![]()
पाचोरा – मुंबई, पुणे, भडगाव यांसारख्या विकसित शहरांच्या धर्तीवर आता पाचोरा शहरही झगमगणार आहे. शहराच्या सौंदर्यवर्धनासाठी व नागरिकांना आधुनिक सुविधा देण्यासाठी कार्यसम्राट हॅट्रिक आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या निधीतून भडगाव शहरानंतर पाचोरा शहरात वैशिष्ट्यपूर्ण सेल्फी पॉईंट, सुशोभिकरण आणि प्रेरणादायी स्थळांची भव्य योजना सुरू झाली आहे. विशेष म्हणजे या सर्व ठिकाणांचे काम केवळ पंधरा दिवसांच्या आत पूर्ण करून आप्पांच्या वाढदिवशी काही प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत शहरातील एकूण आठ महत्त्वाच्या ठिकाणी आकर्षक सेल्फी पॉईंट, प्रेरणादायी भित्तिचित्रे, ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांचे स्मरण करून देणारी शिल्पसजावट आणि आधुनिक प्रकाशयोजना करण्यात येणार आहे. या
योजनेमुळे पाचोरा शहराचा चेहरामोहरा बदलणार असून, शहराचे नाव खान्देशभरात झळकणार आहे. योजनेअंतर्गत जी आठ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत त्यात निलम हॉटेल समोरचा परिसर, भडगाव रोडवरील पेट्रोल पंपाजवळ शासकीय विश्रामगृह लगतचा रस्ता, छत्रपती संभाजी राजे भुयारी मार्ग गिरड रस्ता लगत, छत्रपती शिवाजी महाराज चौक, कार्यसम्राट आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या कार्यालयालगतचा भाग, महाराणा प्रताप चौक भडगाव रोड लगत, बाहेरपुरा पंचमुखी हनुमान चौक परिसर तसेच वृंदावन कॉलनी पंपिंग रोड परिसर अशी आठ ठिकाणे समाविष्ट आहेत. या ठिकाणी रंगीबेरंगी लाईट्स, आकर्षक सेल्फी पॉईंट, ऐतिहासिक व प्रेरणादायी विचारांची भिंतीवरील सजावट, तसेच नागरिकांना थांबून विश्रांती घेता येईल अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा शुभारंभ छत्रपती संभाजी महाराज भुयारी पुलाजवळील सेल्फी पॉईंटच्या भूमिपूजनाने झाला. भूमिपूजन ध्येय ॲकेडमीचे संदीप महाजनसर यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी प्रकल्पाचे प्रमुख विजय भोसले, मधुराज डिजिटलचे सुनील सोनार, तसेच मिलिंद सोनवणे, सुरज शिंदे
उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थितीत झालेल्या भूमिपूजन सोहळ्याने पाचोरा शहरातील नागरिकांमध्ये उत्सुकता आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कार्यसम्राट हॅट्रिक आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या प्रयत्नांमुळे भडगाव शहरात गेल्या काही महिन्यांत उल्लेखनीय सौंदर्यवर्धनाचे काम पूर्ण झाले असून, आता त्याच धर्तीवर पाचोरा शहरातसुद्धा विकासाचे नवे पर्व सुरू झाले आहे. भडगाव शहरातील विविध चौकांवर उभारलेले आकर्षक सेल्फी पॉईंट, प्रकाशयोजना आणि प्रेरणादायी भित्तिचित्रे यामुळे नागरिक आणि पर्यटक यांचे लक्ष वेधले गेले आहे. त्या यशस्वी उपक्रमाचा पाचोरा शहरात विस्तार होत असल्याने येथील नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. सदर उपक्रमासाठी आमदार किशोरआप्पा पाटील यांनी वैयक्तिक लक्ष घालून प्रत्येक ठिकाणाची पाहणी केली असून, कामे गुणवत्तापूर्ण, सुंदर आणि दीर्घकाळ टिकणारी व्हावीत यासाठी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत.याची पूर्तता झाल्यानंतर भविष्यात आणून पंधरा ते वीस पॉईंट उभारले जाणार आहेत या कामात युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, तसेच स्थानिक कलाकारांनाही आपली कला सादर करण्याची संधी मिळेल. विशेष म्हणजे या संपूर्ण योजनेचा पहिला टप्पा फक्त १५ दिवसांच्या कालावधीत पूर्ण होणार आहे. नियोजनानुसार आप्पांच्या वाढदिवसाच्या दिवशी काही ठिकाणांचे लोकार्पण करण्यात येईल, तर उर्वरित ठिकाणी कामे जलदगतीने पूर्ण करून शहर सुशोभिकरणाचे रूपांतर साकार होईल. वृंदावन कॉलनी पंपिंग रोड परिसरात सेल्फी पॉईंटसह “प्रेरणादायी विचारांचे भिंतसौंदर्य” या संकल्पनेवर काम सुरू झाले आहे. यात समाजातील थोर नेते, स्वातंत्र्यवीर, समाजसुधारक आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांचे सुविचार भिंतीवर आकर्षक पद्धतीने प्रदर्शित करण्यात येणार आहेत. तसेच रात्रीच्या वेळीही हे स्थळ सुंदर आणि सुरक्षित दिसावे म्हणून आधुनिक एलईडी लाइटिंग व सजावट केली जाणार आहे. या प्रकल्पाचे प्रमुख विजय भोसले यांनी सांगितले की, “आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भडगावप्रमाणे पाचोरा शहरातसुद्धा ही योजना विक्रमी वेळेत पूर्ण करण्याचा निर्धार आम्ही केला आहे. स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध करून देत शहराचे सौंदर्य वाढविणे हेच आमचे ध्येय आहे.” मधुराज डिजिटलचे प्रमुख सुनील सोनार यांनीही सांगितले की, “पाचोरा शहरातील प्रत्येक ठिकाणाला आपले वेगळेपण देण्यासाठी आम्ही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहोत. सेल्फी पॉईंट, लाइटिंग, आर्टवर्क आणि प्रेरणादायी थीम यांच्या माध्यमातून शहराची ओळख नव्या पद्धतीने उभी राहणार आहे शहरातील अनेक नागरिकांचे मत आहे की, पाचोरा शहर नेहमीच व्यापारीदृष्ट्या आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाचे राहिले आहे. आता या नव्या सुशोभिकरण योजनेमुळे शहराचा चेहरा अधिक आकर्षक बनेल. येथे येणाऱ्या पाहुण्यांना आणि प्रवाशांना देखील “आधुनिक पाचोरा” अशी ओळख मिळेल. या सर्व कामांमुळे पाचोरा शहर फक्त खान्देशातच नव्हे, तर जिल्हास्तरावरही चर्चेत येईल. पर्यटकांसाठी आकर्षणकेंद्र निर्माण होईल आणि स्थानिक पातळीवर आर्थिक चैतन्यही वाढेल. एकंदरीत, कार्यसम्राट हॅट्रिक आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या दूरदृष्टीतून आणि सक्रीय प्रयत्नांतून पाचोरा शहराचा विकास आता नव्या अध्यायात प्रवेश करीत आहे. १५ दिवसांत उभ्या राहणाऱ्या या आठ आकर्षक ठिकाणांमुळे पाचोरा शहर मुंबई, पुणे आणि भडगावप्रमाणेच नव्या तेजाने चमकणार आहे.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.







