आदिवासी जननायक धरती आबा बिरसा मुंडा : अन्यायाविरुद्ध तेजस्वी झुंज

0

Loading

आदिवासी जमातीचे खरे जननायक, अन्यायाविरुद्ध जाज्वल्य संघर्ष करणारे आणि झारखंडच्या सुपुत्रांचा अभिमान ठरलेले धरती आबा बिरसा मुंडा यांचे संपूर्ण आयुष्य आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी समर्पित झाले. वयाच्या अवघ्या 20व्या वर्षी इंग्रजांविरुद्ध झारखंड प्रदेशातून उभारलेले त्यांचे आंदोलन, समाजाला एकत्रित करून मुलभूत हक्कांसाठी लढण्याचा धाडसी मोर्चा आणि अत्यंत कमी वयात प्रखर नेतृत्व देत उलगुलानाचे आरंभकर्ता म्हणून त्यांनी इतिहासात अजरामर स्थान निर्माण केले. बिरसा सुगना मुंडा यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 रोजी उलिहातू या छोट्याशा गावात झाला. त्यांचे वडील सुगना मुंडा आणि आई करमी मुंडा, तर भावंडांत पासना व चंपा अशी नावे आहेत. निसर्गपूजक, जंगलांचे रक्षण करणारी व वनसंपदेवर जगणारी मुंडा जमात पिढ्यानपिढ्या जंगलात राहत होती. शेती आणि जंगलातील उपजिविकेवर आधारित जीवनशैलीत वाढलेले बिरसा बालपणापासूनच बुद्धिमान, संवेदनशील आणि नेतृत्वगुणांनी परिपूर्ण होते. आर्थिकदृष्ट्या अतिशय कठीण परिस्थितीत सुगना मुंडा मजुरी करून कुटुंब सांभाळत होते. त्या वातावरणात वाढत असताना बिरसा काही काळ मामाकडे आयुबहातू येथे राहिले. साल्गा गावातील जयपाल नाग यांच्या शाळेत त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतले. याच काळात जर्मन मिशनऱ्यांच्या संपर्कात आलेल्या अनेक आदिवासी कुटुंबांना विविध प्रलोभने देऊन ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी भाग पाडले जात होते. कुटुंबावर आलेल्या परिस्थितीत बिरसाचे संपूर्ण कुटुंब ख्रिश्चन करण्यात आले आणि त्यांना ‘बिरसा डेव्हिड’ म्हणून ओळखले जाऊ लागले. नंतर त्यांना पुढील शिक्षणासाठी चाईबासा येथील लुथन मिशन स्कूलमध्ये पाठवण्यात आले. चाईबासातील शिक्षणकाळातच बिरसा मुंडा यांना मिशनरी व ईस्ट इंडिया कंपनीकडून चालविल्या जाणाऱ्या अत्याचारांची तीव्र जाणीव झाली. आदिवासी समाजावर लादले जाणारे अमानुष कर—जन्मावर कर, मृत्यूवर कर, त्यांच्या परंपरेवर नियंत्रण, जंगल-जमिनीवर कब्जा—यामुळे आदिवासी समाजाचा कणा मोडण्याची वेळ आली होती. बिरसा मुंडा यांच्यासारख्या जागृत नेतृत्वाने या अन्यायाचा तीव्र विरोध केला. निसर्ग, परंपरा, स्वाभिमान आणि जलजंगलजमीन या आदिवासींच्या हक्कांवर अन्याय होत असल्याने त्यांनी व्यापक जनजागृती सुरू केली. वैष्णव संतांच्या शिकवणीचा प्रभाव असल्याने त्यांनी प्रारंभी अहिंसेचा मार्ग स्वीकारून समाजात एकात्मतेची भावना निर्माण केली. परंतु इंग्रजांनी आदिवासींच्या जमिनी बळकावण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांनी ‘उलगुलान’ या महासंग्रामाची हाक दिली. 23 ऑगस्ट 1895 रोजी इंग्रज कमिश्नरांनी त्यांना अटक करण्याची योजना आखली, मात्र आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांच्या कार्यामुळे समाजात निर्माण झालेला जागरूकता लाटेमुळे इंग्रजांना त्यांना सहज गाठणे कठीण गेले. बिरसा मुंडा यांनी हजारो आदिवासी बांधवांना एकत्र करून अन्यायाविरुद्ध बंड पुकारले, जेलभरो आंदोलन केले आणि आपल्या लोकांना न्याय मिळवून दिला. त्यांच्या नेतृत्वामुळे इंग्रज प्रशासन हादरले. भारतमातेच्या मुक्तीसाठी आणि आदिवासी समाजाच्या अस्तित्वासाठी त्यांनी प्राणपणाने झुंज दिली. परंतु संघर्षाच्या या लढ्यात 3 फेब्रुवारी 1900 रोजी बिरसा मुंडा यांना अटक करण्यात आली. रांची येथील तुरुंगात त्यांना ठेवण्यात आले आणि 9 जून 1900 रोजी वयाच्या अवघ्या 25 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्यूवरील संशयास्पद परिस्थिती आजही चर्चा व संशोधनाचा विषय आहे, पण त्यांच्या शौर्याचा प्रकाश मात्र कधीच मंदावलेला नाही. आज 15 नोव्हेंबर हा दिवस संपूर्ण देशात ‘बिरसा मुंडा जयंती’ म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. कर्नाटक, म्हैसूर, कोडगू, गुजरात, महाराष्ट्र यांसह देशभरातील आदिवासी जमाती त्यांच्या जयंतीनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करतात. झारखंडची राजधानी रांची येथील कोकार येथे त्यांचे समाधीस्थळ आहे. त्यांच्या कार्याच्या सन्मानार्थ कृषी विद्यापीठास तसेच रांची विमानतळास ‘बिरसा मुंडा’ हे नाव देण्यात आले आहे. ‘गांधी से पहले गांधी’ आणि ‘उलगुलान एक क्रांति’ हे चित्रपट तसेच ‘अरण्ये अधिकार’ ही ऐतिहासिक कादंबरी त्यांच्या जीवनावर आधारित असून या कादंबरीला 1979 चा बंगाली साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. न्याय, स्वाभिमान, बंधुत्व आणि संघर्षाचे तेजस्वी प्रतीक म्हणून बिरसा मुंडा यांचे नाव भारतीय स्वातंत्र्य इतिहासातील दुर्मिळ, अमर आणि प्रेरणादायी असे स्थान कायम राखून आहे. राम सखाराम जाधव माध्यमिक आदिवासी आश्रमशाळा पिंपरखेड, ता. भडगाव, जि. जळगाव मो. 9850669485 / 7821036132

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here