![]()
पाचोरा – शेंदुर्णीसह जळगाव जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरावी असा उल्लेखनीय यशाचा मान प्रा. वर्षा अविनाश निकम आणि अविनाश वासंती आत्माराम निकम या निकम दाम्पत्याने पटकावला आहे. शिक्षक अधिकारी स्पर्धा 2025-26 अंतर्गत घेण्यात आलेल्या महत्त्वाच्या विविध उपस्पर्धांमध्ये या दाम्पत्याने आपली चमकदार कामगिरी नोंदवत विभागस्तरावर भक्कमपणे निवड मिळवली आहे. शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन सोसायटी लिमिटेडचे दोन्ही कर्मचारी असलेल्या या दाम्पत्याकडे आता पंचक्रोशीचे लक्ष वेधले गेले आहे. प्रथम प्रा. वर्षा अविनाश निकम यांचा उल्लेख करावाच लागेल. अ. र. भा. गरुड कनिष्ठ महाविद्यालय, शेंदुर्णी येथील या गुणी शिक्षिकेने काव्यवाचन – स्वरचित स्पर्धेत जिल्हास्तरावर उत्तुंग कामगिरी करत नाशिक विभागातील अंतिम निवडीत आपले स्थान पक्के केले आहे. त्यांच्या आवाजातील भावस्पर्शी सादरीकरण, स्वतःच्या लेखणीतून उतरलेले आशयगर्भ काव्य आणि भाषेवरील विलक्षण प्रभुत्व यामुळे परीक्षक वर्गाचे लक्ष त्यांच्या कामगिरीकडे वेधले गेले. शिक्षण संस्कारांबरोबरच कलाविष्कारही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे यासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या प्रा. वर्षा निकम यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. दुसरीकडे अविनाश वासंती आत्माराम निकम हे अप्पासाहेब पी. एस. पाटील माध्यमिक विद्यालय, नांद्रे ता. पाचोरा येथील सहायक शिक्षक आहेत. बाल मानसशास्त्र – केस स्टडी या अत्यंत अभ्यासू आणि सखोल समज आवश्यक असलेल्या उपस्पर्धेत त्यांनी जिल्ह्यातून उत्तुंग कामगिरी करत विभागस्तरावर निवड संपादन केली आहे. बालकांच्या मनोवृत्तीचा, शिकण्याच्या शैलीचा आणि परिस्थितीनुरूप बदलणाऱ्या भावनिक-मानसिक गरजांचा त्यांनी केलेला अभ्यास आणि त्या आधारे सादर केलेली केस स्टडी परीक्षकांना अत्यंत प्रभावी वाटली. आधुनिक शिक्षणपद्धतीत बाल मानसशास्त्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, या क्षेत्रात त्यांनी सिद्ध केलेली प्रावीण्यता त्यांच्या अध्यापनातील बांधिलकीचे प्रतीक ठरते. निकम दाम्पत्याच्या या दुहेरी यशाने शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन सोसायटी लिमिटेडचा मान अधिक उंचावला आहे. दोन्ही पती-पत्नी जळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधी म्हणून नाशिक विभागातील अंतिम स्पर्धेत सहभागी होणार असून, त्यांच्या पुढील सादरीकरणाची उत्सुकता संपूर्ण जिल्हाभर पसरली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल डाएट प्राचार्य, मुख्याध्यापक, गट शिक्षण अधिकारी यांनी विशेष सत्कार करून शुभेच्छा दिल्या. या कामगिरीची दखल संस्थेतही मोठ्या आनंदाने घेण्यात आली. संस्थेचे चेअरमन आद. दादासाहेब संजयदादा गरूड, उपाध्यक्ष आबासाहेब भिमराव शेळके, सचिव काकासाहेब सागरमलजी जैन, सहसचिव दादासाहेब यू. यू. पाटील, कार्यालयीन सचिव भाऊसाहेब दिपक गरूड, वसतिगृह सचिव गो. गो. सुर्यवंशी तसेच संचालक मंडळ, प्राचार्य, सर्व शिक्षक बंधू-भगिनी, प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी दाम्पत्याचे अभिनंदन केले. सोसायटीचे दीर्घकाळापासून सुरु असलेले शैक्षणिक कार्य, शिक्षकांना मिळणारे पोषक वातावरण आणि नवीन प्रयोगांना प्रोत्साहन देणारी शैक्षणिक संस्कृती या यशाला बळ देणारी ठरल्याचे मत अनेक मान्यवरांनी व्यक्त केले. निकम दाम्पत्याचा हा दुहेरी विजय त्यांच्या वैयक्तिक मेहनतीचा, सातत्यपूर्ण अभ्यासाचा आणि शैक्षणिक संस्कारांचा उत्कृष्ट नमुना आहे. एकीकडे काव्यवाचनातील साहित्यिक अभिव्यक्ती आणि दुसरीकडे बाल मानसशास्त्रातील शास्त्रीय दृष्टी — या दोन्ही परस्पर भिन्न क्षेत्रांत त्यांनी केलेला वेधक अभ्यास आणि उत्कट सादरीकरण जळगाव जिल्ह्यासाठी गौरवास्पद ठरले आहे. पंचक्रोशीत या यशाची चर्चा सुरू असून, येणाऱ्या विभागीय स्पर्धेत निकम दाम्पत्य आणखी मोठे यश मिळवेल अशी आशा व शुभेच्छा सर्व स्तरांतून व्यक्त केल्या जात आहेत.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.





