शाळेच्या गुन्हेगारी निष्काळजीपणामुळे दोन चिमुकले बळी; भडगाव हादरले, शिक्षण व्यवस्थेवर गंभीर आरोप

0

Loading

पाचोरा – भडगाव शहरातील आदर्श कन्या शाळेच्या इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये घडलेली घटना ही केवळ दुर्घटना नसून ती सरळसरळ गुन्हेगारी निष्काळजीपणाची जिवंत उदाहरण आहे. शिक्षण देण्याची जबाबदारी ज्यांच्यावर सोपवली जाते, त्याच शाळेच्या बेफिकीर आणि बेजबाबदार कारभारामुळे दोन निष्पाप, निरागस चिमुकल्यांना आपला जीव गमवावा लागला असून या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण भडगाव शहर हादरले आहे आणि नागरिकांच्या संतापाचा उद्रेक होत आहे. नर्सरीमध्ये शिक्षण घेणारे अंश सागर तहसीलदार (वय ३ वर्षे ६ महिने, रा. आदर्श कॉलनी, भडगाव) आणि मयंक ज्ञानेश्वर वाघ (वय ४ वर्षे २ महिने, रा. बालाजी गल्ली, भडगाव) ही दोन लहान मुले शाळेच्या आवारातील संरक्षण भिंतीवरून घसरून थेट नाल्यात पडली आणि बुडाल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना ऐकून कोणत्याही संवेदनशील माणसाचे काळीज तुटेल; मात्र येथे प्रश्न असा आहे की ही परिस्थिती निर्माणच कशी झाली. शाळेच्या आवारात संरक्षण भिंतीला कोणताही अडोका, जाळी किंवा सुरक्षित कठडा नसणे म्हणजे शाळा व्यवस्थापनाने लहान मुलांच्या जीवाशी सरळसरळ खेळ केल्याचेच द्योतक आहे. इतक्या लहान वयाच्या मुलांना वर्गाबाहेर जाण्याची परवानगी कोणी दिली, त्या वेळी वर्गशिक्षक, सहाय्यक शिक्षक, आया किंवा शिपाई नेमके कुठे होते, विद्यार्थ्यांवर सतत नजर ठेवणे ही शाळेची मूलभूत जबाबदारी नाही का, की केवळ फी वसूल करणे आणि जाहिराती करणे एवढेच काम या शाळेचे आहे, असे गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. ही घटना अपघात म्हणून झटकून टाकण्याचा कोणताही प्रयत्न नागरिक सहन करणार नाहीत, कारण हा प्रकार पूर्वनियोजित निष्काळजीपणाचा परिणाम असून नर्सरी वयातील मुलांना क्षणभरही एकटे सोडू नये, हे साधे भानही शाळा व्यवस्थापनाला राहिले नसल्याचे यातून स्पष्ट होते. घटनेची माहिती मिळताच दोन्ही बालकांचे पालक, नातेवाईक आणि नागरिकांनी शाळेवर धाव घेतली, शाळेच्या आवारात आक्रोश, रडारड आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले, आम्ही आमची मुले सुरक्षिततेच्या विश्वासावर शाळेत पाठवतो पण इथे तर शाळाच मृत्यूचा सापळा ठरली, अशा संतप्त प्रतिक्रिया पालकांनी व्यक्त केल्या असून अनेकांनी शाळा व्यवस्थापनावर थेट मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या घटनेने भडगाव शहरावर शोककळा पसरली असली तरी हा शोक आता संतापात बदलत असून दोन कुटुंबांवर कोसळलेले हे दुःख संपूर्ण समाजाचे अपयश असल्याची भावना व्यक्त होत आहे आणि खासगी इंग्लिश मीडियम शाळांच्या वाढत्या माजावर, मनमानी कारभारावर तसेच प्रशासनाच्या डोळेझाक धोरणावरही या घटनेने जोरदार प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. शाळा सुरू करताना आवश्यक असलेले सुरक्षा निकष, संरक्षण भिंती, खेळाच्या मैदानांची सुरक्षितता, पुरेसे शिक्षक व कर्मचारी, लहान मुलांसाठी स्वतंत्र देखरेख व्यवस्था हे सर्व कागदावर दाखवून प्रत्यक्षात काहीच अंमलात आणले जात नाही, हे या घटनेने पुन्हा सिद्ध केले असून शिक्षण विभाग आणि स्थानिक प्रशासनाने वेळेवर तपासणी केली असती तर दोन निष्पाप जीव वाचले नसते का, असा थेट सवाल नागरिक करत आहेत. या प्रकरणी केवळ चौकशीचे औपचारिक नाटक न करता संबंधित शाळा व्यवस्थापन, मुख्याध्यापक, वर्गशिक्षक आणि थेट जबाबदार कर्मचाऱ्यांवर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करून मनुष्यवधास कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करावा व शाळेची मान्यता तात्काळ रद्द करावी, अशी जोरदार मागणी होत आहे. आज अंश आणि मयंक गेले, उद्या कुणाचे मूल, हा प्रश्न प्रत्येक पालकाच्या मनात घोळत असून दोषींना शिक्षा होईपर्यंत आवाज उठवणे हीच या दोन निष्पाप चिमुकल्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here