![]()
पाचोरा – अखिल मराठा समाज सेवा प्रतिष्ठान संचलित मंगल कार्यालयाच्या उभारणीत आणि विकासात सातत्याने योगदान देत संस्थेचे आजीवन सदस्य अमित शिवाजी पाटील यांनी समाजहिताच्या भावनेतून एक महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला आहे. त्यांच्या प्रयत्नातून त्यांचे बंधुराज तथा मंगल कार्यालयाचे आजीवन सदस्य मनोज शांताराम पाटील (MSP Bildcon) यांनी प्रतिष्ठानच्या मंगल कार्यालयासाठी अत्याधुनिक वातानुकूलित रेडीमेड कार्यालयाची सुविधा स्वखर्चाने उपलब्ध करून दिली आहे. या कार्यालयाची एकूण किंमत सुमारे 3 लाख 50 हजार रुपये असून समाजातील सर्वसाधारण घटकांना अधिक सक्षम, आधुनिक आणि दर्जेदार सुविधा मिळाव्यात यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ही सुविधा समाजास समर्पित करण्यात आली असून समाजहिताच्या या योगदानातून तरुण उद्योजकांची सामाजिक बांधिलकी अधोरेखित झाली आहे. प्रतिष्ठान संचलित मंगल कार्यालय हे पाचोरा परिसरातील मराठा बांधवांसाठी विवाहसोहळे, सामूहिक उपक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे एक महत्त्वाचे केंद्र आहे. वाढत्या मागणीनुसार कार्यालयीन सुविधा अधिक सक्षम आणि अद्ययावत करण्याची गरज निर्माण झाली होती. विवाहपूर्व तयारी, नोंदणी कामे, पाहुण्यांचे स्वागत व व्यवस्थापन या सर्व कामांना आता वातानुकूलित कार्यालयामुळे अधिक गती आणि सुटसुटीतता प्राप्त होणार आहे. समाजातील प्रेम, मान-सन्मान आणि विश्वासाचे देणे समाजालाच परत करण्याच्या दृष्टिकोनातून मनोज शांताराम पाटील यांनी MSP Bildcon या आपल्या बांधकाम क्षेत्रातील प्रतिष्ठित संस्थेमार्फत ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. समाजहितासाठी स्वतःहून पुढे येऊन काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना मिळणारा मान आणि आदर समाजव्यवस्थेला अधिक सक्षम करतो हे त्यांच्या कृतीतून स्पष्ट होते. समाजहिताचा हा उपक्रम प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कृतज्ञतेने स्वीकारला असून संस्थेच्या इतिहासात आधुनिक सुविधेच्या या नव्या अध्यायाचे विशेष स्थान राहील असे मत व्यक्त करण्यात आले. समाजातील उदारमतवादी दानशूरता, परस्पर सहकार्य, एकोप्याची भावना आणि आधुनिकतेकडे वाटचाल करणारी ही भूमिका सर्वांसाठी प्रेरणादायी ठरेल अशी अपेक्षा आहे. या वातानुकूलित कार्यालयाचे उद्घाटन व चेक सुपूर्त प्रसंगी योगेश पाटील यांच्या हाती ही सुविधा प्रदान करण्यात आली. या प्रसंगी एमएसपी बिल्डकॉनचे संचालक मनोज शांताराम पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश बापू पाटील, शेतकरी सहकारी संघाचे व्हाईस चेअरमन तथा पिपल्स बँकेचे संचालक नंदूभाऊ पाटील, आजीवन सदस्य अमित शिवाजी पाटील, बाबाजी पाटील, मा. आरोग्य निरीक्षक धनराज पाटील, श्री राजपूत आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांनी या समाजहिताच्या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले. कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी कार्य करण्याचा संकल्प या बंधूंनी प्रत्यक्ष कृतीत साकारला असल्याने त्यांची सराहना करण्यात आली. समाजाच्या जलद प्रगतीसाठी अशा सेवाभावी पुढाकारांची साखळी अधिक बळकट व्हावी आणि समाजातील तरुणांनीही त्यातून प्रेरणा घेऊन समाजकार्यात सहभागी व्हावे अशी आशादायी भावना सर्व स्तरातून व्यक्त करण्यात आली.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.







