंवा नेत्याचा बॅनर असो, तो तोडणे किंवा फाडणे ही संस्कृतीविरोधी कृती आहे. आपण अशा गोष्टींपासून दूर राहावे आणि इतरांनाही दूर ठेवावे.” त्यांनी पोलीस प्रशासनालाही काही महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. वाघ यांनी सांगितले की, “सध्याच्या राजकीय वातावरणात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती कायम ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाने अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे. विशेषतः निवडणूक काळ संपेपर्यंत शहरात आणि ग्रामीण भागात गोपनिय विभाग व डी.बी. शाखेतील पोलिसांची संख्या वाढविणे आवश्यक आहे. खबऱ्यांच्या माध्यमातून प्रत्येक प्रभागात वस्तीतील हालचालींवर लक्ष ठेवून, एखादा अनुचित प्रकार घडण्याची शक्यता दिसताच तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती द्यावी. यामुळे शहरात कुठलाही गोंधळ किंवा तणाव निर्माण होणार नाही.” वाघ यांनी असेही स्पष्ट केले की, “आपण सर्वजण लोकशाही प्रक्रियेवर विश्वास ठेवणारे आहोत. निवडणुका या एकमेकांवरील कटुतेने नव्हे, तर विकासाच्या दृष्टीने पार पडल्या पाहिजेत. एखाद्याचा बॅनर फाडल्याने जनतेचा विश्वास जिंकता येत नाही. उलट अशा कृतींमुळे समाजात

अस्वस्थता निर्माण होते आणि संबंधित पक्षाची प्रतिमा अधिकच मलिन होते.” घटनेनंतर नागरिकांकडूनही मिश्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या. काही नागरिकांनी म्हटले की, “शहरात निवडणूक वातावरण गरम आहे. पण अशा घटनेने मतदारांवर चुकीचा परिणाम होऊ शकतो. सर्वांनी संयम ठेवून निवडणूक पारदर्शक पद्धतीने पार पाडावी.” स्थानिक पोलिसांनीही या घटनेची नोंद घेतली असून, बॅनर फाडण्यामागील व्यक्ती किंवा गट शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे.तसेच बॅनर लावणे संदर्भात नगरपालिका महसूल व पोलीस प्रशासनाने सक्त नियम अटी तयार करणे व त्याचे सक्तीने कसे पालन केले जाईल याची आता गरज निर्माण झाली आहे तर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करून दोषींचा शोध घेतला जात आहे. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीनुसार ही घटना मध्यरात्री १२ ते १ या वेळेत घडली असावी, असे संकेत मिळाले आहेत. शहरातील ज्येष्ठ नागरिक, सामाजिक संघटना आणि व्यापारी मंडळांनी प्रशासनालाही आवाहन केले की, निवडणूक काळात सर्वत्र सुरक्षा वाढवावी आणि अशा घटनांना आळा घालावा. दिवाळीचा पवित्र सण शुभेच्छा, ऐक्य आणि आनंदाचा प्रतीक आहे. त्यामुळे या प्रसंगी कोणत्याही प्रकारचा वाद किंवा गोंधळ शहराच्या प्रतिमेला बाधक ठरतो. अशा परिस्थितीत माजी नगरसेवक भूषण (सनी) वाघ यांनी दिलेला संदेश — “बॅनर फाडून कुणी जिंकत नाही, शहरात शांतता राखा” — हा प्रत्येक नागरिकासाठी मार्गदर्शक आणि अनुकरणीय ठरत आहे. पाचोरा शहरातील नागरिक आता या घटनेमुळे सावध झाले असून, पोलिस प्रशासनाने दोषी व्यक्तीचा शोध घेऊन योग्य ती कारवाई करावी, अशी एकमुखी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here