![]()
पाचोरा- प्रांताधिकारी भूषण अशोक अहिरे यांचे वडील व शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्त्व सेवानिवृत्त मुख्याध्यापक अशोक लक्ष्मण अहिरे (मूळ रा. गोराणे) यांचे मंगळवार दि. 28 ऑक्टोबर 2025 रोजी संध्याकाळी 6.55 वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने गोराणे गावासह नाशिक पंचवटी परिसरात तसेच शैक्षणिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आयुष्यभर कार्यरत राहिलेल्या या शिल्पकाराचे अकाली जाणे अनेकांसाठी धक्कादायक ठरले आहे.
अशोक अहिरे यांनी आपल्या कार्यकाळात शिक्षक म्हणून नुसते ज्ञान दिले नाही तर विद्यार्थ्यांमध्ये मानवी मूल्ये रुजवण्याचा ध्यास घेतला. त्यांचा साधा स्वभाव, प्रत्येकाशी प्रेमळ संवाद, सर्वांना समजून घेण्याची वृत्ती यामुळे ते शिक्षक, मित्र आणि मार्गदर्शक अशी बहुआयामी ओळख निर्माण करू शकले. अनेक विद्यार्थ्यांच्या यशामागे त्यांचे मौन योगदान आजही आदराने आठवले जाते. निवृत्ती नंतरही सार्वजनिक जीवनाशी नाळ कायम ठेवून समाजकार्यात त्यांची उपस्थिती जाणवत होती.
परिवारातील कणखर आधारस्तंभ आणि गावातील ज्येष्ठ मार्गदर्शक अशी त्यांची ओळख कायम होती. कुटुंबासाठी ते प्रेमळ, काळजीवाहू आणि जीवनमूल्य शिकवणारे पिता होते. भूषण अहिरे यांनी प्रशासन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करताना वडिलांकडून मिळालेल्या संस्कार आणि शिस्तीचे महत्त्व अनेकदा व्यक्त केले आहे. वडिलांचे तत्त्वज्ञान, त्यांची साधेपणा आणि संयम भूषण अहिरे यांच्या कार्यातही प्रखरपणे दिसून येतात. त्यामुळेच त्यांच्या निधनाने मुलगा भूषण यांच्यावरही भावनिक आघात ओढवला आहे.
त्यांच्या आठवणींबद्दल बोलताना अनेकजण सांगतात की सामाजिक प्रश्नांवर ते सदैव जागरूक असत. गावाच्या उन्नतीसाठी आवश्यक असलेल्या उपक्रमांत सक्रीय सहभाग घेत. जीवनात कोणतीही प्रसिद्धी न शोधता, शांतपणे व नम्रपणे समाजासाठी काहीतरी करण्याचा त्यांचा स्वभाव सर्वांना भावून गेला आहे.
त्यांची अंत्ययात्रा बुधवार दि. 29 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता राजविल्ला बंगला, प्लॉट नंबर 32, विजय नगर पंचवटी को.ऑप. सोसायटी, पंचवटी येथून निघणार असून अत्यविधी पंचवटी, नाशिक येथील अमरधाम येथे होणार आहे. त्यांच्या जाण्याची वार्ता पसरताच नाशिक, गोराणे आणि पाचोरा येथील अनेक मान्यवर, सहकारी, माजी विद्यार्थी व आत्मीयजन थेट परिसरात पोहोचत आहेत. सर्वजण त्यांच्या आठवणींना उजाळा देत अश्रू ढाळत आहेत. ईश्वर मृतात्म्यास चिरशांती देवो अशी प्रार्थना मोठ्या संख्येने व्यक्त केली जात आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी श्रीमती सुनिता अशोक अहिरे, मुलगा भूषण अशोक अहिरे, सुना गौरी भूषण अहिरे, नातू चि. राजवीर भूषण अहिरे तसेच समस्त शोकाकूल अहिरे परिवार, नातेवाईक आणि गोराणेकर असा मोठा परिवार मागे आहे. परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असला तरी त्यांच्या कार्याची परंपरा समाजाच्या हृदयात कायम राहील.
अशोक अहिरे यांनी आयुष्यभर शिक्षणाच्या माध्यमातून समाजाला दिशा दिली. त्यांची साधी राहणी, समतोल विचार आणि सकारात्मक दृष्टिकोन हे पुढील पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरणार आहेत. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून न निघणारी आहे. समाजाने गमावलेला हा थोर सेवक पुन्हा जन्माला येणे विरळ. अहिरे परिवाराच्या दुःखात ध्येय न्युज व झुंज वृत्तपत्र परिवार सहभागी आहे
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.







